मैदान
मला माहीत आहे मागच्या लेखात
मी मला आवडलेल्या सिरीजविषयी लिहिणार आहे. त्याचीच तुम्ही वाट पाहत आहात. पण
त्याआधी हा एक लेख वाटेत आडवा आला...थांबवू शकले नाही म्हणून पोस्ट करतेय. माफ
करा.
परवा एका परीक्षेसाठी मुलाला
दुसऱ्या एका शाळेत घेऊन गेले होते. शाळेत पहिलं पाऊल टाकल्यावर नजरेस पडलं ते
भलंमोठं मैदान, तिथं मनसोक्त खेळणारी मुलं. अगदी हरखून गेले मी ते मैदान पाहून,
थेट आमच्या हरिभाई शाळेच्या मैदानावर जाऊन थडकले. जगात शोधूनही आमच्या शाळेसारखं
मैदान सापडणार नाही. एक नाही तर दोन-दोन मैदानं होती आमच्या शाळेला. एक खालचं अगदी
विस्तीर्ण आणि दुसरं वरचं आखीवरेखीव, मऊसूत लाल मातीचं. पाचवीत नव्यानं या शाळेत आल्यानंतर
पहिली सलामी दिली या मैदानानेच. शाळेच्या इमारतीच्या भव्यतेला या मैदानानं आपल्या
कवेत सामावून घेतलं होतं.
पूर्वी मैदानी खेळ
खेळण्यासाठी शक्यतो कुठले क्लास लावावे लागत नसत. त्यामुळे नवीन शाळेत आल्यावर या
मैदानाशी गट्टी जमायला आजिबात वेळ लागला नाही. पाचवी ते दहावीच्या आठ तुकड्यांमधील
जवळपास सर्व मुलामुलींना सामावून घेऊनही तिथे गर्दी झाली आहे, असं आजिबात वाटायचं
नाही. सुट्टी होण्याआधी सगळ्यांचं लक्ष खिडकीतून दिसणाऱ्या मैदानाकडे लागलेलं
असायचं. खरंतर दुपारच्या तळपत्या उन्हात चमकणाऱ्या त्या मैदानाकडे उघड्या
डोळ्यांनी पाहणंही मुश्किल व्हायचं, पण डबा खाऊन झाल्यावर धावत जाऊन त्या मैदानाला
भेटणं म्हणजे अभ्यासाच्या विचारांतून मिळणारा एक पॉवरब्रेक असायचा. आमची पॉरबँकच
होती ती. आमच्याकडे दोन सुट्ट्या असायच्या एक छोटी व एक मोठी. मोठ्या सुट्टीत डबा
वगैरे खाणं अपेक्षित असायचं. पण मुलं शक्यतो छोट्या सुट्टीतच डबा खाऊन मोकळी
व्हायची आणि सुट्टी झाली रे झाली की वेगवेगळ्या गटातली मुलंमुली भराभर जागा
पकडायला पळायची. लंगडीचा कट्टा, कबड्डीचं मैदान, डॉचब़ॉलची जागा...भराभर रुमाल
टाकले जायचे या जागांवर आणि शाळा पुन्हा भरेपर्यंत खेळ चालायचा. अर्धवट रहिलेला
डाव दुसऱ्या दिवशी पूर्ण करायचा. ऊंची वाढवण्याचा ध्यास घेतलेल्यांसाठी कडेला
डबलबार, सिंगलबार होते. मैदानाच्या टोकाला व्यायामशाळा होती. जी थोडक्याच जणांना
माहीत होती. काही मुलं जायची खरी तिथं. जी मुलं सगळ्यांमध्ये मिसळत नसत,
सुरुवातीला थोडी एकटी राहत त्यांनाही हे मैदान मोठ्या मायेनं धीर द्यायचं. तिथल्या
मोठ्यामोठ्या झाडांच्या सावलीत निवांत बसून खेळणाऱ्या मुलांकडे नुसतं पाहत
राहण्यातही मजा होती. कधी खेळायचा मूड नसेल, तर दोन्ही मैदानांवर एक चक्कर जरी
मारली, तरी सुट्टी संपायची. सुट्टी संपत आली की खालच्या मैदानावर भांडाराच्या
बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीवर गर्दी व्हायची. तिथलं पाणी पिऊन मोठी झालेली
मुलं आता आयुष्याचं मैदान गाजवतायत. तेव्हा हायजिन वगैरेसारख्या कुठल्याही
गोष्टीचा किंतु न बाळगता सरसकट सर्वजण ते पाणी प्यायचे.
मैदानाची खरी शोभा वाढायची ती
शनिवारी सकाळी. पीटीचा तास, गणवेशातील विद्यार्थ्यांच्या रांगा, ढोलपथकाच्या
तालावरची कवायत, सर्वांनी एका सुरात म्हटलेली गाणी, कौतुकसमारंभ, स्टेजवरची भाषणं...
मैदानावर मातीत रांगेनं बसलेली मुलं, त्यांच्यावर नजर ठेवणारे वर्गशिक्षक. त्यांची
नजर चुकवून रांगांमध्ये लपूनछपून चाललेल्या खोड्या यांच्यामुळे शनिवारी सकाळी एक
चैतन्य संचारायचं त्या आख्ख्या परिसरात.
ही दोन्ही मैदानं खऱ्या
अर्थानं जागती व्हायची ते हिवाळ्यात;
शाळेची शान असणाऱ्या हिवाळी सामन्यांच्या वेळेस. अठ्ठ्याऐंशी तुकड्यांचे विविध
खेळांचे सामने त्यावेळी आयोजित केले जायचे. फायनलपर्यंत कोणता वर्ग जाईल याची
उत्सुकता ताणलेली असायची. प्रत्येकानं आपल्या वर्गासाठी ठोकलेल्या आरोळ्यांनी
दणदणून जायचं ते मैदान! सामन्यात भाग घेणारे, न घेणारे सगळेच जण त्या उपक्रमाचा
भाग असत. आजकालसारखे फक्त ‘पार्टिसिपंट्स’ आणि ‘त्यांचे पेरेंट्स’ येत नसत ‘स्पोर्ट्स
डे’ला. तेव्हा पालक वगैरे शाळेत येण्याचा तर प्रश्नच नव्हता. भले तुम्ही सामन्यात
असा किंवा नसा आपल्या वर्गाला सपोर्ट करणं, हे त्या दिवसांमधलं राष्ट्रीय कर्तव्यच
होतं. एरवी वर्षभर एकमेकांशी भांडणाऱ्या मुलामुलींमध्ये त्याकाळात मात्र एकजूट होत
असे. शाळेच्या कंपाऊंडला लागून उभ्या असलेल्या काकाकंडून घेतलेला पेप्सीकोला खात
सामने बघताना अभ्यास, परीक्षा, उज्ज्वल भविष्य वगैरेसारख्या क्षुल्लक गोष्टींची
पुसटशीही आठवण राहत नसे. आता मोठं झाल्यावर या सामन्यांचं नियोजन करणाऱ्या
शिक्षकांविषयी खरंच आदर वाटतो. कसं मॅनेज करत असतील देवच जाणे.
तर असं हे मैदान! ते
कोणाच्याही शाळेचं असू शकतं. लहानपणी रुजलेली मैत्री, भांडणं, समेट, शिक्षा म्हणून
मारलेल्या चकरा, वाढत्या वयातली गुपितं यांची साक्ष असणारं. तुमच्या-आमच्या
सर्वांच्या भावविश्वाचा एक कायम आनंदी असणारा कोपरा या मैदानानं दिलाय आपल्याला. आपणही
असाच एक कोपरा कायम जपून ठेवायला हवा, जो कोणत्याही आडकाठीशिवाय सर्वांना आपलंसं
करेल.
©तृप्ती कुलकर्णी
छायाचित्र
–गुगलच्या सौजन्याने
ही
पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.
आणखी
लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा