राखावा आपुला पैस!
चित्रपट, साहित्य, गाणी आपल्याला समृद्ध करतात. अशी अनेक पुस्तकं, चित्रपट, गाणी आता पोतडीत गोळा झाली आहेत. त्यातलाच एक आवडता चित्रपट म्हणजे ‘ज्यूली अँड ज्युलिया!’ यातलं खाणं, खाण्यावर, खाणं बनवण्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं...
यांच्यामुळे चित्रपटाने मनात एक खास जागा पटकावलीच. पण त्याहीपुढे जाऊन हा चित्रपट लाडका ठेवणीतला बनण्याची अनेक कारणं आहेत.
सत्यकथेवर आधारित असणारा हा चित्रपट. अखंड ऊर्जेचा खळाळता स्रोत असणारी ज्युलिया चाईल्ड आणि काळाच्या पटावर तिच्या थोडीशी पुढे असणारी ज्यूली. दोघींना जोडणारी गोष्ट म्हणजे त्यांचं पाकशास्त्रावरचं प्रेम. दोघींच्याही मनात ठसठसणारा एक सल त्यांना काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा देतो. ज्युलिया चाइल्डचं निपुत्रिकपणाचं दुःख आणि वयाच्या तिशीतही विशेष काही साध्य न केलेली ज्यूली. आपल्या महत्त्वाकांक्षी, यशस्वी मैत्रिणींच्या गराड्यात सापडलेली! लिहिण्याचं, लेखिका बनण्याचं स्वप्न अर्धवट सोडून एका इन्शुरन्स कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये नोकरी करणारी ज्यूली. तिथे येणाऱ्या फोनवर लोकांना धीर देणारी! पण एका मैत्रिणीने तिच्या आयुष्यातील अपयशाची जाहिरातबाजी केल्यावर मात्र ती पेटून उठते आणि आयुष्यात काहीतरी साध्य करायचं, पूर्ण करायचं ठरवते.
या प्रवासातलं तिचं दैवत आहे ज्युलिया चाईल्ड-एक यशस्वी सुप्रसिद्ध कुक आणि एका अजरामर कुकबुकची लेखिका! ज्यूली तिच्या पुस्तकातील अमुक इतक्या रेसिपीज ठरावीक दिवसांत बनविण्याचा आणि त्याविषयी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिण्याचा चंग बांधते. सुरुवात तर उत्साहाने होते; पण तिच्या या संकल्पावर पहिलाच संशय घेते ती तिची आई. तुला जमणार आहे का, नवऱ्याकडे लक्ष दे, घराकडे लक्ष दे, हातात असलेली नोकरी नीट सांभाळ, तेवढं जमलं तरी खूप आहे.
पण ज्यूली मात्र न डगमगता आपला उपक्रम सुरू करते. यात तिला साथ असते तिच्या नवऱ्याची. ज्यूली आणि ज्युलिया यांच्यातलं आणखी एक साधर्म्य म्हणजे त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे त्यांचे नवरे! नदीप्रमाणे आपला प्रवाह बदलत जाणाऱ्या या दोघी आणि त्या वळणांनुसार त्यांचा काठ बनत जाणारे, त्यांना आधार देणारे, सावरणारे काठ आहेत हे नवरे. ना कमी ना जास्त, मात्र योग्य वेळी परिस्थितीची -वास्तवाची जाणीव करून देणारे. ज्युलियाच्या फ्रेंच कुकिंगची आवड ओळखून तिच्या उत्साहाला आवर न घालता व्हॅलेंटाईन्स डेला गिफ्ट म्हणून संगमरवरी खलबत्ता देणारा नवरा असो किंवा ‘यू आर ऑलरेडी ॲन ऑथर!’ असं म्हणून आपल्या बायकोच्या आवडीची-तिच्या कर्तृत्वाची नकळत जाणीव करून देणारा ज्यूलीचा नवरा असो.
ज्यूली आपल्या सहकाऱ्यांच्या, मित्रमैत्रिणींच्या, कौतुक करणाऱ्या फॉलोअर्सच्या आणि नवऱ्याच्या पाठिंब्यानं आपलं ध्येय पूर्ण करतेच! हे ध्येय पूर्ण करताना येणारे असंख्य अडथळे ती कधी धीराने, कधी वैतागत, कधी त्रागा करून पार करते. तिच्या दैवतानं खुद्द ज्युलिया चाईल्डनं तिच्याविषयी नापसंती व्यक्त केल्यावरही तिच्यावर तितक्याच उत्कटतेने प्रेम करत राहणारी, भक्ती करत राहणारी ही ज्यूली! या प्रवासात तिला स्वतःविषयी अनेक गोष्टी उमगत जातात. ज्यामुळे तिच्यापुढे तिच्या आयुष्याचा पुढचा मार्ग उलगडतो.
या चित्रपटातली ज्युलिया चाईल्ड तर माझी लाडकी आहेच. पण मला भावली ती ज्यूली स्वतःचा पैस राखण्यासाठी जिवाचं रान करणारी… आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणारी… प्रत्येकानं फक्त स्त्रीनं नाही, तर प्रत्येक व्यक्तीनं या ज्यूलीसारखं असायला हवं. आयुष्यातलं चैतन्य कायम ठेवायला हवं. स्वतःचं अवकाश राखायला हवं; त्याला गवसणी घालायला हवी. मग ती कितीही छोट्यातली छोटी गोष्ट असो तिनं फक्त तुमच्या मनाच्या अवकाशातील आनंदाचं, उत्साहाचं कारण बनायला हवं!
(छायाचित्र: गुगलच्या सौजन्याने)
© तृप्ती अ. कुलकर्णी

सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाMast ch.. kuthe milel ha movie baghayala..ata baghitala ch pahije😉
उत्तर द्याहटवाThanks. I guess Netflix var ahe.
हटवाWow...nice story ...never heard of the movie...but now wanting to watch!!
उत्तर द्याहटवाThnak you.
उत्तर द्याहटवा