मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

न खाल्लेल्या बामगोळ्याची गोष्ट!

न खाल्लेल्या बामगोळ्याची गोष्ट!


                           आमची सोलापूरची शाळा हरिभाई देवकरण जगात वर्ल्डफेमस! या हरिभाईमधून बाहेर पडलेले आम्ही विद्यार्थी. चौथीनंतर नू.म.वि. च्या बाळबोध विहिरीतून आम्ही सगळे हरिभाईच्या महासागरात लोटले गेलो होतो. पहिल्या दिवशीच शाळेचं ते भलंमोठं मैदान…नाही दोन मैदानं, भल्यामोठ्या इमारती, प्रयोगशाळा, पाण्याची मोठी टाकी,

कलाभवन आणि  मुख्य म्हणजे भांडार. या सगळ्या गोष्टी पाहून चकित व्हायला झालं होतं. भांडार म्हणजे माझ्यासाठी तर अलिबाबाची गुहाच होती. तिथे ५ पैशाला मिळणाऱ्या दूधाच्या रंगीबेरंगी गोळ्या, चिक्की म्हणजे खजिना होता. या झाल्या शाळेतल्या गोष्टी. शाळेच्या गेटसमोर पेरू, चिक्की, चिंचगोळी, स्टीकर्स विकायला बसणाऱ्या मावशी तर आत्ताच्या सँटाक्लॉजपेक्षा कमी नव्हत्या. पण या सगळ्यात अजून एक गोष्ट होती ती म्हणजे सय्यदची गाडी! सायकलवरून शाळेत आत जाताना दिसायची ही दिमाखदार गाडी. लाल, पिवळ्या, हिरव्या रंगीबेरंगी सरबतांच्या बाटल्या तिथं रांगेनं मांडलेल्या असायच्या. एका पोत्याखालून थंडगार बर्फ डोकावत असायचा. सय्यदचं ते बर्फ खिसायचं चाकाचं यंत्र खुणावत असायचं. सफाईनं एका ठरावीक लयीत त्याचे हात फिरत असायचे त्या यंत्रावर. मग त्याच्या हातात यायचा एक लुसलुशीत दिसणारा बर्फाचा गोळा. त्यात तो एक काडी खुपसायचा.  मग समोर उभ्या असलेल्या आशाळभूत नजरेनं पाहणाऱ्या मुलानं जो फ्लेवर मागितलेला असेल, ते सरबत त्या पांढऱ्याशुभ्र गोळ्यावर सढळ हातानं ओतायचा. तो गोळा तोंडाजवळ नेऊन त्या मुलानं एक भुरका मारला की त्या गोळ्याचा  त्याच्या चेहऱ्यावर पसरणारा आनंद काय वर्णावा! 


                       हा आमच्या शाळेसमोर उभ्या राहणाऱ्या सय्यद मस्तानीवाल्याचा बामगोळा. ज्याची चव मी उभ्या शालेय आयुष्यात कधीच चाखली नाही. का तर बाहेरचं खाणं निषिद्ध! त्यातून शाळेत असणारी मोठी भावंड कधी घरी जाऊन तक्रार करतील याचा नेम नाही. आणि या तक्रारींच्या कटु अनुभवचा दमदार ठसा पहिल्याच टर्ममध्ये पाठीशी नाही, तर पाठीवर उमटला होता. शाळेबाहेर मिळणाऱ्या पेरूच्या नादात पहिल्या सहामाहीचा गणिताचा पेपर मी अवघ्या तासाभरात उरकला होता. आणि आजींकडून मस्तपैकी पेरू घेऊन मोठ्या बहि‍णींचा पेपर संपण्याची वाट पाहत बसले होते. त्या परीक्षेचा निकाल लागल्यावर माझा जो काही निकाल लागला होता तो न सांगितलेलाच बरा! 


                     पण तेव्हापासून शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या या सगळ्या मेव्यापासून मी लांबच होते. पण शाळेत येताजाता त्या बामगोळ्याचे रंग पाहायला खूप आवडायचं मला. मोठं झाल्यावर मिनरल वॉटरच्या बर्फाचा बामगोळा खाल्ला खूप वेळा! पण तो खातानाही मनात सय्यदच्या गाडीवरचा तो बामगोळा होताच. आमच्या शाळेबाहेरच्या त्या सय्यद मस्तानीवाल्याचं निधन झालं, अशी बातमी वाचली आणि पुन्हा एकदा माझं मन तिथे त्याच्या गाडीसमोर जाऊन उभं राहिलं. त्या बामगोळ्याची चव कशी असेल, या प्रश्नाचं उत्तर आता कदाचित मिळणारही नाही. आता तिथे जाऊन तो बामगोळा खाल्ला, तरी त्या शाळकरी वयात जो आनंद, जी चव चाखायला मिळाली असती ती मात्र आता मिळणार नाही. आयुष्यातले अनुभवही असेच असतात ना! म्हणूनच ज्या वेळेस जे अनुभववासं वाटेल त्याचा आनंद घ्यावा. नाहीतर ती गोष्ट या न खाल्लेल्या बामगोळ्यासारखी कायम मनात राहते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा