गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 

सोलापूरचा बैलबाजार आणि आम्ही!




लहानपणी डिसेंबर, जानेवारी म्हटलं की आमच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारत असे. त्याचं कारण म्हणजे जानेवारी महिन्यात सोलापूरचं ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर महाराजांच्या उत्सवात भरणारी गड्ड्याची जत्रा. होम मैदानावर भरणारी ही जत्रा म्हणजे येक नंबरची जत्राच! मोठ्या मैदानावर उभारलेले तंबू, वेगवेगळे पाळणे, मौत का कुआ, आरश्यांची गंमत दाखवणारं दालन, पन्नालाल गाढवाचे खेळ, खाण्यापिण्याचे स्टॉल्स सगळं काही असायचं. हे होम मैदान आमच्या हरिभाई शाळेच्या समोरच असल्यामुळे आम्हाला दिवसाही पहायला मिळायचं हे सगळं. दिवसा सुस्तावलेलं हे मैदान रात्री कात टाकून उत्साहाची, चैतन्याची, रोषणाईच्या झगमगाटाची झूल पांघरून मनोरंजनासाठी सज्ज व्हायचं. घरातल्या मोठ्यांच्या मागे लागून आम्हीपण एक दिवस गड्ड्यावर जाऊन यायचो. कधी नव्हे ते तिथे मिळणारा भाग्यश्रीचा वडा खायला मिळायचा, दूध पंढरीचं सुगंधी दूधही मिळायचं. वर्षभराच्या आठवणी घेऊन आम्ही परत यायचो.

पण या गड्ड्याबरोबरच आमच्यासाठी खास होते ते म्हणजे डिसेंबर महिन्यातले शेवटच्या आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार आणि संक्रातीपर्यंतचे सगळेच दिवस. आमच्या घराच्या अगदी समोर रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरच्या मैदानात भरायचा जनावरांचा बाजार!  डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंगळवारी सकाळी सकाळी धुकं असताना काही टेम्पो येऊन थांबायचे, त्यातून म्हशी, बैल, शेळ्या उतरवल्या जायच्या आणि मग संध्याकाळी हा एक दिवसाचा बाजार संपायचा. आम्हाला थोडं वाईट वाटायचं. हे असं दोन आठवडे चालायचं. मग जानेवारी सुरू झाल्यावर ही सगळी मंडळी मुक्कामी यायची. दगडांची चौकट रचून विक्रेते आपापल्या सीमा आखून जायचे. मग तिथं आपापली जनावरं घेऊन यायचे. हळूहळू मैदानावरची जमीन दिसेनाशी व्हायची. सगळीकडे फक्त जनावरं दिसायची. रस्त्यावरून चालणं मुश्किल होऊन जायचं. सोलापूरची आणखी एक मजा म्हणजे आम्हाला ख्रिसमस व्हेकेशन नसायची तर ‘गड्ड्याची सुट्टी’ असायची तीही सात दिवस. मग काय आम्ही आणि तो बैलांचा बाजार एवढंच काय ते आमचं विश्व असायचं.

सकाळी उठल्यापासून गॅलरीमधून लांबपर्यंत पसरलेले ते बैल पाहत दिवस सुरू व्हायचा आणि तिथे आलेल्या विक्रेत्यांच्या मनोरंजानासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या आवाजाने तो संपायचा. देवळात सिनेमे दाखवले जायचे, लावणी असायची, गाणी असायची. झोपताना आम्ही हे सगळं ऐकत बसायचो किती तरी वेळ...हो ऐकतच कारण तिथे जायची काही सोय नव्हती. सकाळी आंघोळ आटोपून, अभ्यास उरकून आम्ही खाली पळायचो. मग त्या बाजारातून धिटाईने एक फेरफटका मारायचो. आम्हाला आवडलेल्या उंच्यापुऱ्या बैलांची नावं विचारायचो तिथल्या काकांना. तेव्हा किंमत वगैरे विचारण्याएवढे शहाणे नव्हतो. मग रोज तोच एक उद्योग असायचा आपल्या आवडीचा बैल विकला गेला की नाही हे पाहायचं. आपला बैल विकला गेला की आनंद तर व्हायचाच, पण दुःखही व्हायचं की बाकीच्यांचे आहेत अजून  आपलाच विकला गेला. मग परत दुसरा आवडता बैल शोधायचा. जनावर विकलं गेल्यावर त्याच्या अंगावर झूल चढवायचे, त्याच्या शिंगांना गोंडे बांधायचे. त्याची मिरवणूक काढून देवळासमोर आणून उभं करत आणि तिथे वाकून त्याला नमस्कार करायला लावत. त्यामुळे वाजंत्रीचा आवाज आला की आम्हाला कळायचं की आता बैल विकला गेला. मग ती मिरवणूक पाहायला आम्ही लगेच हजर व्हायचो. जत्रेतून फिरणाऱ्या चंद्रतारा बिडीची जाहिरात आम्हालाही पाठ व्हायची...“तूतूतूतूतारा....चंद्रतारा बिडी ओढा!” घरच्यांच्या कटाक्षांकडे दुर्लक्ष करून आम्ही त्या जाहिरातीची बेधडक री ओढायचो.

 दूरच्या कोपऱ्यात म्हशी असायच्या. मग तिथे जाऊन चिकाचं दूध आणायचं, त्याचा खरवस व्हायचा. हे सगळं करताना हे बैल, म्हशी, गायी हेच आमचं विश्व होऊन जायचे. सकाळी सहा वाजता अंधारात तिथल्या बैलांच्या गळ्यात बांधलेला घंटांचा आवाज, विझत जाणाऱ्या शेकोटीतून निघणारा धूर, तिथे मुक्कामी असणाऱ्या लोकांचा गप्पांचा फड हे सगळं अनुभवत शिकवणीला जायचे मी. तिथल्या स्टॉल्सवर उकळणाऱ्या चहाचा वास, तळलेल्या भज्यांचा वास, हे सगळं काही औरच होतं. थोडी रमतगमत, ही मजा अनुभवत जायचे. आईनं बाजारातून सामान आणायला सांगितल्यावर या बैलांमधूनच वाट काढून जावं लागायचं. गावातल्या जीवनशैलीची सवय नसलेल्या आम्हाला सुरुवातीला थोडी भीती वाटायची या बैलांची, त्यांच्या मोठ्या-मोठ्या शिंगांची. पण तिथले काका सांगायचे,“ काही नाही करत तो. जा बिनधास्त.” मग भीती कमी व्हायची. बिनधास्त चालत, सायकलवर बैलांच्या गर्दीतून वाट काढत जायचो मग.

एरवीच्या शहरी जीवनात काही दिवस का होईना ग्रामीण जीवनाची एक झलक पाहायला मिळायची. आमच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आपली शिदोरी उघडून बसणारी, तीन दगडांची चूल मांडून काहीतरी खायला बनवणारी ती माणसं, गायी, म्हशी आणि बैलांचे ते आवाज, त्यांची ती गर्दी यामुळे आम्ही एका वेगळ्याच जगात वावरायचो. मित्रमैत्रीणींमध्ये फुशारक्या मारायचो,‘आमच्या बिल्डिंगसमोर ना एवढा मोठा बैल आहे यावर्षी...’ खरंतर काही संबंध नसायचा या सगळ्याचा आमच्याशी. पण त्या तेवढ्या मोठ्या पसाऱ्यात आम्ही सगळी चिरकुट मुलं आपण किती भारी आहोत आपल्याला हे सगळं पाहता येतंय, या मिजाशीत वावरायचो. आता कळतंय की हे सगळं आम्ही अनुभवलं, मनात साठवलं, मुक्तपणे त्या बाजारात वावरलो हे आमचं नशीब होतं. खूप मोठ्या आर्थिक उलाढालीचं केंद्र असणाऱ्या  त्या बाजाराचं स्वरूप आमच्यासाठी मात्र वेगळंच होतं. तिथली आर्थिक गणितं आमच्या गावीही नव्हती.  संक्रातीनंतर हळूहळू बाजार संपत यायचा. सुरुवातीचा जोर उतरायचा, जनावरं विकली जायची, विक्रेते मुक्काम हलवायचे. शाळेतून त्या रिकाम्या रस्त्यावरून येताना नकळत आवंढा गिळला जायचा आणि मनाची समजूत घालायचो पुढल्या वर्षी आहेच की परत हे सगळं... आता तो बाजार भरत नाही तितक्या उत्साहात, तितकी गर्दीही नसते तिथे. पण तो बाजार आजही आम्हा सगळ्या मुलांच्या मनात तसाच आहे, याची खात्री आहे मला.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा