‘हयग्रीव’ – एक गूढ प्रवास
लॉकडाऊनच्या
काळात ‘मायमिरर पब्लिशिंग हाऊस’ने ‘किताबकल्हई’ उपक्रम सुरू केला होता. या
उपक्रमांतर्गत त्यांनी काही जुन्या पुस्तकांचे प्रकाशन केलं. त्यातच रामचंद्र
सखाराम गुप्ते यांचं ‘सूपशास्त्र’ (स्वयंपाक शास्त्र) हे पुस्तक होतं. त्याची
जाहिरात पाहताच मी ते उत्साहात मागवून घेतलं, चाळलं. पण लॉकडाऊनच्या धामधुमीत
पूर्ण वाचणं काही झालं नाही. आज सहजच हाताशी आलेलं हे पुस्तक चाळताना मला लॉटरी
लागली, अनेक वर्षं पडलेल्या एका कोड्याचं उत्तर मिळालं. आता तुम्ही म्हणाल नमनाला
घडाभर तेल नको...पुढे चला...
तर,
आमचं गाव सोलापूर अंद्रऽऽ कर्नाटक – महाराष्ट्राच्या सीमेवरचं गाव. घरातलं
वातावरण, खाद्यसंस्कृती यांवर थोडाबहुत कानडी पगडा होता आणि म्हणायला गेलं तर
विजापूरच्या अगदी थोडसं पुढं असणारं तोरवी नावाचं गाव, तिथला नरसिंह आमचं कुलदैवत.
वर्षा- दोन वर्षांतून तिकडे गेलो की तिथलं पूर्ण कानडी वातावरण अनुभवायला मिळायचं.
मुघलांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी मोगल शैलीत बांधलेलं हे मंदिर, तिथल्या
अंधारगुडूप भुयारातून “हादी...हादी...” म्हणजे वाट द्या अशी मजेत हाळी देत गाभाऱ्यापर्यंत
जाऊन दर्शन घेतलं की ओढ लागायची वरच्या स्वयंपाकघरातून येणाऱ्या सुवासाची. तिथे
बरेच पदार्थ असायचे. कर्नाटकी हुळीअन्ना, कोसंबरी, विविध चटण्या, कायरस आणि अजून
बरंच काय काय...फक्त पोळी सोडून बरं का...या सगळ्यात माझ्यासाठी प्रमुख आकर्षण असायचा
तो म्हणजे ‘हयग्रीव’. तिथे पंगतीत ऐकताना “हैग्रीवऽऽ हैग्रीवऽऽ” असंच ऐकू यायचं.
मोठं झाल्यावर कळलं तो शब्द आहे हयग्रीव. मग तर त्या पदार्थामागचा गूढ अर्थ अनेक
वर्ष उकललाच नाही, पण त्याची आवड मात्र कायम राहिली. तर संस्कृतात ‘हय’ म्हणजे
घोडा आणि ‘ग्रीवा’ म्हणजे मान. थोडक्यात घोड्याचे शिर आणि माणसाचे शरीर असणारा.
हयग्रीव हा विष्णुच्या अवतारांपैकी एक अवतार. पुढे एकदा प्रवासात कर्नाटकातल्या एका
मोठ्या घाटातून प्रवास करताना मोठ्यांनी एके ठिकाणी थांबून आम्हाला दरीतलं एक गाव
दाखवलं आणि सांगितलं त्या गावाचं नाव हयग्रीव –कारण त्याचा आकार घोड्याच्या डोक्यासारखा
आहे. तेव्हा तो आकार दिसला नाही तरी आम्ही बापड्यांनी “हो खरंच कीऽ” वगैरे म्हणून
वेळ मारून नेली होती.
तर
हयग्रीव शब्दाचा अर्थ आणि माझा लाडक्याच्या पदार्थाचं नाव याची काही केल्या उकल
होत नव्हती. पण सूपशास्त्र या पुस्तकात मला ‘हरभऱ्यांचे डाळीची क्षीर’ हा पदार्थ
दिसला आणि मी थबकले. पाककृतीच्या तपशीलात आता शिरत नाही. पण हयग्रीव म्हणजे हरभरा
डाळ, गूळ, खसखस, सुक्या खोबऱ्याचे, काजू-बदामाचे मुबलक प्रमाणात काप आणि भरपूर
तूप. यात काही ठिकाणी दूधही घालतात. हा पदार्थ पुरणासारखा घोटून एकजीव करत नाहीत,
तर त्यात प्रत्येक घटक स्वतंत्रपणे दिसावा लागतो. तूपात खरपूस तळलेले काजूचे-खोबऱ्याचे
काप दाताखाली यावे लागतात, तरच खरी मजा.
तर
या पदार्थाच्या नावाची दंतकथा अशी की, वादिराजतीर्थ नावाचा एक भक्त रोज
हयग्रीवस्तोत्राचं पठण करून हयग्रीवाला या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. एक दिवस देव शुभ्र घोड्याच्या रूपात प्रकट झाला
आणि तो नैवेद्य त्याने ग्रहण केला म्हणून या पदार्थाला नाव पडले हयग्रीव. कर्नाटक,
तेलंगणा प्रांतात हा पदार्थ आजही सणासुदीला नैवेद्य म्हणून केला जातो.
ही
दंतकथा या पदार्थाशी कशी जोडली गेली असेल, या गोष्टींचा सारासार विचार मी बाजूला सारला
आणि हयग्रीव या नावामागच्या गोष्टीला एकदम मान्यताच देऊन टाकली. कारण एखाद्या
गोष्टीचा आपण कितीतरी वर्षं कळतनकळत विचार करत असतो आणि असं अनाहूतपणे मिळालेलं
उत्तर आपल्या मनालाच नाही तर बुद्धीलाही सुखावून जातं. काही जणांना ही कथा माहीत
असेलही. पण मला तरी ही कथा नव्याने गवसली आहे आणि माझ्या लाडक्या हयग्रीवाभोवतीचं
गूढ वलय तिनं तात्पुरत का होईना दूर केलं आहे.
©तृप्ती कुलकर्णी
छायाचित्र –गुगलच्या सौजन्याने
ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.
आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.
