शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

इट्स ऑल अबाऊट द राईट टर्न





इट्स ऑल अबाऊट द राईट टर्न

काही चित्रपट असे असतात जे आपल्याला आपल्यातल्या चांगुलपणाची आठवण करून देतात. 'द ब्लाइंड साइड.'  हा असाच एक चित्रपट. पहिल्यांदा हा पाहिला तो सँड्रा बुलकच्या प्रेमाखातर. ही बाई कुठल्याही पिक्चरमध्ये असेल, तरी तो मी पाहते... फक्त तिच्याचसाठी. पण तो एक वेगळा विषय आहे. पहिल्यांदा पाहिला तेव्हा सँड्रासाठी पाहिला. मायकल ओहर नावाच्या एका फुटबॉलपटूच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आहे. ण माझ्यासाठी ही फक्त त्याची नाही, तर ली ॲन टूही, तिचं आख्खं कुटुंब या सगळ्यांची गोष्ट आहे.

 कुठल्याही प्रकारचा बॉल हाताळण्याच्या कौशल्यामुळे शिक्षण मध्येच सोडावं लागलेल्या मायकलला म्हणजेच  बिग माईकला एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळतो. तिथे आपला वर्ण, धिप्पाड देहयष्टी यांमुळे उठून दिसणारा 'बिग माईक' खरंतर तिथल्या व्यवस्थेत रुळण्याचा जीवापाड प्रयत्न करत असतो. पण ज्यांच्या जगण्याचा, टिकून राहण्याचाच प्रश्न इतका मोठा आहे अशांना समाजात वावरायच्या पद्धतींची काय ओळख असणार! त्यामुळे शाळेतल्या विश्वाची पहिली झलक मिळाल्यानंतर माईक गोंधळून जातो. ज्यांच्या घरात तो राहत असतो, तिथे त्याच्यावरून वाद होतात. तिथून तो बाहेर पडतो. ना राहायला निवारा, ना पोटाची सोय. त्यामुळे  इथेतिथे पडलेले खाण्याचे कागदी डब्बे गोळा करून त्यातलं उरलेलं खाणं खात असतो. कधी शाळेच्या आवारात आणि तिथून हाकलून दिल्यानंतर पब्लिक वॉशिंग एरियामध्ये रात्रीचा आसरा शोधत असतो. अशातच  मुलांच्या शाळेतल्या एका कार्यक्रमावरून परत येताना ली ॲनला बिग माईक दिसतो. ती आपल्या मुलाला विचारते याचं नाव काय. तिचा मुलगा एसजे त्याला आम्ही 'बिग माईक'च म्हणतो असं सांगतो. एवढ्या थंडीत बाहेर फिरणाऱ्या या मुलाला 'तू कुठे जातोयस,' असं विचारल्यावर 'जिम' हे मिळालेलं उत्तर ऐकून ते पुढे जातात खरे. पण तिला काहीतरी वेगळं जाणवतं आणि ती आपल्या नवऱ्याला गाडी वळवायला सांगते. आणि हेच वळणं मायकलच्या आयुष्यासाठी निर्णायक ठरतं. ती  त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारते "तुझ्याकडे जाण्यासाठी जागाआहे का?" तो काही न बोलता उभा राहतो. 
एका क्षणाचाही विचार न करता ली ॲन त्याला घरी घेऊन येते. रात्री झोपायला जागा देते. एका अनोळखी व्यक्तीला आपल्या घरात रात्री आसरा देण्यासाठी किती धमक असावी लागते, हे वेगळं सांगायची गरज नाही. सकाळी उठल्यानंतर आपण कशालाही तोंड द्यायला तयार राहू, तसाही इन्शुरन्स आहेच, असा विनोद करून ती माईकला पाहायला जाते.  अंथरुणाची नीट घडी करून एका प्लास्टिकच्या पिशवीत सामावलेलं आपलं पूर्ण आयुष्य घेऊन निघालेल्या माईकला ती थांबवते त्याची चौकशी करते. त्याला खायला प्यायला देते. कोणीतरी आपल्याशी इतकं चांगलं वागत आहे ही गोष्टच माईकसाठी नवीन असते. पण थोड्या दिवसांनतर ती त्याला विचारते की 'तू इथे रोज झोपायला येणार असशील, तर मी तुझ्यासाठी बेडची व्यवस्था करते. एव्हाना माझ्या भल्याचांगल्या सोफ्याची तू वाट लावलीच आहेस. ती तू आणखी लावू नयेस, असं वाटतंय मला म्हणून विचारतेय बाकी काही नाही.' यावर माईक तिला 'हो' म्हणतो. त्यानंतर ती त्याच्यासाठी आख्खी एक रूम तयार करते. स्वतःचा बेडही नसणाऱ्या माईकला ती आपल्या घरातली एक रुम देते
.
यानंतर सुरू होतो 'माईक ते मायकलचा प्रवास'...माईकच्या प्रोटेक्टिव्ह इन्स्टिक्टला बरोब्बर हेरून फुटबॉलमध्ये त्याचा वापर करून घेणं, एका कृष्णवर्णीय मुलाला स्वतःच्या घरात आपल्या तरुण मुलीबरोबर आणि लहान मुलाबरोबर ठेवून घेणं. नकळतपणे आईच्या मायेची ऊब देणं.  लोकांनी शंकाकुशंका घेतल्यानंतरही ठाम राहणं, त्याला कुटुंबामध्ये सामावून घेणं आणि अनेक भावनिक आंदोलनांचा सामना करून शेवटी त्याला दत्तक घेणं, या ली ॲनच्या कृतींमधून तिचं व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. आणि हे सारं तिने आधी ठरवलेलं नाही. आल्या प्रसंगाला सामोरं जातानाची ही तिची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे, हे जाणवल्यावर तर हा प्रवास आणखीनच लक्षवेधी ठरतो. 

ली ॲनने माईकला मायकल बनवलं. त्यानंही तिच्यातलं माणूसपण ओळखलं. तिने पुढे केलेला हात विश्वासानं धरला. पण तो हात पुढे करण्याचा विश्वास, ते एका क्षणाचं सामर्थ्य आणि घेतलेली जबाबदारी काही झालं तरी पार पाडण्याचा आत्मविश्वास असणारी ली ॲन माझी भारी आवडती आहे.  हा एका प्रसिद्ध फुटबॉलपटूचा जीवनप्रवास आहेच, पण त्याखेरीज शिक्षणाच्या, प्रगतीच्या संधींपासून वंचित असणाऱ्या मायकलला हक्काने त्या संधी मिळवून देण्याचा, त्या स्फूर्तीचाही हा प्रवास आहे. अतिशय संयत पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता हा विषय या चित्रपटात मांडला गेला आहे. 

मी हा चित्रपट 'कथार्सिस किंवा साधारणीकरण' साधण्यासाठी पाहते. म्हणजे काय हे पुन्हा कधीतरी सांगेनच. पण थोडक्यात सांगायचं तर, एखादी कलाकृती पाहिल्यावर आपल्या मनात उमटणारे भाव आपल्याला कळणं. मग ते हसू असो रडू असो! त्यानं एक आगळं समाधान लाभतं. असाच आगळंवेगळं समाधान देणारा आणि आपणही आयुष्यात असा 'राईट टर्न' कधीतरी घ्यावा अशी जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.


© तृप्ती अ. कुलकर्णी

(छायाचित्र: अर्थात गुगलच्या सौजन्याने)







1 टिप्पणी: