इडलीपुराण
आमच्या घरी रविवार
म्हटलं की ‘इडली’ हा नियमच होता. अगदी लहानपणीचं काही आठवत नाही मला; पण आठवतंय
तेव्हापासून इडली हाच माझा सगळ्यात आवडता, लाडका, फेव्हरिट पदार्थ आहे. तिची सर
कोणालाच येत नाही. शनिवारी दुपारपासून माझं लक्ष असायचं ओट्यावर. आईनं डाळ भिजत
घातलीये का? उद्या नक्की काय आहे -इडली की डोसा, हे
नुसतं काय भिजत घातलं आहे, यावरूनच कळायचं. मी घरभर उड्या नाही मारायचे; पण इडलीचा
फील, सांबारचा वास या गोष्टींनी मनातल्या मनात नक्कीच उड्या मारायचे. दुपारी आईनं
काहीतरी भिजत घातलं आहे, हे कळलेलं असायचं; पण तरीही खात्री नसायची. रात्री
झोपायला गेल्यावरही कान स्वयंपाकघरातून आलेल्या आवाजाकडेच असायचे. सगळं आवरून
झाल्यावर आईनं मिक्सर लावला की मग हुश्श व्हायचं. उद्या इडली आहे, या सुखात मस्त
झोप लागायची.
नुसती उद्या इडली आहे, यानं माझं भागायचं नाही. सकाळी
उठल्याउठल्या म्हणजे रंगोलीच्या आधी दहा मिनिटं मला गॅसवर इडली स्टँड चढलेला आहे,
हे दिसायला लागायचं आणि दूध किंवा चहाऐवजी आधी कढईत उकळणारं सांबार वाटीत घेऊन
प्यायला लागायचं आणि पहिल्या स्टँडमधून काढलेली गरमगरम -वाफाळती इडली लागायची,
नियमच होता तो माझा. नाहीतर रविवारला काही
अर्थच उरायचा नाही आणि मजा म्हणजे माझी आईसुद्धा माझा हा हट्ट पुरवायची.
तर सांबारचं टेस्टिंग झाल्यानंतर रंगोली वगैरे पाहून आंघोळी
व्हायच्या. मग सुरू होत असे खरा इडली प्रपंच. घरातले सर्व जण आई-बाबा, बहिणी,
काका-काकू, आजी सगळे मिळून नऊ वाजता
हॉलमध्ये टी.व्ही. समोर बसून चंद्रकांता, नाहीतर डकटेल्स पाहत इडली खायचो. गप्पा
मारत किती इडल्या पोटात जायच्या याचा हिशेब कधीच ठेवला जायचा नाही. अगदी परीक्षा
जरी असेल तरी हा नेम चुकायचा नाही. नाश्त्याचं इडली सेशन संपल्यावर मी वाट पाहायचे
जेवणाच्या इडली सेशनची, छायागीताच्या बरोब्बर दहा मिनिटं आधी आम्हाला पुन्हा भूक
लागायची. मग आम्ही पुन्हा एकदा ताटं घेऊन ताव मारायचो इडलीवर. पुन्हा एकदा दुपारी
चार वाजता आणि रात्री जेवताना इडलीच… कंटाळा कसा यायचा नाही, हे कळत नाही. आता मुलं
जेव्हा सकाळीच इडली खाताना ‘मी दिवसभर इडलीच खाणार,’ असं जाहीर करतात, तेव्हा अगदी
धन्य वाटतं मला!
इडली करणं, खाणं हे शास्त्र असतं. इडली खाताना ती नेहमी
सांबारात बुडवून खावी, नाहीतर तिची खरी चव येत नाही. एका वाडग्यात सांबार घेऊन त्यात इडली बुडवायची
आणि तिचा मनसोक्त समाचार घ्यायचा ही माझी पद्धत. चटणीचं आणि माझं गणित कधी फारसं
जमलं नाही. त्यामुळे शिक्षणासाठी बाहेर
पडल्यावर जेव्हा पहिल्यांदा बाहेर इडली खाल्ली, तेव्हा वेटरनं ‘सांबार मिक्स काॽ’ असं
विचारल्यावर “अर्थात मिक्स” हेच माझं उत्तर होतं. अजूनही ती सवय गेलेली नाही. आईचा
ओरडा खाऊनही.
आज मी स्वतः इडली
करते आणि खाते; पण स्वतः करताना कधीच पहिल्या स्टँडमधली इडली खात नाही. कारण ती
आईनं केलेली नसते. पण आईकडे गेल्यावर आजही मी पहिल्या स्टँडमधून काढून वाफाळती इडली खाते. मगच
माझं पोट भरतं आणि आईचंही! लहानपणीच्या या
लाडक्या इडलीनं अजून साथ दिली आहे. अजूनही ती माझी तितकीच लाडकी आहे. रंगीत इडली,
इडली फ्राय, मसाला इडली या इडलीच्या भाऊबंदांनी अजून तरी माझ्या लाडक्या पांढऱ्याशुभ्र,
मऊसूत वाफळत्या इडलीची जागा पटकावलेली नाही आणि बहुतेक ते कधी शक्यही होणार नाही.
इडलीविषयीची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाताना आपल्याबरोबर प्रेमाची माणसं
असणं महत्त्वाचं असतं.
आता मला कळतंय की हे सगळं करताना माझ्या आईला किती आणि
कायकाय करावं लागत असेल…पण माझी आई बेस्टच आहे. तिनं कायम आमचे खाण्यापिण्याचे लाड
केले आहेत. त्या काळी हॉटेलिंग वगैरे नसायचंच आमचं. वर्षातून अगदी एखाददोन वेळा; पण
आम्हाला तेव्हा कधीच असं वाटलं नाही. म्हणजे आम्ही फार शहाणे होतो, असा याचा अर्थ नाही. इतर बहिणींच्या तुलनेत माझे खाण्याचे
जास्तच हट्ट असायचे. पण आई सगळे चटपटीत पदार्थ करून घालायची. तिच्या या
प्रेमाने आमचे हट्ट पुरवणाऱ्या आईला इडलीसाठी आणि या आठवणींसाठी थँक यू म्हणावसं
वाटतं. तिला नजरेसमोर ठेवूनच प्रेमाच्या
माणसांना फक्त पदार्थ खायला न घालता, त्यांच्याशी त्या माणसांच्या-खासकरून
मुलांच्या आठवणी जोडल्या जाव्यात, यासाठी प्रयत्न करते. कारण मला माहितीये तोच खरा
ठेवा आहे.
इति इडलीपुराण
समाप्त।। असं म्हणणार नाही मी; कारण हे प्रकरण आयुष्यभरासाठीचं आहे.
© तृप्ती अ. कुलकर्णी
(छायाचित्र: अर्थात गुगलच्या सौजन्याने)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा