सोमवार, १२ एप्रिल, २०२१

हंपी येथील हजारराम मंदिरातील मारीचवधाचे शिल्प

हंपी येथील हजारराम मंदिरातील मारीचवधाचे शिल्प 

   आता मी इथे जे लेख पोस्ट करणार आहे, त्यातील काही आधीच फेसबुकवर टाकले आहेत. पण त्या लेखांचं संकलन एका ठिकाणी करण्यासाठी मी पुन्हा काही लेख इथे टाकत आहे. नवीन लेख लवकरच प्रकाशित करेन.



                              एका पुस्तकाच्या अनुवादाच्या निमित्ताने संदर्भ शोधत असताना हंपी येथील हजारराम मंदिरातील मारीचवधाचे शिल्प समोर आले. त्यातील मारीचाचे शिल्प पाहून अचानक क्रॉनिकल्स ऑफ नार्नियाची आठवण झाली. आता तुम्ही म्हणाल इथे त्याचा काय संबंधॽ अर्धा माणूस आणि अर्धा पशु ही संकल्पना काही साहित्यासाठी नवीन नाही. यावर अनेक अभ्यास झालेही असतील. या शिल्पांचेही झाले असतील. पण नार्नियामधले अनेक योद्धे आणि हंपीच्या मंदिरातील मारीचाचं हे शिल्प यात किती जास्त साधर्म्य आहे, असा विचार सहज मनात येऊन गेला. आज आपल्यासमोर दृक्‌श्राव्य रूपात उभं असणारं हे चित्र आणि प्राचीन काळातील मारिचाचं शिल्प यात काहीच फरक नाही. फरक आहे तो फक्त कलेच्या अभिव्यकतीच्या माध्यमात. माध्यम जरी बदललं तरी कलेच बीज मात्र तेच आहे. त्यातून येणारे धुमारे युगायुगांत बदलत जातात; पण चेतना देणारं बीज मात्र तेच आहे याची साक्ष पटते. कदाचित, छांदोग्योपनिषदातील आरुणि श्वेतकेतूच्या गोष्टीमधल्या वटवृक्षाच्या बीजामध्ये जे न दिसणारं तत्त्व आहे; ज्यातून ही सृष्टी निर्माण होते तेच हे अविनाशी तत्त्व असावं. कलेचं सार, कलेचं बीज जे अमूर्त, अव्यक्त आहे ज्यातून कलाकार आपल्या साधनांनी तिला अभिव्यक्त करतो. ज्यामुळे कालपटलावर आपल्याला एकच गोष्ट वेगवेगळ्या माध्यमांतून तरीही एकाच पद्धतीने चित्रित केली गेलेली दिसते. हा असाच एक सहज मांडावासा वाटलेला विचार .


(छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने)

©तृप्ती अ.कुलकर्णी

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा