लेक हाऊस-एक न उलगडलेलं कोडं!
हा ‘लेक हाऊस’ माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आला विद्यार्थीदशेत-एम.ए. ला असताना. तेव्हा फिल्म फेस्टिव्हलच्या चित्रपटांचं गारूड मनावर होतं. ते अजूनही आहे. पण तेव्हाचं झपाटलेपण वेगळचं होतं. प्रत्येक गोष्टीची उकल करायची, प्रत्येक कथासूत्राचा माग घ्यायची ती नशा काही वेगळीच होती.
काही चित्रपट आपल्याला आवडून जातात, मनात घर करून राहतात. ते कधीही पाहण्यात-ऐकण्यात आले, तरी आनंदच होतो. पण काही मात्र आपल्याला आव्हान देतात. इतर चित्रपटांबरोबर आपल्या मनात असतातच, पण त्यांच्याकडे परत मोर्चा वळवायला धारिष्ट्य लागतं. असाच मला आव्हान देणारा एक चित्रपट म्हणजे एका कोरियन चित्रपटावर आधारित; कियानू रीव्ह्ज आणि सँड्रा बुलक यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘लेक हाऊस!’
हा ‘लेक हाऊस’ माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आला विद्यार्थीदशेत-एम.ए. ला असताना. तेव्हा फिल्म फेस्टिव्हलच्या चित्रपटांचं गारूड मनावर होतं. ते अजूनही आहे. पण तेव्हाचं झपाटलेपण वेगळचं होतं. प्रत्येक गोष्टीची उकल करायची, प्रत्येक कथासूत्राचा माग घ्यायची ती नशा काही वेगळीच होती. चित्रपट सुरू झाला की त्याचा शेवट काय असेल, मधे काय घडेल याच्याच मागे मन धावायचं आणि आपला अंदाज बरोबर आला की,“बघ, सांगितलं होतं की नाहीॽ” असं म्हणायचं. एक वेगळीच धुंदी असते त्यात. पण या खोडीमुळे लोक बरोबरीने पिक्चर बघायलाही नकार देऊ लागले किंवा ‘तू शांत बसणार असलीस तरच…’अशा धमक्याही ऐकल्यात. नवरा तर पुरता कावला आहे,माझ्या या सवयीमुळे. असो. तर दिग्दर्शकाच्या, कथाकाराच्या मनात शिरून कथेचा माग काढणाऱ्या कुळातली मी आहे.
पण या लेक हाऊसनं मात्र पुरतं हैराण करून सोडलं मला… २००६ सालापासून ते अगदी २०२१ पर्यंत. किती गोष्टी घडल्या या काळात. खूप बदल झाले…विचारप्रक्रियेत, व्यक्तिमत्त्वात! पण तेव्हा पाहिलेला हा चित्रपट काही केल्या मनातून जात नव्हता. खूप आवडला होता म्हणून नाही, तर समजलाच नव्हता म्हणून. अगदी मॉर्निंग हाऊसफुल शोला बुकिंग करून पाहिलेला. पण तेव्हा कळलाच नव्हता. तशा तेव्हाही बऱ्याच गोष्टी कळत नसत म्हणा. पण हा लेक हाऊस म्हणजे बुद्धीला पडलेलं कोडंच होतं. खूप विचार करूनं पाहिला, चर्चा घडवून आणल्या. पण काही केल्या उलगडत नव्हतं हे कोडं. नवऱ्याला बऱ्याचदा म्हटलं होतं की हा पहायचाय एकदा तुझ्याबरोबर, कळतचं नाहीये काही. त्यानेही चेष्टेत तुला कळत नाहीये, मग तर पहायलाच हवा म्हणून होकार दिला. पण मिळून पहायचा योग मागच्या महिन्यात आला.
दोन काळांमधली रेष पुसून ती ओलांडण्याची ‘टाईम ट्रॅव्हल’ ही संकल्पना या चित्रपटात केंद्रवर्ती आहे. काळाच्या पटावर दोन वर्षांनी एकमेकांच्या मागेपुढे असणारे दोघं जण- एक स्त्री डॉक्टर आणि एक झपाटलेला आर्किटेक्ट यांच्याभोवती हे कथानक फिरतं. साल २००६. शिकागो येथे एक लेक हाऊस- तळ्यावर बांधलेलं घर भाड्यानं घेऊन राहणारी केट फॉस्टर. आता ती ते घर सोडून जातेय आणि जाताना पुढच्या भाडेकरूसाठी तिथल्या पत्राच्या पेटीमध्ये एक चिठ्ठी सोडते. त्यात आपल्यासाठी येणारी पत्रं आपल्या नवीन पत्त्यावर पाठवण्याची विनंती करते. तसेच घराकडे जाणाऱ्या वाटेवर असणारे कुत्र्याच्या पावलाचे ठसे आपण इथे यायच्या आधीपासूनच असल्याचं सांगते आणि त्याबद्दल माफी मागते.
ॲलेक्स वायलर नावाचा एक आर्किटेक्ट २००४ साली लेक हाऊसमध्ये येतो आणि त्याला तिथल्या पत्राच्या पेटीत केटचं ते पत्र मिळतं. ॲलेक्सला तिथे दिसतं अतिशय वाईट अवस्थेत असेलेलं ते लेक हाऊस आणि तिथे कुत्र्याच्या पावलाच्या ठश्याचा मागमूसही नसतो. पण ॲलेक्स घराची दुरूस्ती करत असताना एक कुत्रा तिथे अचानक येतो आणि ओल्या रंगावर त्याच्या पावलांचा ठसा उमटतो. अगदी तिथेच जिथे केटने सांगितलेलं असतं. गोंधळलेला ॲलेक्स त्या ठश्याबद्दल केटला कसं काय माहीत आहे, हे विचारणारं पत्र लिहितो. कारण तो तिथे येईपर्यंत त्या घरात कोणीच राहत नसतं. २००६ सालच्या व्हॅलेंटाईन डे ला नुकतीच शहरात राहायला गेलेली केट एक अपघात पाहते आणि अपघातात सापडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा जीवापाड प्रयत्न करते. पण त्या व्यक्तीचा जीव ती वाचवू शकत नाही. त्यानंतर उदास झालेली केट लेक हाऊसला जाते. तिथे तिला ॲलेक्सचं पत्र सापडतं. त्याचं ती उत्तर लिहिते.
आणि मग सुरू होतो ॲलेक्स आणि केट यांच्यातील पत्रांचा अनोखा सिलसिला…एकमेकांना पाहूसुद्धा शकत नसलेले ते दोघं एकमेकांना पत्र लिहित असतात, व्यक्त होत असतात. अगदी मनातलं बोलत असतात. त्या दोघांमधला दुवा ठरतो तो मेलबॉक्स. आधी तर ॲलेक्स २००४ सालात आहे, यावर केटचा विश्वास बसत नाही. पण मग ती त्याला सांगते की त्या साली खूप बर्फ पडलं होतं. मग तिच्यातला डॉक्टर जागा होतो आणि ती ॲलेक्सला काळजी घेण्याचा सल्ला देते. आधी तो खिल्ली उडवतो; पण लवकरच पडू लागलेल्या बर्फामुळे ही गोष्ट खरी आहे, हे त्याला कळतं. सध्या केट जिथे राहत असते, तिथे तिचं पत्र द्यायला ॲलेक्स जातो, तेव्हा त्या इमारतीचं अजून बांधकाम सुरू आहे, हे त्याला दिसतं. दोघंही एकमेकांना शहरातील आपल्या खास जागांची सहल घडवतात. पण एकमेकांना न भेटता. पत्रांच्या माध्यमातून. अशाच अनेक गोष्टींमुळे त्या दोघांना कळतं की आपल्या काळात दोन वर्षांचं अंतर आहे. एका प्रसंगी ॲलेक्स केटच्या एक्स-बॉयफ्रेंडच्या घरी केटला भेटतोही. पण तो केटला काही सांगत नाही. कारण केटसाठी अजून त्या गोष्टी घडलेल्याच नसतात. केटला ती भेट नंतर आठवते, पण अगदी अस्पष्ट.
आता त्यांना एकमेकांच्या भेटीची ओढ लागते. ते एकमेकांना भेटायचं ठरवतात. ॲलेक्स एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये दोन वर्षांनंतरच्या तारखेचं म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे चं बुकिंग करतो. तेव्हा केटसाठी मात्र तो फक्त पुढचा दिवस असतो. ती तिथे जाते; पण ॲलेक्स मात्र तिथे येत नाही-येऊ शकत नाही. दुःखी केट ॲलेक्सला मला पुन्हा पत्र लिहू नकोस, असं सांगते. त्यानंतर ॲलेक्सही ते लेक हाऊस सोडतो. त्यांच्या वाटा वेगळ्या होतात.
पण ॲलेक्सच्या २००६ मधल्या आणि केटच्या २००८ मधल्या व्हँलेंटाईन्स डे च्या दिवशी ॲलेक्स लेक हाऊसला येतो. दरम्यान केट जे घर विकत घ्यायचं असतं त्या घराच्या रिनोव्हेशनच्या प्लॅनची चर्चा करण्यासाठी ती एक आर्किटेक्टच्या फर्ममध्ये जाते. तिथे तिला लेक हाऊसचं चित्र दिसतं. ते कुणाचं आहे, असं विचारल्यावर हेन्री वायलर तिला ते आपल्या भावानं ॲलेक्सनं काढलेलं आहे, असं सांगतो. तेव्हा केटला हा आपलाच ॲलेक्स आहे हे कळतं. ती तो कुठं आहे, असं विचारते. तेव्हा ॲलेक्सचा भाऊ तिला सांगतो की दोन वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी तो एका ॲक्सिडेंटमध्ये तो गेला. तेव्हा केटला कळतं की त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये ॲलेक्स का आला नाही.
ती अचानक जीवाच्या आकांताने लेक हाऊसला जाते आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल, तर प्लीज मला शोधायचा प्रयत्न करू नकोस, असं ॲलेक्सला लिहिते. ती त्याला दोन वर्षं वाट पाहायला सांगते. आणि दोन वर्षांनी लेक हाऊसला यायला सांगते. दरम्यान, २००६ मध्ये ॲलेक्स केटला शोधायला जिथे त्याचा अपघात होतो तिथे जातो. इकडे लेक हाऊसपाशी हताश झालेली केट रडत असते. कारण आपल्याला यायला उशीर झाला आणि ॲलेक्सने तिचं पत्र वाचलंच नाही, असं तिला वाटत असतं. पण लवकरच एक ट्रक तिथे येतो आणि त्यातून उतरलेला तिचा ॲलेक्स तिला भेटतो.
कळली का ही गोष्टॽ ज्यांना आधीच कळली असेल, त्यांना सलाम. आणि ज्यांना कळली नसेल, ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल त्यांनी तो बघाच. कळला नाही लगेच, तर काळजी करू नका. टेक इट लाइटली! नेमकं हेचं म्हणायचं आहे मला. टाईम ट्रॅव्हल विषयीचे अनेक चित्रपट नंतर पाहण्यात आले. त्यात अट्टाहासाने हा सिद्धान्त पटवून देण्याचे अनेक प्रयत्न झाले. कोणत्याही गोष्टीला कार्यकारणभाव असेल, तरच ती आपल्या बुद्धीला पटते. पण हा लेक हाऊस मात्र वेगळा आहे. आपलं मत, आपली गोष्ट पटवून देण्याचा कुठलाच अट्टाहास नाही या चित्रपटात. एवढ्या वर्षांनी परत एकदा जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा वेगळ्या नजरेने पाहिला. डोक्यातले सगळे दुवे बाजूला सारून कोऱ्या मनाने पाहिला. आणि संपला तेव्हा नवरा म्हणाला,“यात काय न कळण्यासारखं आहेॽ साधीसोपी गोष्ट तर आहे.” तेव्हा वाटलं खरचं का बरं एवढी वर्षं आपण असा विचार करत होतोॽ आपल्याला एखादी गोष्ट कुणी पटवून देण्याचा प्रयत्न करत नसेल, फक्त स्वतःचं मत आपल्यापुढे मांडत असेल तर आपण सावध होतो. आपल्याला वाटतं एवढ्या साध्यासोप्या कुठे असतात गोष्टीॽ यात नक्की काहीतरी गोम असली पाहिजे. पण खरंच या चित्रपटात काहीच पटवून देण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि म्हणूनच इतकी वर्षं हा छळत होता मला, हे मला उमगलं. पक्षच जर नसेल, तर प्रतिपक्ष कशाला हवा, असा विचार करून मी शस्त्रं टाकली आणि शरण गेले यातल्या साधेपणाला, सोपेपणाला! एखादी गोष्ट आपल्याला पटली असेल, तर ती दुसऱ्याला पटवून देण्याचा अट्टाहास करण्याची गरज नाही. ज्याची त्याची गोष्ट ज्याला त्याला योग्य वेळी कळतेच. कारण या साध्यासोप्या पण तरीही अवघड अशा प्रेमकथेने मला खूप काही शिकवलं. गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर सगळं बदलतं, हे शिकवलं. काही गोष्टी सोडून देण्यात शहाणपणा असतो, हे शिकवलं. दृष्टीचा कोन बदलून आपल्या जगण्याची मिती बदलता येते, हे शिकवलं. म्हणूनच माझ्या आवडत्या आणि खास चित्रपटांच्या यादीत आता मी ‘लेक हाऊस’लाही जागा दिली आहे.
© तृप्ती अ. कुलकर्णी
(छायाचित्र: अर्थात गुगलच्या सौजन्याने)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा