North Italy लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
North Italy लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

 

‘द चिल्ड्रन्स ट्रेन’ - एक सुखद अपेक्षाभंग!




 

कुठलेही  युद्ध आणि त्याच्या अवतीभवती फिरणारे कथानक ज्यात लहान मुले, ट्रेन अशा गोष्टी असतील, अशा चित्रपटांची जरा भीतीच वाटते. कारण युद्धकाळातील सर्व परिणामांचा लेखाजोखा अशा कलाकृतींमध्ये घेतलेला असतो, ज्याची परिणती शक्यतो करुणरसात होते. पण याचा अर्थ असा नाही की मी असे चित्रपट पाहत नाही. पण सुरुवात करताना मनात एक किंतु असतोच. पण या किंतुला, किमान माझ्या या समजुतीला छेद देणारा एक चित्रपट परवा पाहण्यात आला. ‘Il treno dei bambiniया २०२४ मध्ये रिलीज झालेल्या इटालियन चित्रपटाची इंग्रजी आवृत्ती ‘The Children's Train पाहण्यात आली. व्हायोला अर्दोने यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचं कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडातील आहे. साधारणपणे १९४3 -४६ मध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित हा चित्रपट.

या चित्रपटाची गोष्ट घडते ती दक्षिण आणि उत्तर इटलीतील नेपल्स आणि मोडेना या शहरांमध्ये. नेपल्सला १९४३ साली स्वातंत्र्य मिळाले पण १९४५ पर्यंत मुसोलिनीच्या हुकुमशाहीमधून सुटका होण्यासाठी मात्र त्यांना १९४५ पर्यंत वाट पाहावी लागली. त्या दरम्यान तिथली आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था अक्षरशः कोलमडली होती. महागाई, बेरोजगारी, गरिबी अशा अनेक संकटाना हा देश सामोरा जात होता. त्यामुळे तिथल्या लहान मुलांच्या आयुष्यावर या सर्व घटकांचे खूप गंभीर परिणाम झाले. दैनंदिन जीवनातील सोयीसुविधांचा अभाव, अनारोग्य, कुपोषण यांचा सामना करत तिथली मुलं जगत होती. पालकांना आपल्या मुलांना रोजंदारीला लावावे लागत होते. अशात या मुलांसाठी उत्तर इटलीतील साम्यवादी पक्षाच्या महिलांच्या फळीने मायेचा हात पुढे केला. त्यांनी या मुलांसाठी ‘हॅपीनेस ट्रेन’ हा उपक्रम सुरू केला. उत्तर इटलीतील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण हे दक्षिणेच्या मानाने खूपच चांगले होते. युद्धाची झळ बसलेल्या दक्षिणेतील मुलांना उत्तर इटलीतल्या घरांमध्ये काही काळासाठी ठेवून घेणे, त्यांचे संगोपन करणे हा या उपक्रमाचा हेतू होता.

चित्रपटाची सुरुवात एका प्रसिद्ध व्हायोलिनवादकाच्या शोपासून होते. शोच्या आधी त्याला एक फोन येतो. ज्यात त्याला त्याच्या आईच्या निधनाची बातमी कळते. तरीही तो शो पूर्ण करण्याचा निर्णय घेतो. या संपूर्ण शोमध्ये त्याला त्याच्या गतायुष्याच्या आठवणी येत राहतात. हाच अमेरिगो आपल्या या चित्रपटाचा नायक. हॅपीनेस ट्रेनमधील मुलांपैकी एक. आपल्या आईबरोबर राहून छोटीमोठी कामं करून कसाबसा जगणारा. परिस्थितीने गांजलेली त्याची आई आपल्या मुलाचं थोड्या काळापुरतं का होईना भलं व्हावं म्हणून या हॅपीनेस ट्रेनमधून त्याला मोडेनाला पाठवण्याचं ठरवते. पण या उपक्रमाच्या विरोधात अनेक गैरसमजूतीही पसरवल्या जात असतात. जसं की तिकडे गेल्यावर या मुलांचे हातपाय तोडले जातील, त्यांना भिकेला लावलं जाईल. कम्युनिस्ट लहान मुलांना खाऊन टाकतात, त्यांना मारून साबण बनवण्यासाठी त्यांचा वापर करतात वगैरे वगैरे. आपल्याही मनात अगदी या नाही तरी अनेक शंका येऊन जातातच. कारण चांगुलपणावर, माणुसकीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवूच शकत नाही. या ट्रेनमधून जाण्यासाठी विरोध करणारा अमेरिगो उंदरांना पांढरा रंग देऊन विकताना पकडला जातो. शिक्षेच्या भीतीने तो जाण्याचं कबूल करतो. अनेक शंकाकुशंका मनात घेऊन शेवटी अमेरिगो आणि त्याच्यासारखी अनेक मुलं त्या ट्रेनमध्ये चढतात.

पलीकडे अनेक मायाळू कुटुंबं त्यांची वाट पाहत असतात. आपल्या अमेरिगोचा नंबर मात्र सर्वात शेवटी लागतो. त्याचा स्वीकार करावा लागतो डेरना नावाच्या एका शेतकरी महिलेला. डेरनाने युद्धादरम्यानच्या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला असतो. तिच्या बॉयफ्रेंडला त्या दरम्यान जिवंत जाळलेलं असतं. परिस्थितीच्या चटक्यांनी पोळलेल्या प्रथमदर्शनीच रुक्ष वाटणाऱ्या डेरनाला निरुपायाने अमेरिगोला घरी घेऊन यावं लागतं. ती दुसऱ्या दिवशी आपल्या भावाच्या कुटुंबाशी अमेरिगोची भेट घालून देते. त्या घरामध्ये, शहरामध्ये डेरनाच्या आयुष्यात अमेरिगो हळूहळू रुळू लागतो. काही कटु प्रसंगानंतर डेरनाबरोबरचं त्याचं नातं गहिरं होत जातं. पहिल्या दिवशी त्याला मायेनं जवळं घ्यायला बिचकणारी डेरना आपल्या दुःखामध्ये त्याला सहभागी करून घेते. वह्या, कंपासपेटी अशा अत्यंत साध्या पण या मुलांना अप्राप्य वाटणाऱ्या वस्तू त्याला आणून देते. दोन वेळेचं जेवण, स्वच्छ कपडे या गोष्टीही ज्यांना मिळत नव्हत्या अशा या मुलांच्या प्राथमिक गरजा तर इथे भागतच होत्या, पण त्याखेरीज त्यांना संस्कारांची, प्रेमाची, मायेची ठेवही मिळत होती. अमेरिगोला इथेच त्याच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवणारी देणगी मिळते ती डेरनाच्या भावाकडून. तो त्याला व्हायोलिनची ओळख करून देतो. ते वाजवायला शिकवतो. नेपल्समध्ये गरिबीत राहत असलेल्या त्याला आईकडून संगीताचा कान लाभला आहे. आईच्या गोड आवाजातील गाणी ऐकत तो मोठा झाला आहे. त्यामुळे संगीताची उपजत जाण असलेला अमेरिगो ही कला सहजपणे आत्मसात करायला सुरुवात करतो. मोडेनाहून नेपल्सला आल्यावर घरी आईकडे – आपल्या गावी जाण्याची ओढ असलेल्या अमेरिगोची ही ओढ हळूहळू कमी होते. आईने प्रवासासाठी निघताना दिलेलं एकमेव सफरचंद न खाता ते आपल्या हातात घट्ट पकडून ठेवणाऱ्या अमेरिगोची त्या सफरंचदावरची पकड हळूहळू सैलावते. मोडेनातील मुक्काम संपल्यानंतर परतताना सगळी मुलं आणि त्यांच्याशी मायेचं नातं जडलेली ही कुटुंबं सगळ्यांचीच अवस्था खूप बिकट होते. त्यातील काही मुलं आपण यांना भेटायला परत येऊ, ही आशा उराशी बाळगून तिथून निघतात. काही तिथेच राहतात. अमेरिगो मात्र आपल्या आईकडे परत येतो. आल्यासरशी तो आनंदाने त्याला भेट मिळालेलं व्हायोलिन तिला दाखवतो. ती मात्र रुक्षपणे ते व्हायोलिन पलंगाखाली सरकवते आणि “आता तू मोठा झाला आहेस, कामाला लाग. या चैनी आपल्यासारख्यांसाठी नाहीत,” असं खडसावते. आपल्याच आयुष्यातील या दोन टोकाच्या अनुभवांतील तफावत अमेरिगो सहन करू शकत नाही. तो सतत तुलना करत राहतो. पक्षाच्या कार्यालयात या मुलांसाठी त्यांच्या फॉस्टर पेरेंट्सनी पाठवलेल्या भेटवस्तू, पत्रं येत असतात.  डेरनाच्या पत्रांची, भेटवस्तूंची वाट पाहत राहतो. पण त्याची आई त्याला सांगते की, ‘ते लोक आता विसरले तुला! त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नकोस.’ एक दिवस जेव्हा त्याला त्याच्या आईने व्हायोलिन विकल्याचं कळतं तेव्हा मात्र तो ज्या कार्यालयातून त्यांना पाठवलं गेलं होतं तिथे जातो. तिथली महिला कर्मचारी त्याच्यासाठी आलेली सगळी पत्रं त्याच्या हातात सोपवते. आपल्या आईने ही गोष्ट आपल्यापासून लपवल्याचं कळताच अमेरिगो पुन्हा मोडेनाला जाण्याचा निर्णय घेतो आणि आईला न सांगताच ट्रेनमधून निघून जातो तो परत न येण्यासाठी!

चित्रपटाच्या शेवटी अमेरिगो नेपल्सला आपल्या घरी येतो. तिथल्या वस्तूंमध्ये आपल्या आईचा स्पर्श शोधण्याचा प्रयत्न करतो. तिथेच त्याला पलंगाखाली सरकवलेलं धुळीनं माखलेलं व्हायोलिन मिळतं. त्याच्या आईने ते दुकानातून परत आणून ठेवलेलं असतं. त्या व्हायोलिनला कवटाळून रडणाऱ्या अमेरिगोवर कॅमेरा स्थिरावतो आणि चित्रपट संपतो. पण शेवटी ऐकू येणारं ,Those who let others go, love them more than those who keep them.’  हे वाक्य आपल्याला आईपणाच्या ताकदीची जाणीव करून देतो. आपल्या मुलाच्या हितासाठी अमेरिगोची आई त्याला पळून जाण्याची परवानगी देते. त्याला अडवत नाही आणि डेरनाला एका पत्रातून सांगते की,‘जर तू त्याला कायमचं ठेवून घेणार असशील तरच त्याला राहू दे तुझ्याकडे; नाहीतर लगेच इकडे पाठवून दे.’

यात अमेरिगोच्या आईचं नाव मुद्दाम लिहिलेलं नाही कारण स्वतःच्या मुलासाठी त्याच्यापासून कायमचं दूर राहणं स्वीकारणारी, वेळप्रसंगी कठोर निर्णय घेणारी ही आई जगातल्या सगळ्या आयांचं प्रतिनिधित्व करते. अमेरिगोचा कायमस्वरूपी स्वीकार करणाऱ्या डेरनामध्ये आपल्याला आई दिसतेच पण आधी दिसते ती माणुसकी. अशा अनेक मुलांना आसरा देऊन त्यांच्या आयुष्यात काही क्षण का होईना सुखाची, मायेची पखरण करणाऱ्या अशा अनेक डेरना, अनेक कुटुंब तेव्हा होती, यावर खरंच विश्वास ठेवता येत नाही. ही कुटुंब काही संपन्न, समृद्ध नव्हती; पण आपल्यातीलच घास ती या मुलांना देऊ करत होती. खरंच या हॅपीनेस ट्रेन उपक्रमान दक्षिण व उत्तर इटलीतील दरी थोड्याफार प्रमाणात सांधली गेली असेल. सामाजिक, राजकीय पातळीवर इतका महत्त्वाचा निर्णय या महिलांनी घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला, ही बाब खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण चित्रपट पाहत असताना आता काहीतरी वाईट होईल, संकट येईल, अमेरिगोला वाईट वागणूक मिळेल अशी शंकेची पाल मनात चुकचुकत राहते. पण नाही घडत असं काही. सगळं सुरळीत होतं. युद्धकाळात आपल्या मनाचा चांगुलपणा टिकवून ठेवणं किती अवघड असेल. पण हे घडलं आहे, हे नक्की. हा चित्रपट खऱ्या प्रसंगावर आधारित नाही पण अनुभवांवर आधारित आहे. सध्याच्या चित्रपटांच्या कथानकांमधील कपट, हिंसा, क्रौर्य यांच्या पार्श्वभूमीवर ‘चिल्ड्रन्स ट्रेन’ हा खरंच एक सुखद अपेक्षाभंग आहे.




©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

 

.