शोध स्त्री
संताचा!
परवा
सहजच इयत्ता चौथीचं इतिहासाचं पुस्तक चाळत होते. आम्ही ते पुस्तक रद्दीत न टाकता खास
जपून ठेवलं आहे. या पुस्तकाशी खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. इतिहासाशी
आत्मीयतेचं नातं जोडण्यासाठी हेच पुस्तक कारणीभूत ठरलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा
इतिहास, त्यातल्या सनसनावळ्या, ते झपाटलेपण सगळं काही आठवून गेलं. पण थोडी खंत
वाटली ती त्या पुस्तकातला दुसरा धडा पाहून! तोही अगदी जसाचा तसाच आहे. अगदी
आमच्यावेळेस ३५ वर्षांपूर्वी होता तसाच. फक्त आता मी ते पुस्तक इंग्रजीमध्ये वाचत
होते, इतकाच काय तो फरक. या धड्यामध्ये वारकरी संप्रदाय, महाराष्ट्रातील संतपरंपरा
त्यांची शिकवण यांची माहिती आहे. यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ,
चक्रधर स्वामी, रामदास स्वामी यांची माहिती, त्यांची शिकवण, त्यांचे ग्रंथ यांची
माहिती आहे. हे तर उत्तम आहेच. पण त्याकाळी खटकली नव्हती ती गोष्ट आता खटकली ती
म्हणजे या धड्यात एकाही स्त्री संताचा उल्लेख नाही, त्यांच्या कृतींची, इतिहासाची
माहिती नाही.
इतिहासामध्येसुद्धा
महिला संत, त्यांच्या साहित्यकृती कायम उपेक्षितच आहेत. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’
म्हणणाऱ्या मुक्ताबाईंच्या ताटीच्या अभंगांचा गर्भितार्थ, बहिणाबाईंच्या चिंतनपर
तरीही सहजसुंदर कविता, कान्होपात्रेच्या अभंगातील वेदना, कळवळा, वेणास्वामींची
रामकथा यांचा परिचय नाही, पण किमान उल्लेख तरी करणं गरजेचं आहे.
मला
इथे स्त्रीमुक्ती, स्त्रीपुरुष समानता यांपैकी कशाचाही डंका वाजवायचा नाही, पण
ज्याप्रकारे पुरुष संतांनी त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रसंगाना तोंड देत आपल्या
आराध्याची उपासना केली त्याचप्रकारे किंवा त्याहीपेक्षा जास्त खडतर परीक्षेला
सामोरे जात वेळप्रसंगी सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत स्त्री संतानी आपल्या
आराध्याची भक्ती केली. दैनंदिन कामं करत आपल्या आराध्याचं नाव मुखी असणाऱ्या या
संतांनी कर्मयोग आणि भक्तियोगाची जणू सांगडच घातली.
लहानपणी
दूरदर्शनवर प्रादेशिक चित्रपट लागायचे. तेव्हा अक्कमहादेवींवरचा एक कानडी चित्रपट
पाहिला होता मी. त्या चित्रपटाचा पगडा मनावरून अजूनही दूर झालेला नाही. तेव्हा
त्यांच्याविषयी वाचण्याची खूप इच्छा होती, पण दुर्दैवाने तेव्हा तसं काही वाचायला
मिळालं नाही. पण २०२३ साली अरुणा ढेरेंचं ‘भारतीय विरागिनी’ हे पुस्तक प्रकाशित
झालं आणि मला हरवलेलं काहीतरी गवसल्यासारखं वाटलं. आपल्या आवडत्या विषयावर आपल्या
आवडत्या लेखिकेनं लिहावं, यापेक्षा आणखी काय हवं. या पुस्तकात मला अक्कमहादेवी तर
भेटल्याच, शिवाय संपूर्ण भारतातील विविध कालखंडातील विरागिनी भेटल्या, त्यांचा
परिचय झाला.
सावित्रीच्या लेकींचा उदय होण्याआधीही आपल्याकडे ही धडपड सुरू
होती. समर्थ रामदासांसारख्यांनी या वेणाबाईंना वेणास्वामी ही उपाधी बहाल करून
उभ्याने कीर्तन करण्याचा अधिकार दिला, त्यांच्यावर मिरजेच्या मठाची जबाबदारी
सोपवली. या धडपडीला किमान काही प्रमाणात का होईना सार्थ केले. स्त्रीपुरुष
समानतेच्याही पलीकडे जाऊन मला स्त्री, पुरुष, लहान मुले यांच्याकडे एकाच दृष्टीने
पाहण्याची बुद्धी दे, अशी विनंती करणाऱ्या तुकाराम महाराजांच्या ‘नर नारी बाळें
अवघा नारायण । ऐसें माझे मन करीं देवा ।।१।।’ या अभंगाप्रमाणे सगळ्या भेदांच्या पार
जाण्याचा विचार व्यक्त केला, ही किती मोठी गोष्ट आहे!
तर मूळ विषयाशी पुन्हा
येताना असं म्हणावसं वाटतं की, लहान मुलांना जरी स्त्रियांच्या आयुष्यातील समस्या,
त्यांवर मात करून त्यांनी मिळवलेलं संतपद यांचा खरा अर्थ आत्ता कळला नाही, तरी
किमान त्यांचा उल्लेख आणि थोडक्यात परिचय करून द्यायला काय हरकत आहे? त्यातून त्यांना महिला संतही होत्या हे तरी कळेल.
©तृप्ती कुलकर्णी
छायाचित्र –गुगलच्या
सौजन्याने
ही पोस्ट आवडल्यास
माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.
आणखी लेख
वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.
