memories लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
memories लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

 

धागा आठवणींचा!

 


माझ्या माहेरी उभ्या महालक्ष्मी बसवायची पद्धत नाही. गौरी-गणपतीचे दिवस आले की आम्ही आमच्या आजीच्या मागे भुणभुण करायचो,आपल्याकडे का नसतात गं गौरी? तेव्हा आजी तिच्या गोष्टींच्या पोतडीतून एक गोष्ट काढायची आणि सांगायची. अगं, आपल्याकडे होत्या पूर्वी, पण आपलं गाव आहे ना, हडलगी अगदी डोंगराच्या मधोमध वसलेलं होतं बरं का! आजूबाजूला दाट जंगल होतं. एका वर्षी सगळी पूजा वगैरे झाली आणि आम्ही आत झोपलो होतो, तर वाघ आला आणि गौरी पाडून गेला. तेव्हापासून आपण बसवत नाही गौरी. आम्ही डोळे विस्फारून दरवेळी तेवढ्याच उत्सुकतेने ही गोष्ट ऐकायचो. जेव्हा जेव्हा ती ही गोष्ट सांगायची तेव्हा जाम भारी वाटायचं. डोगरांच्या मधोमध वसलेलं ते गाव, तिथलं अंधारं घर सगळं अगदी डोळ्यांसमोर जसच्या तसं उभं राहायचं. मनाचं तेवढ्यापुरतं समाधानही व्हायचं काहीतरी कारण आहे बरं का आपल्याक़डे गौरी नाहीत याचं!

यावर्षी माझ्या पाहण्यात एक ब्लॉग आला. त्यात असा उल्लेख होता की ज्यांच्याकडे काही कारणाने गौरी बसवण्यात खंड पडतो ते असं सांगतात की वाघाने त्या पाडल्या. तेव्हा आजीने सांगितलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण झाली. परंपरा, रीती यांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा धागा आहे, हे खरं. पण मला मात्र या गोष्टीमुळे आजीच्या गोष्टीतलं ते घर, डोंगर धूसर होतात की काय, असं वाटायला लागलं. खरं म्हणजे वाईटच वाटत होतं मला की आजीनं सांगितलेली गोष्ट खरी नाही तर!

परवा एका लग्नानिमित्त आम्ही बेळगावला गेलो होतो. आमचं गाव हडलगा/हडलगी तिथून जवळच होतं. त्यामुळे आजवर ज्यांनी ते गाव कधीच पाहिलं नाही अशी आमच्या पिढीतली मंडळी आणि सगळे मोठे मिळून त्या गावी गेलो. हे सगळं पाहून आजीची खूप आठवण झाली. कधीही न पाहिलेल्या पणजी-पणजोबांच्या आठवणींना तिथे उजाळा मिळाला. आई, काका, मावशी यांनी तिथल्या गोष्टी सांगितल्या. तिथलं ते घर, आजूबाजूचा परिसर पाहताना मनातल्या त्या गोष्टीवर साचलेलं धुकं आपोआप दूर झालं. आजच्या काळातही दुर्गम म्हणावं असं ते गाव आहे. तिथे देऊळ आहे, घर आहे.

तिथे गेल्यावर मी स्वतःला पुन्हा एकदा समजवलं, आजी सांगत होती तेच खऱं होतं. रीत वगैरे सब झूठ! किमान माझ्यासाठी तरी! माझ्या लहानपणीच्या ठेव्यामधली ती एक अमूल्य गोष्ट आहे, जिने मला आमच्या मूळ गावाशी बांधून ठेवलं आहे. त्यामुळे मी तरी तिला धक्का पोहोचू देणार नाही. तिथे जाऊन जे वाटलं ते शब्दातीत आहे. दिसायला सगळं नेहमीचंच होतं पण आमच्यातल्या प्रत्येकाला त्या जागेविषयी जे वाटतं होतं ते महत्त्वाचं होत. काहीजणांच्या आठवणी प्रत्यक्ष होत्या, तर आमच्यासारख्यांच्या ऐकीव. पण त्याच आठवणींच्या धाग्याने आम्हाला बांधून ठेवलं आहे, हे नक्की. काळाच्या ओघात गोष्टी नाहीशा होतात, आठवणी राहतात. पण अशा अमूर्त आठवणींमध्ये खूप मोठी ताकद असते, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा जाणवलं.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने