या लेखाचं शीर्षक म्हणजे माझ्या एका आवडत्या श्लोकाचा शेवटचा चरण आहे. हा परवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला टाकला. बऱ्याच लोकांनी त्याचा अर्थ विचारला. पण या श्लोकाचा अर्थ थोडक्यात समजावून सांगणं अवघड आहे. त्यामुळे म्हटलं सोदाहरण अर्थ समजावून सांगावा!
आपल्यापैकी बहुतेकांनी प्रसिद्ध लेखक श्री. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी वाचलेली असेलच. आणि बहुतेकांना ती आवडली असणारच, हे मला नक्की माहीत आहे. मी जेव्हा पहिल्यांदा मृत्युंजय, राधेय ही पुस्तकं वाचली तेव्हा भारावून गेले होते. इतकी की त्याकाळी कर्ण माझा हिरो होता. माझ्या वयाच्या मुलींना तेव्हा शाहरुख खान, सलमान खान आवडायचे आणि मला कर्ण. कर्णाची बाजू घेऊन तो कसा बरोबर होता, ग्रेट होता हे पटवून द्यायला मी भांडलेही होते चक्क! ही पुस्तकं महाभारतासारख्या स्रोतावर आधारित आहेत. त्यात काही अंशी कल्पनेचाही भाग आहे, याची तेव्हा आजिबात कल्पना नव्हती. तेव्हा जे आपण वाचलंय, जे आपल्याला आवडलंय तेच खरं वाटायचं. पण नंतर त्यामागचं तथ्य कळलं.
तुम्ही म्हणाल आता मुद्द्यावर या. तर मुद्दा असा आहे की, साधारण इ.स.पू. ३००-२०० या कालावधीत भास नावाचा एक संस्कृत नाटककार होऊन गेला. भासाची लोप पावलेली 'रूपकं' म्हणजेच ज्याला आपण आता सर्रास 'नाटक' म्हणतो ती डॉ. गणपतिशास्त्रींनी प्रकाशात आणली. या रूपकांमध्ये वापरण्यात आलेली शैली, सूत्रधाराचे महत्त्व आणि बऱ्याच समान मुद्द्यांच्या आधारावर ही नाटकं भासाची आहेत, हे सिद्ध केलं. भासाची ही रूपकं मुख्यत्वे रामायणकथा, महाभारतकथा, उदयनकथा आणि लोककथांवर आधारित आहेत. यात महाभारतावर आधारित 'कर्णभारम्' ही एकांकिकाही आहे.
मृत्युंजय, राधेय आदी कादंबऱ्यांचा नायक जसा कर्ण आहे, तसाच भासाच्या या कर्णभारम् रूपकाचा नायकही कर्ण आहे. दानशूर कर्ण आणि त्याच्याकडे कवचकुंडलं मागायला आलेला इंद्र यांच्याभोवती हे कथानक फिरतं. मृत्युंजय, राधेय वाचताना हा प्रसंग यायचा, तेव्हा दर वेळेस तितक्याच आवेगाने रडू यायचं, चीड यायची. पुढे कर्णभारम् वाचतानाही जेव्हा इंद्र कर्णाकडे त्याची कवचकुंडलं मागायला येतो, तेव्हा अगदी असंच वाटलं आणि खरंच कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥ चा प्रत्यय आला.
प्राचीन काळी भासाने निवडलेली प्रमुख पात्रं कर्ण, कैकेयी, दुर्योधन यांच्यासारखी ‘खल’ प्रतिमा असणारी होती. त्यांच्या नकारात्मक बाजूला त्यांने आपल्या रूपकांमधून उजळून टाकलं. ज्याला आपण आता निगेटिव्ह कॅरक्टर्स म्हणतो अशी पात्रं त्याचे नायक-नायिका आहेत. त्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर कथासूत्राला थोडीशी कलाटणी देऊन या पात्रांची प्रतिमाच बदलून टाकली आहे. मग तो उरुभंगम् मधला दुर्योधन असो की कर्णभारम् मधला कर्ण आणि प्रतिमा नाटकातली कैकेयी. ही रूपकं वाचताना मृत्युंजयसारख्या कादंबऱ्यांचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
वर ज्या श्लोकाचा उल्लेख केला आहे, तो संस्कृत नाटककार भवभूतीच्या तोंडचा श्लोक आहे. त्यानेही नाट्यशास्त्राच्या नियमांचे उल्लंघन करत वेगळ्या स्वरूपात आपली नाटकं प्रेक्षकांसमोर आणली. त्याच्या या प्रयोगांवर टीकाकारांनी कडक टीका केली. तेव्हा त्याने,
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां।
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा।
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥
असं प्रत्युत्तर दिलं. म्हणजेच,“माझ्या साहित्यकृतीवर टीका करणाऱ्या लोकांसाठी मी या साहित्यकृती रचलेल्याच नाहीत. माझ्यासारखाच विचार करणारा कोणी ना कोणी या पृथ्वीतलावर जन्म घेईलच. कारण काळ अनंत आहे आणि ही पृथ्वी विशाल आहे.”
भवभूतीप्रमाणेच भासाने आपल्या नाट्यकृतींमध्ये केलेल्या प्रयोगांवर टीका झाली. त्याची उपेक्षा करण्यात आली. आपल्या पात्रांच्या मानसिक आंदोलनांचं अचूक चित्रण करणं, त्यांचा आपल्या कथानकाला कलाटणी देण्यासाठी वापर करणं हे भासाचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा ही रूपकं लोकांच्या पसंतीस उतरली नाहीत. काळाच्या ओघात मागे पडली. पण त्यानं लिहिलेलं स्वप्नवासवदत्तम् सारखं नाटक मात्र काळाच्या कसोटीवर उतरलं, अजरामर झालं.
नंतर एकोणिविसाव्या शतकात कर्णाला नायक बनवणारी 'मृत्युंजय' सारखी कादंबरी आली आणि फक्त आली नाही, तर तिनं अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य केलं. अगदी साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी तिचं नामांकनही करण्यात आलं. यामुळे 'काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे. कधी ना कधी तरी माझ्यासारखा विचार करणारी व्यक्ती जन्माला येईलच,' हा भवभूतीचा आत्मविश्वास किती सार्थ आहे, हे पटतं.
आपली कला मनस्वीपणे लोकांसमोर मांडणाऱ्या या कलाकाराच्या धाडसाचं मला कौतुक वाटतं. आपण अनुभवलेल्या आणि कधी कधी न अनुभवलेल्या गोष्टीसुद्धा तितक्याच प्रभावीपणे चित्रित करण्याचं त्यांचं कौशल्य निव्वळ अद्भुत आहे. समाजाच्या रूढीपरंपरांचं कधी पालन तर कधी उल्लंघन करून आपल्या कलेची भक्ती करणाऱ्या या कलाकारांना माझा सलाम!
शेवटी काय Rules are meant to be broken. त्याशिवाय नवे नियम कसे बनणार...
© तृप्ती अ. कुलकर्णी
(छायाचित्र: अर्थात गुगलच्या सौजन्याने)

Very nice..
उत्तर द्याहटवाExcellent , we would like to read about Bharatmuni also. Literature knows no boundaries of space and time. Very true.
उत्तर द्याहटवाExcellent , we would like to read about Bharatmuni also. Literature knows no boundaries of space and time. Very true.
उत्तर द्याहटवाThank you and yes I would also like to write about Natyashastra and Bharatmuni.
हटवाछान
उत्तर द्याहटवाफारच सुंदर. Keep it up.
उत्तर द्याहटवा