गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

शोध भक्तीचा

 


माझा मुलगा मला दिवसभर काही ना  काही प्रश्न विचारत असतो. आमच्या या प्रश्नोत्तरांमधून मलाही अनेक प्रश्न पडतात, त्यांची उत्तरं शोधावीशी वाटतात. एक दिवस आमचा संवाद असाच  पांडव – महाभारत, कृष्ण, रामायण – राम, लक्ष्मण, रावण एवढा सगळा प्रवास करून आला. त्यानंतर मला त्याने एक कळीचा प्रश्न विचारला तो म्हणजे, “आई, कृष्णपण देव होता आणि रामपण, हो ना?” प्रश्न ऐकून मला एकदम हुरूप आला. मी आता याला दशावतार म्हणजे काय वगैरे सांगू या आवेशात मी पुढे सरसावले. पण तेवढ्यात त्याने एक यॉर्कर टाकला आणि मी बाद झाले. “पण जर दोघेही देवच होते, तर मग आपण कोणाची भक्ती करायचीॽ” हा होता त्याचा प्रश्न. मी एकदोन क्षण शांत. मग त्याला मी तेवढ्यापुरतं उत्तर दिलं, “हे बघ आपण रामनवमी साजरी करतो तशी गोकुळाष्टमीसुद्धा करतो ना.” या उत्तराने त्याचं तात्पुरतं समाधान झालं, पण मला अस्वस्थ केलं.

मला वाटलं आपण लहानपणी आई-वडिलांनी ज्या देवांना नमस्कार करायला सांगितला त्यांना मुकाटपणे नमस्कार केला. हा प्रश्न मोठेपणी पडला खरा, मग त्याची उत्तरं शोधायचाही प्रयत्न केला. पण इतक्या लहान वयात भक्ती कोणाची करायची, हा प्रश्न पडला, त्याचं उत्तर मिळेना का पण शोधाचा प्रवास जरी सुरू झाला तरी काय बहार येईल असंही वाटून गेलं! आता तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील. पण आत्ता त्यांच्यावर चर्चा न करणं बरं आहे. आजच्या या लेखाचा विषय थोडा वेगळा आहे.

‘भज्’ धातूपासून तयार होणारा हा शब्द ‘भक्ती’. भक्ती म्हणजे एखाद्याप्रति पूर्ण समर्पणाची भावना, वाहून घेणे, श्रद्धा ठेवणे. भक्तीचे अधिष्ठान काय आहे, म्हणजेच आपण कशावर भक्ती करतो ते महत्त्वाचं आहे. मग ते सगुण साकार रूप असो, निर्गुण – निराकार असो किंवा एखादी कला, एखादा विचार, एखादा ध्यास असो. भक्ती ही कर्मकांडाशी आजिबात बांधील नाही. माझ्यामते ती प्रत्येकाचा खाजगी विषय आहे. एखाद्याला ईश्वराच्या सुंदर मूर्तीमध्ये भक्तीची प्रचिती येऊ शकते तर दुसऱ्याला तर्कसुंसगंत वैज्ञानिक शोधांमध्ये. माझ्यामते तर नास्तिक व्यक्तीसुद्धा तिच्या विचारांवर  ठाम असते म्हणजे ती त्या विचारांची भक्तच असते. ते अधिष्ठान महत्त्वाचं आहे, जे जगण्याचं, पुढे जाण्याचं, शोध घेण्याचं बळ देतं.

गीतेमध्ये ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग हे तीन मार्ग सांगितले आहे. ‘भक्ती’ हा शब्दच सध्या साशंकतेच्या भोवऱ्यात अडकला आहे. अध्यात्म, रुढी-परंपरा, ज्ञान, कर्म, शास्त्र हे शब्द सध्या एकतर खूप ग्लॅमरस म्हणून वापरले जात आहेत किंवा हिणवले तरी जात आहेत.पण जर आपण आपल्या पुढच्या पिढीला ज्ञानाची, विचारांची भक्ती करावयास सांगितली; आपणही या कर्मभक्तीची, वैचारिक भक्तीची कास धरून जगत राहिलो तर खूपसे प्रश्न आपोआप सुटतील असं वाटतं.

हा विषय खूप गहन आहे आणि यावर एवढंच लिहून थांबावं, असं मला वाटत नाहीये. त्यामुळे पुढेही या विषयावर लिखाण करण्याचा प्रयत्न करेन.

 

२ टिप्पण्या: