नियमांचं कोंदण!
कोणे एके काळी भासानं ‘स्वप्नवासवदत्तम्’
नाटकामध्ये स्वप्नप्रसंग रचला. त्यात राजा उदयनाच्या स्वप्नात आलेली वासवदत्ता आणि
रंगमंचावरील प्रत्यक्षातील वासवदत्ता यांचा अद्भुत ताळमेळ साधून त्याने सुंदर
स्वप्नप्रसंग रचला. भासाची ही कलाकृती अजरामर झाली. त्यातील स्वप्नप्रसंग हे एक
नितांतसुंदर काव्यच आहे. पण याच स्वप्नप्रसंगात राजा उदयनाला रंगमंचावर निद्राधीन
दाखवण्यात आल्यामुळे या नाटकावर आक्षेप घेतले गेले. कारण भासानं नाट्यशास्त्राच्या
नियमांचं पालन केलं नाही म्हणे! रंगमंचावर निद्रा, युद्ध असे प्रसंग शक्यतो दाखवू
नयेत, हा तो नियम. भासाने त्याच्या नाटकांमध्ये असे अनेक नियम मोडले म्हणा! पण काळाच्या मोजपट्टीवर भासाचा काळ हा भरतमुनींच्या
आधीचा दाखवल्यामुळे नाट्यशास्त्राचे नियम भासाला लागू होत नाहीत, असा युक्तिवाद
करण्यात येतो.
भासाने त्याच्या काळी लागू
नसलेल्या अनेक नियमांचं उल्लंघन केलंच! त्यातूनच तर भासनाटकचक्रातील तेरा
वैविध्यपूर्ण नाटकं जन्माला आली. पण आजच्या या लेखात मला वेगळंच काही म्हणायचं
आहे. आजकालच्या दृक्श्राव्य कलाकृतींमध्ये वापरण्यात आलेले ‘रस आणि रसनिष्पती’
याबद्दल थोडं बोलायचं आहे. मला माहीत आहे, हा लेख थोडा ‘वरातीमागून घोडे’ वर्गात
मोडणारा आहे. पण लिहिताना ‘खूप लिहावं लागेल’ म्हणून केलेला कंटाळा भोवला, बाकी
काही नाही.
तर, आजकालचे चित्रपट, ओटीटी
यांच्यामध्ये दिसणारा प्रमुख रस म्हणजे ‘बीभत्स’ ज्याचा मूळ भाव आहे ‘जुगुप्सा’
म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीची ‘किळस’. एखादी गोष्ट पडद्यावर दाखवताना त्या रसाचा
कडेलोट केला, तरच आपल्या जन्माचे सार्थक होणार आहे, अशा आविर्भावात पडद्यावर सर्वकाही
योजलेलं दिसतं. आणि या कडेलोटाचा अंतिम
परिणाम म्हणजे जुगुप्सा.
उदा. पूर्वी दोन
सूर्यफुलांच्या आड होणाऱ्या शृंगाराचा आता होणारा कडेलोट, पूर्वी बंदुकीच्या
गोळीच्या आवाजाने सूचित केलेल्या मुत्यूऐवजी एखाद्याच्या मेंदूला भेदणारं दृश्य, उडवलेलं
मुंडकं आणि धड यांचं वेगळं होणं यातला वीररस, गरिबीच्या प्रदर्शनातून जाणूनबुजून मांडलेला
कारुण्याचा बाजार, तंत्रज्ञानाच्या कृपेने चाललेली अद्भुताची लयलूट. स्टँडअप
कॉमेडी वगैरेमधून होणाऱ्या हास्याच्या लयलुटीची कथा सर्वज्ञातच आहे, त्याबद्दल जास्त
न बोललेलंच बरं. रौद्र, भयानक आणि बीभत्स तर एकमेकांचे पक्के साथीदार झाले आहेत.
या संदर्भात शांत रसाविषयी फार काही न बोलणं बरं.
आजच्या या ओटीटी कंटेटला
स्वातंत्र्याच्या नावाखाली कसलाच धरबंद उरलेला नाही. यांनी लोकांची ज्ञानेंद्रिये
पूर्णपणे बधिर करण्याचा विडाच उचलला आहे जणू! त्यामुळे सतत काहीतरी नवे पाहण्याचा,
ऐकण्याचा, अनुभवण्याचा नाद असलेली माझ्यासारखी माणसं एखादा एपिसोड पाहून कंटाळून
जातात. या लोकाचं धक्कातंत्रही आता पुरातन झालं आहे.
चित्रपटगृहात सर्व गोष्टी
दाखवता येत नाहीत. ओटीटीवर एक अस्वीकरण - डिस्क्लेमर टाकून काहीही दाखवलं तरी चालतं,
हा ट्रेंडच आहे सध्याचा. भासाने जरी नियमांचं उल्लंघन केलं तरी त्यातून त्यानं
रसनिष्पत्ती साधली आहे. आपल्या प्रेक्षकांना आनंद दिला आहे. अलीकडे आजकालच्या या
सिरीजना नियमांचं कुंपण असावं, असं वाटू लागलंय. सूचक घटकांमधून प्रेक्षकांपर्यंत
भावना पोहोचवण्यासाठी मोठी ताकद लागते. कदाचित काही नियम लागू केले तर ती प्रतिभा
पुन्हा जागी होईल. रसांच्या परिपोषाला हातभार लागेल.
चुकीच्या गोष्टींचं गौरवीकरण
करणं, प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू दाखवून उदात्तीकरण करणं, या गोष्टी तरी उणावतील.
या वेबसिरीज पाहून समाजात बळावणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. या गोष्टीस
अपवाद आहेतच. काही उत्कृष्ट कंटेंटही या ओटीटींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत
पोहोचत आहे. पण जे सातत्याने दाखवलं जात आहे, मांडलं जात आहे, तेच योग्य आहे, अशी
भावना बळावत चालली आहे. त्यासाठी या ओटीटीचा वापर प्रेक्षक म्हणून विवेकानं करणं
गरजेचं आहे. तरच या गोष्टी नियमित होतील.
कुपी उघडी राहिली तर
अत्तराच्या कुपीतला सुगंध उडून जातो, तसंच या खुल्या मनोरंजनामुळे त्यातला आनंदही
नष्ट होईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. मागे एकदा मीच कधीतरी कुठल्याशा लेखात
फुशारकी मारत म्हटलं होतं, ‘नियम हे मोडण्यासाठीच असतात’. पण हे नियम भासासारख्या
पात्र माणसांनीच मोडण्याचाही एक नियम आणावा लागेल, असं आता वाटतंय.
पुढील काही लेखांमध्ये
अतिरेक न करता रसनिष्पत्तीचा अनुभव देणाऱ्या माझ्या काही आवडत्या सिरीजविषयी लिहिण्याचा
प्रयत्न करणार आहे.