शब्दांचे बदलते लक्ष्य!
शब्दांच्या दुनियेत रमणाऱ्या
लोकांना शब्द, शब्दार्थ, त्यांचे रूढ अर्थ, गर्भितार्थ यांच्याशी कायमच खेळायला
आवडतं. काव्यशास्रामध्ये शब्द, शब्दशक्ती यांचा बराच ऊहोपोह झाला आहे. ‘प्रत्येक
शब्दापासून अर्थाचा जो बोध होतो तो अर्थबोध करवून देणारा जो व्यापार आहे -
म्हणजेच जी क्रिया आहे ती शब्दाची शक्ती आहे.’ शब्दाचे तीन प्रकार आहेत – वाचक,
लक्षक आणि व्यंजक. या शब्दांच्या तीन शक्ती अभिधा, लक्षणा आणि व्यंजना आहेत आणि त्यांचे
अर्थ अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ. आपण सध्या वाच्यार्थ आणि
लक्ष्यार्थ म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. खरंतर हा खूप गहन विषय आहे. पण
लेखाच्या संदर्भाने थोडक्यात स्पष्ट करत आहे. लक्ष्यार्थाचे प्रकार, व्यंग्यार्थ
यांचे मुद्दाम स्पष्टीकरण केलेले नाही.
वाच्यार्थ
किंवा शब्दार्थ म्हणजे ‘साक्षात् संकेतितं अर्थम् यः अभिधत्ते स वाचकः।’
थोडक्यात शब्दाचा थेट, मूळ अर्थ. शब्द उच्चारल्यानंतर जी आकृती
समोर उभी राहते ती आकृती. उदा. ‘गाय’ म्हणजे चार पाय, सड आणि शिंग असणारा एक पशु. ‘वाघ’
म्हणजे एक रानटी प्राणी.
पुढचा अर्थ आहे लक्ष्यार्थ – ‘मुख्यार्थबाधे
तद्योगे रूढितः अथ प्रयोजनात्।
अन्यः
अर्थः लक्ष्यते यत् सा लक्षणा आरोपिता क्रिया।।’
“ती
सुरेखा ना, गाय आहे अगदी! तो रमेश ना फार शहाणा आहे!” यांतील ‘गाय, शहाणा’ या
शब्दांचा अर्थ नेमका काय घ्यायचा, हे सुज्ञालाच कळते. जिथे शब्दाचा मुख्य अर्थ दूर
सारून आपल्याला हवा असलेला अर्थ मिळवण्यासाठी एखादी रूढी किंवा कारणाचा आसरा घेतला
जातो, तिथे येतो लक्ष्यार्थ. म्हणजेच एखादा
शब्द विशिष्ट पद्धतीने वापरला जात असेल, तर त्या अनुषंगाने त्या शब्दाचा वापर
करणे.
आजच्या आपल्या लेखाचा रोख आहे
तो शब्दांच्या लक्ष्यार्थावर. वर्षानुवर्षं ज्या संदर्भाने लक्ष्यार्थाचा वापर होत
आहे ते संदर्भही काळानुसार बदलत चालले आहेत. काही शब्दांच्या चुकीच्या वापरामुळे, काही
प्रचलित वापरांना भिन्न वळण दिल्याने. हे
आजकाल मुख्यत्वे खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत पाहायला मिळते. काही वर्षापूर्वीपर्यंत एखादा
बकाबका खाऊ लागला तर “बकासुरासारखा खाऊ नकोस रे,” हा संवाद कानी पडायचा. कोणाला
खूप भूक लागली असेल, तर “ओत ते पातेलं त्याच्या ताटात,” “याच्या दिवसभराच्या
खादाडीला कंटाळले बाई,” असे संवाद घराघरातून ऐकू यायचे. पण आता ‘बकासुर, बादलीभर अमुकतमुक, खादाडी’ हे
आणि असे अनेक नकारात्मक अर्थाने वापरले जाणारे शब्द उपहारगृहांच्या नावासाठी
वापरले जात आहे. पूर्वी योद्धे रणांगणावर शत्रूची ‘खांडोळी’ करायचे. पण आता
चतुष्पादांची ‘खांडोळी’ करणारी उपहारगृहे दिसतात. एखादी व्यक्ती आवडणे यासाठी
पूर्वी ‘मनात भरणे’ हा वाक्प्रचार वापरला जाई. आता मात्र हिंदीच्या प्रभावाखाली
येऊन ‘तो व्यक्ती मनात उतरतो’. ‘मनातून
उतरणे’ मराठीत अगदी विरुद्ध अर्थाने वापरले जाते, हे ते लिहिणाऱ्याच्या
बोलणाऱ्याच्या गावीही नसते. आता ‘गावी नसणे’ याचं पुढे काय होईल माहीत नाही. आणि हो,
‘तो’ व्यक्तीच! अनेक ठिकाणी माणूस, इसम या शब्दांच्या ऐवजी व्यक्ती शब्द वापरला
जातो खरा;
पण मराठीत ‘ती’ व्यक्ती असते ‘तो’ व्यक्ती नाही, याची खबरदारी घेतली
जात नाही.
ज्या भाषेत बदल होतात तीच
भाषा जिवंत राहते, प्रवाही राहते, ही
गोष्ट मला मान्य आहे. पण मूळ भाषेची कास सोडून भाषेचा प्रवाह भरकटू नये, हीच
अपेक्षा आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स, टीव्ही सिरिअल्स यांचा जमाना आहे. अशात
पात्रांच्या तोंडी दिले गेलेले संवाद नकळतपणे कधी प्रचलित होतात कळतही नाही.
प्रमाण भाषेव्यतिरिक्त स्लॅंगही असणे आणि कित्येकांना
ती न कळणे, ही आता सामान्य गोष्ट आहे. पण समाजाच्या बदलत्या मानसिकतेनुसार
रूढार्थांमध्ये होणाऱ्या बदलांचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे, असे वाटते.
टीप: या लेखाद्वारे कोणावरही वैयक्तिक टीका करण्याचा माझा उद्देश नाही. फक्त
दिसणाऱ्या बदलांची नोंद घ्यावीशी वाटलं इतकंच.
©तृप्ती कुलकर्णी
छायाचित्र गुगलच्या सौजन्याने
