मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

 

‘द चिल्ड्रन्स ट्रेन’ - एक सुखद अपेक्षाभंग!




 

कुठलेही  युद्ध आणि त्याच्या अवतीभवती फिरणारे कथानक ज्यात लहान मुले, ट्रेन अशा गोष्टी असतील, अशा चित्रपटांची जरा भीतीच वाटते. कारण युद्धकाळातील सर्व परिणामांचा लेखाजोखा अशा कलाकृतींमध्ये घेतलेला असतो, ज्याची परिणती शक्यतो करुणरसात होते. पण याचा अर्थ असा नाही की मी असे चित्रपट पाहत नाही. पण सुरुवात करताना मनात एक किंतु असतोच. पण या किंतुला, किमान माझ्या या समजुतीला छेद देणारा एक चित्रपट परवा पाहण्यात आला. ‘Il treno dei bambiniया २०२४ मध्ये रिलीज झालेल्या इटालियन चित्रपटाची इंग्रजी आवृत्ती ‘The Children's Train पाहण्यात आली. व्हायोला अर्दोने यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचं कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडातील आहे. साधारणपणे १९४3 -४६ मध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित हा चित्रपट.

या चित्रपटाची गोष्ट घडते ती दक्षिण आणि उत्तर इटलीतील नेपल्स आणि मोडेना या शहरांमध्ये. नेपल्सला १९४३ साली स्वातंत्र्य मिळाले पण १९४५ पर्यंत मुसोलिनीच्या हुकुमशाहीमधून सुटका होण्यासाठी मात्र त्यांना १९४५ पर्यंत वाट पाहावी लागली. त्या दरम्यान तिथली आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था अक्षरशः कोलमडली होती. महागाई, बेरोजगारी, गरिबी अशा अनेक संकटाना हा देश सामोरा जात होता. त्यामुळे तिथल्या लहान मुलांच्या आयुष्यावर या सर्व घटकांचे खूप गंभीर परिणाम झाले. दैनंदिन जीवनातील सोयीसुविधांचा अभाव, अनारोग्य, कुपोषण यांचा सामना करत तिथली मुलं जगत होती. पालकांना आपल्या मुलांना रोजंदारीला लावावे लागत होते. अशात या मुलांसाठी उत्तर इटलीतील साम्यवादी पक्षाच्या महिलांच्या फळीने मायेचा हात पुढे केला. त्यांनी या मुलांसाठी ‘हॅपीनेस ट्रेन’ हा उपक्रम सुरू केला. उत्तर इटलीतील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण हे दक्षिणेच्या मानाने खूपच चांगले होते. युद्धाची झळ बसलेल्या दक्षिणेतील मुलांना उत्तर इटलीतल्या घरांमध्ये काही काळासाठी ठेवून घेणे, त्यांचे संगोपन करणे हा या उपक्रमाचा हेतू होता.

चित्रपटाची सुरुवात एका प्रसिद्ध व्हायोलिनवादकाच्या शोपासून होते. शोच्या आधी त्याला एक फोन येतो. ज्यात त्याला त्याच्या आईच्या निधनाची बातमी कळते. तरीही तो शो पूर्ण करण्याचा निर्णय घेतो. या संपूर्ण शोमध्ये त्याला त्याच्या गतायुष्याच्या आठवणी येत राहतात. हाच अमेरिगो आपल्या या चित्रपटाचा नायक. हॅपीनेस ट्रेनमधील मुलांपैकी एक. आपल्या आईबरोबर राहून छोटीमोठी कामं करून कसाबसा जगणारा. परिस्थितीने गांजलेली त्याची आई आपल्या मुलाचं थोड्या काळापुरतं का होईना भलं व्हावं म्हणून या हॅपीनेस ट्रेनमधून त्याला मोडेनाला पाठवण्याचं ठरवते. पण या उपक्रमाच्या विरोधात अनेक गैरसमजूतीही पसरवल्या जात असतात. जसं की तिकडे गेल्यावर या मुलांचे हातपाय तोडले जातील, त्यांना भिकेला लावलं जाईल. कम्युनिस्ट लहान मुलांना खाऊन टाकतात, त्यांना मारून साबण बनवण्यासाठी त्यांचा वापर करतात वगैरे वगैरे. आपल्याही मनात अगदी या नाही तरी अनेक शंका येऊन जातातच. कारण चांगुलपणावर, माणुसकीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवूच शकत नाही. या ट्रेनमधून जाण्यासाठी विरोध करणारा अमेरिगो उंदरांना पांढरा रंग देऊन विकताना पकडला जातो. शिक्षेच्या भीतीने तो जाण्याचं कबूल करतो. अनेक शंकाकुशंका मनात घेऊन शेवटी अमेरिगो आणि त्याच्यासारखी अनेक मुलं त्या ट्रेनमध्ये चढतात.

पलीकडे अनेक मायाळू कुटुंबं त्यांची वाट पाहत असतात. आपल्या अमेरिगोचा नंबर मात्र सर्वात शेवटी लागतो. त्याचा स्वीकार करावा लागतो डेरना नावाच्या एका शेतकरी महिलेला. डेरनाने युद्धादरम्यानच्या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला असतो. तिच्या बॉयफ्रेंडला त्या दरम्यान जिवंत जाळलेलं असतं. परिस्थितीच्या चटक्यांनी पोळलेल्या प्रथमदर्शनीच रुक्ष वाटणाऱ्या डेरनाला निरुपायाने अमेरिगोला घरी घेऊन यावं लागतं. ती दुसऱ्या दिवशी आपल्या भावाच्या कुटुंबाशी अमेरिगोची भेट घालून देते. त्या घरामध्ये, शहरामध्ये डेरनाच्या आयुष्यात अमेरिगो हळूहळू रुळू लागतो. काही कटु प्रसंगानंतर डेरनाबरोबरचं त्याचं नातं गहिरं होत जातं. पहिल्या दिवशी त्याला मायेनं जवळं घ्यायला बिचकणारी डेरना आपल्या दुःखामध्ये त्याला सहभागी करून घेते. वह्या, कंपासपेटी अशा अत्यंत साध्या पण या मुलांना अप्राप्य वाटणाऱ्या वस्तू त्याला आणून देते. दोन वेळेचं जेवण, स्वच्छ कपडे या गोष्टीही ज्यांना मिळत नव्हत्या अशा या मुलांच्या प्राथमिक गरजा तर इथे भागतच होत्या, पण त्याखेरीज त्यांना संस्कारांची, प्रेमाची, मायेची ठेवही मिळत होती. अमेरिगोला इथेच त्याच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवणारी देणगी मिळते ती डेरनाच्या भावाकडून. तो त्याला व्हायोलिनची ओळख करून देतो. ते वाजवायला शिकवतो. नेपल्समध्ये गरिबीत राहत असलेल्या त्याला आईकडून संगीताचा कान लाभला आहे. आईच्या गोड आवाजातील गाणी ऐकत तो मोठा झाला आहे. त्यामुळे संगीताची उपजत जाण असलेला अमेरिगो ही कला सहजपणे आत्मसात करायला सुरुवात करतो. मोडेनाहून नेपल्सला आल्यावर घरी आईकडे – आपल्या गावी जाण्याची ओढ असलेल्या अमेरिगोची ही ओढ हळूहळू कमी होते. आईने प्रवासासाठी निघताना दिलेलं एकमेव सफरचंद न खाता ते आपल्या हातात घट्ट पकडून ठेवणाऱ्या अमेरिगोची त्या सफरंचदावरची पकड हळूहळू सैलावते. मोडेनातील मुक्काम संपल्यानंतर परतताना सगळी मुलं आणि त्यांच्याशी मायेचं नातं जडलेली ही कुटुंबं सगळ्यांचीच अवस्था खूप बिकट होते. त्यातील काही मुलं आपण यांना भेटायला परत येऊ, ही आशा उराशी बाळगून तिथून निघतात. काही तिथेच राहतात. अमेरिगो मात्र आपल्या आईकडे परत येतो. आल्यासरशी तो आनंदाने त्याला भेट मिळालेलं व्हायोलिन तिला दाखवतो. ती मात्र रुक्षपणे ते व्हायोलिन पलंगाखाली सरकवते आणि “आता तू मोठा झाला आहेस, कामाला लाग. या चैनी आपल्यासारख्यांसाठी नाहीत,” असं खडसावते. आपल्याच आयुष्यातील या दोन टोकाच्या अनुभवांतील तफावत अमेरिगो सहन करू शकत नाही. तो सतत तुलना करत राहतो. पक्षाच्या कार्यालयात या मुलांसाठी त्यांच्या फॉस्टर पेरेंट्सनी पाठवलेल्या भेटवस्तू, पत्रं येत असतात.  डेरनाच्या पत्रांची, भेटवस्तूंची वाट पाहत राहतो. पण त्याची आई त्याला सांगते की, ‘ते लोक आता विसरले तुला! त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नकोस.’ एक दिवस जेव्हा त्याला त्याच्या आईने व्हायोलिन विकल्याचं कळतं तेव्हा मात्र तो ज्या कार्यालयातून त्यांना पाठवलं गेलं होतं तिथे जातो. तिथली महिला कर्मचारी त्याच्यासाठी आलेली सगळी पत्रं त्याच्या हातात सोपवते. आपल्या आईने ही गोष्ट आपल्यापासून लपवल्याचं कळताच अमेरिगो पुन्हा मोडेनाला जाण्याचा निर्णय घेतो आणि आईला न सांगताच ट्रेनमधून निघून जातो तो परत न येण्यासाठी!

चित्रपटाच्या शेवटी अमेरिगो नेपल्सला आपल्या घरी येतो. तिथल्या वस्तूंमध्ये आपल्या आईचा स्पर्श शोधण्याचा प्रयत्न करतो. तिथेच त्याला पलंगाखाली सरकवलेलं धुळीनं माखलेलं व्हायोलिन मिळतं. त्याच्या आईने ते दुकानातून परत आणून ठेवलेलं असतं. त्या व्हायोलिनला कवटाळून रडणाऱ्या अमेरिगोवर कॅमेरा स्थिरावतो आणि चित्रपट संपतो. पण शेवटी ऐकू येणारं ,Those who let others go, love them more than those who keep them.’  हे वाक्य आपल्याला आईपणाच्या ताकदीची जाणीव करून देतो. आपल्या मुलाच्या हितासाठी अमेरिगोची आई त्याला पळून जाण्याची परवानगी देते. त्याला अडवत नाही आणि डेरनाला एका पत्रातून सांगते की,‘जर तू त्याला कायमचं ठेवून घेणार असशील तरच त्याला राहू दे तुझ्याकडे; नाहीतर लगेच इकडे पाठवून दे.’

यात अमेरिगोच्या आईचं नाव मुद्दाम लिहिलेलं नाही कारण स्वतःच्या मुलासाठी त्याच्यापासून कायमचं दूर राहणं स्वीकारणारी, वेळप्रसंगी कठोर निर्णय घेणारी ही आई जगातल्या सगळ्या आयांचं प्रतिनिधित्व करते. अमेरिगोचा कायमस्वरूपी स्वीकार करणाऱ्या डेरनामध्ये आपल्याला आई दिसतेच पण आधी दिसते ती माणुसकी. अशा अनेक मुलांना आसरा देऊन त्यांच्या आयुष्यात काही क्षण का होईना सुखाची, मायेची पखरण करणाऱ्या अशा अनेक डेरना, अनेक कुटुंब तेव्हा होती, यावर खरंच विश्वास ठेवता येत नाही. ही कुटुंब काही संपन्न, समृद्ध नव्हती; पण आपल्यातीलच घास ती या मुलांना देऊ करत होती. खरंच या हॅपीनेस ट्रेन उपक्रमान दक्षिण व उत्तर इटलीतील दरी थोड्याफार प्रमाणात सांधली गेली असेल. सामाजिक, राजकीय पातळीवर इतका महत्त्वाचा निर्णय या महिलांनी घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला, ही बाब खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण चित्रपट पाहत असताना आता काहीतरी वाईट होईल, संकट येईल, अमेरिगोला वाईट वागणूक मिळेल अशी शंकेची पाल मनात चुकचुकत राहते. पण नाही घडत असं काही. सगळं सुरळीत होतं. युद्धकाळात आपल्या मनाचा चांगुलपणा टिकवून ठेवणं किती अवघड असेल. पण हे घडलं आहे, हे नक्की. हा चित्रपट खऱ्या प्रसंगावर आधारित नाही पण अनुभवांवर आधारित आहे. सध्याच्या चित्रपटांच्या कथानकांमधील कपट, हिंसा, क्रौर्य यांच्या पार्श्वभूमीवर ‘चिल्ड्रन्स ट्रेन’ हा खरंच एक सुखद अपेक्षाभंग आहे.




©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

 

.

 

 

सोमवार, २ डिसेंबर, २०२४

 



छंद माझा वेग???

ऑफिसच्या टीममधल्या एका नवीन सदस्याची ओख परेड सुरू होती. तीच प्रश्नावली सुरू होती,छंद कोणते, कशाची आवड आहे, इ. इ. त्यानिमित्ताने जुन्या सदस्यांच्या छंदांचीही उजणी झाली. त्यात एक-दोन पुरुषांचं उत्तर होतं, कुकिंग इज माय ह़ॉबी. पण मी अमुकच बनवतो, मला तमुकच बनवायला आवडतं अशा संदर्भासहित स्पष्टीकरणांनी मढलेली पुरुषांची वाक्य ऐकून इतरांच्या चेहेऱ्यावर उमटलेले कौतुकाचे भाव, अरे वा, हो का असे प्रशंसावाचक उद्गार या नेहमीच्या गोष्टी पार पडल्या. मग एका मुलीने सांगितलं मलाही कुकिंगची आवड आहे. ही मुलगी विवाहित होती. तिने हे सांगितल्यावर का कोण जाणे स्वयंपाकाची आवड असणाऱ्या मला तिचं वाक्य थोडं खटकलं आणि स्वतःचंच आश्चर्यही वाटलं. आता स्वयंपाकाची गोडी निर्माण झालेल्या मला स्वतःचाच रागही आला की मला असं कसं वाटू शकतंॽ असेल बाबा तिला कुकिंगची हॉबी.

स्वयंपाक करणं हा तिचा छंद आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. पण एखादा दिवस ती म्हणाली,आज मला माझा छंद काही जोपासायचा नाही बा! तर चालेल का, असा प्रश्न मला पडला. स्वयंपाक, सूपशास्त्र ही मुात एक कला आहे, कौशल्य आहे की छंद, यावर मोठा परिसंवाद घडू शकेल.

आजच्या घडीला एखादी मुलगी जर म्हणाली की मला नाही बाबा स्वयंपाकात फारसा इंटरेस्ट, तर काही लोक कौतुक करतील तिचं, काही समोरून बोलतील की असं कसं चालेल काही मागून बोलतील. पण हा प्रश्न मुलाच्या बाबतीत येत नाही. त्याला असं स्पष्टीकरण द्यावं लागत नाही.

मुात गरज ही फक्त शोधाची नाही तर सगळ्याची जननी असते, यावर माझा ठाम विश्वास आहे. आता आपल्या पोटापाण्याची सोय आपणच पाहायची आहे,  हे जेव्हा कतं तेव्हा माणूस मग ती स्त्री असो की पुरुष  स्वयंपाकाची कला म्हणा कौशल्य म्हणा शिकून घेतोच. थोडं डावं-उजवं सगीकडेच चालतं. माझ्यामते तरी त्यात लिंगभाव आड येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे खाण्याची आवड असणारा आणि वे पडल्यावर विराटाच्या घरी बल्लवाचार्य म्हणून राहणारा भीम. लहानपणी राघवेंद्र स्वामींच्या मठात जायचो तेव्हा तिथले स्वयंपाक रांधणारे-वाढणारे पुरुषच असायचे. तेव्हा त्याचं अप्रूप वाटायचं. आज अभिमान वाटतो. त्यामागची कारण वगैरे गोष्टी वेगळ्या. त्यांची चर्चा इथे करणं इष्ट नाही. आजकाल हॉटेल्स, मास्टरशेफ प्रतियोगिंतामध्ये वगैरे आपण या प्रांतातील पुरुषांची प्रगती पाहतोच आहोत.

पण असे पुरुष घराघरात असणं गरजेचं आहे. स्वयंपाक ही काही फक्त बायकांची मक्तेदारी नाही आणि ती नसावी.  सुधारक इथून लिंगभेद जेंडर डिस्क्रिमिनेशनवर घाव घालायला सुरुवात करू शकतात आणि सनातनी भीमाचा वारसा पुढे चालू ठेवू शकतात. परवाच कुठेतरी मी एक वाक्य वाचलं,कुकिंग इज जस्ट अ स्किल नॉट अ ड्यूटी. जसं तुम्ही तुमच्या आयुष्यात सायकल चालवायला शिकता आणि पुढे जाऊन दुचाकी वाहने, चारचाकीसुद्धा शिकता. त्या सायकलमध्येच अडकून बसत नाही, त्यातलीच ही गत आहे. प्रत्येकाला पोटापुरतं तरी रांधता आलं पाहिजे. मग पुढे जाऊन तुम्ही तो छंद म्हणून स्वीकारा, व्यवसाय म्हणून स्वीकारा किंवा कर्तव्य म्हणून तो तुमचा प्रश्न! घरातील प्रत्येक लहान मुलाला आणि मुलीला स्वयंपाकाचे प्राथमिक धडे देणं गरजेचं आहे. जी गोष्ट आपल्याकडे सध्या होत नाही. जसं आपण मुलांना सायकल येणं गरजेचं आहे म्हणतो तसंच ही गोष्टसुद्धा गरजेची आहे, याची जाणीव व्हायला हवी. लिंगभेदावर मात करण्याचा हा कदाचित एक सहजसोपा उपाय ठरू शकतो. ज्याची सुरुवात आपण कुठलीही आंदोलनं न करता आणि भाषणं न देता करू शकतो.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

 शब्दांचे बदलते लक्ष्य!



शब्दांच्या दुनियेत रमणाऱ्या लोकांना शब्द, शब्दार्थ, त्यांचे रूढ अर्थ, गर्भितार्थ यांच्याशी कायमच खेळायला आवडतं. काव्यशास्रामध्ये शब्द, शब्दशक्ती यां­­­­चा बराच ऊहोपोह झाला आहे. ‘प्रत्येक शब्दापासून अर्थाचा जो  बोध होतो  तो अर्थबोध करवून देणारा जो व्यापार आहे - म्हणजेच जी क्रिया आहे ती शब्दाची शक्ती आहे.’ शब्दाचे तीन प्रकार आहेत – वाचक, लक्षक आणि व्यंजक. या शब्दांच्या तीन शक्ती अभिधा, लक्षणा आणि व्यंजना आहेत आणि त्यांचे अर्थ अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ. आपण सध्या वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. खरंतर हा खूप गहन विषय आहे. पण लेखाच्या संदर्भाने थोडक्यात स्पष्ट करत आहे. लक्ष्यार्थाचे प्रकार, व्यंग्यार्थ यांचे मुद्दाम स्पष्टीकरण केलेले नाही.

वाच्यार्थ किंवा शब्दार्थ म्हणजे ‘साक्षात् संकेतितं अर्थम् यः अभिधत्ते स वाचकः।’

थोडक्यात शब्दाचा  थेट, मूळ अर्थ. शब्द उच्चारल्यानंतर जी आकृती समोर उभी राहते ती आकृती. उदा. ‘गाय’ म्हणजे चार पाय, सड आणि शिंग असणारा एक पशु. ‘वाघ’ म्हणजे एक रानटी प्राणी.

पुढचा अर्थ आहे लक्ष्यार्थ – ‘मुख्यार्थबाधे तद्योगे रूढितः अथ प्रयोजनात्।

अन्यः अर्थः लक्ष्यते यत् सा लक्षणा आरोपिता क्रिया।।’

 

ती सुरेखा ना, गाय आहे अगदी! तो रमेश ना फार शहाणा आहे!” यांतील ‘गाय, शहाणा’ या शब्दांचा अर्थ नेमका काय घ्यायचा, हे सुज्ञालाच कळते. जिथे शब्दाचा मुख्य अर्थ दूर सारून आपल्याला हवा असलेला अर्थ मिळवण्यासाठी एखादी रूढी किंवा कारणाचा आसरा घेतला जातो, तिथे येतो लक्ष्यार्थ.  म्हणजेच एखादा शब्द विशिष्ट पद्धतीने वापरला जात असेल, तर त्या अनुषंगाने त्या शब्दाचा वापर करणे.

आजच्या आपल्या लेखाचा रोख आहे तो शब्दांच्या लक्ष्यार्थावर. वर्षानुवर्षं ज्या संदर्भाने लक्ष्यार्थाचा वापर होत आहे ते संदर्भही काळानुसार बदलत चालले आहेत. काही शब्दांच्या चुकीच्या वापरामुळे, काही प्रचलित वापरांना भिन्न वळण दिल्याने.  हे आजकाल मुख्यत्वे खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत पाहायला मिळते. काही वर्षापूर्वीपर्यंत एखादा बकाबका खाऊ लागला तर “बकासुरासारखा खाऊ नकोस रे,” हा संवाद कानी पडायचा. कोणाला खूप भूक लागली असेल, तर “ओत ते पातेलं त्याच्या ताटात,” “याच्या दिवसभराच्या खादाडीला कंटाळले बाई,” असे संवाद घराघरातून ऐकू यायचे.  पण आता ‘बकासुर, बादलीभर अमुकतमुक, खादाडी’ हे आणि असे अनेक नकारात्मक अर्थाने वापरले जाणारे शब्द उपहारगृहांच्या नावासाठी वापरले जात आहे. पूर्वी योद्धे रणांगणावर शत्रूची ‘खांडोळी’ करायचे. पण आता चतुष्पादांची ‘खांडोळी’ करणारी उपहारगृहे दिसतात. एखादी व्यक्ती आवडणे यासाठी पूर्वी ‘मनात भरणे’ हा वाक्प्रचार वापरला जाई. आता मात्र हिंदीच्या प्रभावाखाली येऊन ‘तो व्यक्ती मनात उतरतो’.  ‘मनातून उतरणे’ मराठीत अगदी विरुद्ध अर्थाने वापरले जाते, हे ते लिहिणाऱ्याच्या बोलणाऱ्याच्या गावीही नसते. आता ‘गावी नसणे’ याचं पुढे काय होईल माहीत नाही. आणि हो, ‘तो’ व्यक्तीच! अनेक ठिकाणी माणूस, इसम या शब्दांच्या ऐवजी व्यक्ती शब्द वापरला जातो खरा; पण मराठीत ‘ती’ व्यक्ती असते ‘तो’ व्यक्ती नाही, याची खबरदारी घेतली जात नाही.

ज्या भाषेत बदल होतात तीच भाषा जिवंत राहते, प्रवाही राहते,  ही गोष्ट मला मान्य आहे. पण मूळ भाषेची कास सोडून भाषेचा प्रवाह भरकटू नये, हीच अपेक्षा आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स, टीव्ही सिरिअल्स यांचा जमाना आहे. अशात पात्रांच्या तोंडी दिले गेलेले संवाद नकळतपणे कधी प्रचलित होतात कळतही नाही. प्रमाण भाषेव्यतिरिक्त स्लॅंगही  असणे आणि कित्येकांना ती न कळणे, ही आता सामान्य गोष्ट आहे. पण समाजाच्या बदलत्या मानसिकतेनुसार रूढार्थांमध्ये होणाऱ्या बदलांचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे, असे वाटते.

टीप: या लेखाद्वारे कोणावरही वैयक्तिक टीका करण्याचा माझा उद्देश नाही. फक्त दिसणाऱ्या बदलांची नोंद घ्यावीशी वाटलं इतकंच.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

 

 

 

 

 

 

 

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

 

धागा आठवणींचा!

 


माझ्या माहेरी उभ्या महालक्ष्मी बसवायची पद्धत नाही. गौरी-गणपतीचे दिवस आले की आम्ही आमच्या आजीच्या मागे भुणभुण करायचो,आपल्याकडे का नसतात गं गौरी? तेव्हा आजी तिच्या गोष्टींच्या पोतडीतून एक गोष्ट काढायची आणि सांगायची. अगं, आपल्याकडे होत्या पूर्वी, पण आपलं गाव आहे ना, हडलगी अगदी डोंगराच्या मधोमध वसलेलं होतं बरं का! आजूबाजूला दाट जंगल होतं. एका वर्षी सगळी पूजा वगैरे झाली आणि आम्ही आत झोपलो होतो, तर वाघ आला आणि गौरी पाडून गेला. तेव्हापासून आपण बसवत नाही गौरी. आम्ही डोळे विस्फारून दरवेळी तेवढ्याच उत्सुकतेने ही गोष्ट ऐकायचो. जेव्हा जेव्हा ती ही गोष्ट सांगायची तेव्हा जाम भारी वाटायचं. डोगरांच्या मधोमध वसलेलं ते गाव, तिथलं अंधारं घर सगळं अगदी डोळ्यांसमोर जसच्या तसं उभं राहायचं. मनाचं तेवढ्यापुरतं समाधानही व्हायचं काहीतरी कारण आहे बरं का आपल्याक़डे गौरी नाहीत याचं!

यावर्षी माझ्या पाहण्यात एक ब्लॉग आला. त्यात असा उल्लेख होता की ज्यांच्याकडे काही कारणाने गौरी बसवण्यात खंड पडतो ते असं सांगतात की वाघाने त्या पाडल्या. तेव्हा आजीने सांगितलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण झाली. परंपरा, रीती यांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा धागा आहे, हे खरं. पण मला मात्र या गोष्टीमुळे आजीच्या गोष्टीतलं ते घर, डोंगर धूसर होतात की काय, असं वाटायला लागलं. खरं म्हणजे वाईटच वाटत होतं मला की आजीनं सांगितलेली गोष्ट खरी नाही तर!

परवा एका लग्नानिमित्त आम्ही बेळगावला गेलो होतो. आमचं गाव हडलगा/हडलगी तिथून जवळच होतं. त्यामुळे आजवर ज्यांनी ते गाव कधीच पाहिलं नाही अशी आमच्या पिढीतली मंडळी आणि सगळे मोठे मिळून त्या गावी गेलो. हे सगळं पाहून आजीची खूप आठवण झाली. कधीही न पाहिलेल्या पणजी-पणजोबांच्या आठवणींना तिथे उजाळा मिळाला. आई, काका, मावशी यांनी तिथल्या गोष्टी सांगितल्या. तिथलं ते घर, आजूबाजूचा परिसर पाहताना मनातल्या त्या गोष्टीवर साचलेलं धुकं आपोआप दूर झालं. आजच्या काळातही दुर्गम म्हणावं असं ते गाव आहे. तिथे देऊळ आहे, घर आहे.

तिथे गेल्यावर मी स्वतःला पुन्हा एकदा समजवलं, आजी सांगत होती तेच खऱं होतं. रीत वगैरे सब झूठ! किमान माझ्यासाठी तरी! माझ्या लहानपणीच्या ठेव्यामधली ती एक अमूल्य गोष्ट आहे, जिने मला आमच्या मूळ गावाशी बांधून ठेवलं आहे. त्यामुळे मी तरी तिला धक्का पोहोचू देणार नाही. तिथे जाऊन जे वाटलं ते शब्दातीत आहे. दिसायला सगळं नेहमीचंच होतं पण आमच्यातल्या प्रत्येकाला त्या जागेविषयी जे वाटतं होतं ते महत्त्वाचं होत. काहीजणांच्या आठवणी प्रत्यक्ष होत्या, तर आमच्यासारख्यांच्या ऐकीव. पण त्याच आठवणींच्या धाग्याने आम्हाला बांधून ठेवलं आहे, हे नक्की. काळाच्या ओघात गोष्टी नाहीशा होतात, आठवणी राहतात. पण अशा अमूर्त आठवणींमध्ये खूप मोठी ताकद असते, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा जाणवलं.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

शोध भक्तीचा

 


माझा मुलगा मला दिवसभर काही ना  काही प्रश्न विचारत असतो. आमच्या या प्रश्नोत्तरांमधून मलाही अनेक प्रश्न पडतात, त्यांची उत्तरं शोधावीशी वाटतात. एक दिवस आमचा संवाद असाच  पांडव – महाभारत, कृष्ण, रामायण – राम, लक्ष्मण, रावण एवढा सगळा प्रवास करून आला. त्यानंतर मला त्याने एक कळीचा प्रश्न विचारला तो म्हणजे, “आई, कृष्णपण देव होता आणि रामपण, हो ना?” प्रश्न ऐकून मला एकदम हुरूप आला. मी आता याला दशावतार म्हणजे काय वगैरे सांगू या आवेशात मी पुढे सरसावले. पण तेवढ्यात त्याने एक यॉर्कर टाकला आणि मी बाद झाले. “पण जर दोघेही देवच होते, तर मग आपण कोणाची भक्ती करायचीॽ” हा होता त्याचा प्रश्न. मी एकदोन क्षण शांत. मग त्याला मी तेवढ्यापुरतं उत्तर दिलं, “हे बघ आपण रामनवमी साजरी करतो तशी गोकुळाष्टमीसुद्धा करतो ना.” या उत्तराने त्याचं तात्पुरतं समाधान झालं, पण मला अस्वस्थ केलं.

मला वाटलं आपण लहानपणी आई-वडिलांनी ज्या देवांना नमस्कार करायला सांगितला त्यांना मुकाटपणे नमस्कार केला. हा प्रश्न मोठेपणी पडला खरा, मग त्याची उत्तरं शोधायचाही प्रयत्न केला. पण इतक्या लहान वयात भक्ती कोणाची करायची, हा प्रश्न पडला, त्याचं उत्तर मिळेना का पण शोधाचा प्रवास जरी सुरू झाला तरी काय बहार येईल असंही वाटून गेलं! आता तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील. पण आत्ता त्यांच्यावर चर्चा न करणं बरं आहे. आजच्या या लेखाचा विषय थोडा वेगळा आहे.

‘भज्’ धातूपासून तयार होणारा हा शब्द ‘भक्ती’. भक्ती म्हणजे एखाद्याप्रति पूर्ण समर्पणाची भावना, वाहून घेणे, श्रद्धा ठेवणे. भक्तीचे अधिष्ठान काय आहे, म्हणजेच आपण कशावर भक्ती करतो ते महत्त्वाचं आहे. मग ते सगुण साकार रूप असो, निर्गुण – निराकार असो किंवा एखादी कला, एखादा विचार, एखादा ध्यास असो. भक्ती ही कर्मकांडाशी आजिबात बांधील नाही. माझ्यामते ती प्रत्येकाचा खाजगी विषय आहे. एखाद्याला ईश्वराच्या सुंदर मूर्तीमध्ये भक्तीची प्रचिती येऊ शकते तर दुसऱ्याला तर्कसुंसगंत वैज्ञानिक शोधांमध्ये. माझ्यामते तर नास्तिक व्यक्तीसुद्धा तिच्या विचारांवर  ठाम असते म्हणजे ती त्या विचारांची भक्तच असते. ते अधिष्ठान महत्त्वाचं आहे, जे जगण्याचं, पुढे जाण्याचं, शोध घेण्याचं बळ देतं.

गीतेमध्ये ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग हे तीन मार्ग सांगितले आहे. ‘भक्ती’ हा शब्दच सध्या साशंकतेच्या भोवऱ्यात अडकला आहे. अध्यात्म, रुढी-परंपरा, ज्ञान, कर्म, शास्त्र हे शब्द सध्या एकतर खूप ग्लॅमरस म्हणून वापरले जात आहेत किंवा हिणवले तरी जात आहेत.पण जर आपण आपल्या पुढच्या पिढीला ज्ञानाची, विचारांची भक्ती करावयास सांगितली; आपणही या कर्मभक्तीची, वैचारिक भक्तीची कास धरून जगत राहिलो तर खूपसे प्रश्न आपोआप सुटतील असं वाटतं.

हा विषय खूप गहन आहे आणि यावर एवढंच लिहून थांबावं, असं मला वाटत नाहीये. त्यामुळे पुढेही या विषयावर लिखाण करण्याचा प्रयत्न करेन.

 

रविवार, २८ जुलै, २०२४

द्रौपदीची थाळी आणि मेथीची भाजी




लेखाचं नाव वाचून जरा बुचकाळ्यात पडला असाल, तरी पुढे खुलासा होईल. महाभारताच्या वनपर्वात दुर्वास ऋषी आणि द्रौपदीच्या थाळीची गोष्ट आहे. आपल्यापैकी बहुतेकांना ही गोष्ट माहीत आहे. तरी थोडक्यात एकदा सांगायचं तर पांडव वनवासात असताना दुर्वास ऋषी हस्तिनापूरमध्ये येतात. तेव्हा दुर्योधन एका विशिष्ट हेतूने त्यांची भरपूर सेवा करतो. दुर्योधनावर प्रसन्न होऊन दुर्वास त्याला हवे ते मागण्याची आज्ञा देतात. तेव्हा पांडवांची फजिती करण्यासाठी अगदी नाटकीपणे दुर्योधन त्यांना विनंती करतो की,‘गुरुदेव माझे बंधू सध्या वनात  आहेत, जसा तुम्ही माझ्यावर अनुग्रह केलात तसाच त्यांनाही आपले आदरातिथ्य करण्याची संधी द्यावी, ही विनंती आहे.’ दुर्वासांचे आदरातिथ्य म्हणजे जणू काही सत्त्वपरीक्षाच, याची जाणीव दुर्योधनाला होती. वनात पांडवांना योग्य आदरातिथ्य कसे करता येईल, मग दुर्वास पांडवांना नक्कीच शाप देतील, हा या विनंतीमागचा खरा हेतू होता.  

दुर्योधनाच्या विनंतीनुसार हस्तिनापुरातून परीक्षा घेण्यासाठी वनात आपल्या दहा हजार शिष्यांसह आलेले दुर्वास. त्यांनी द्रौपदीकडे केलेली भोजनाची मागणी. द्रौपदीला सूर्याने एक थाळी दिली होती. ज्या थाळीतून द्रौपदी जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत भोजन मिळत असे. पण दुर्वास नेमके तिचे जेवण झाल्यावर हजर झाले आणि म्हणाले आम्ही नदीवर जाऊन आंघोळ करून येतो तोपर्यंत आमच्या भोजनाची व्यवस्था करून ठेव. द्रौपदीसमोर मोठा पेच उभा राहिला. तिने कृष्णाचा धावा केला आणि नेहमीप्रमाणे तिच्या मदतीला हजर झाला तिचा सखा कृष्ण. द्रौपदीने कृष्णाला आपली समस्या सांगितली. पण तोसुद्धा आल्याआल्या म्हणाला, “कृष्णे, मला भूक लागली आहे. काही सुचत नाहीये. आधी खायला दे मला काहीतरी. मग तुझं काय ते पाहू.”

त्यावर द्रौपदी म्हणाली,“ कृष्णा, माझं जेवण झालं आहे रे...आता काहीच खायला मिळणार नाही त्या थाळीतून.” पण कृष्ण म्हणाला,“ मला आणून तरी दाखव ती थाळी.”

स्थाल्याः कण्ठे अथ संलग्नं शाकान्नं वीक्ष्य केशवः। उपयुज्य अब्रवीत् एनाम् अनेन हरिः ईश्वरः। विश्वात्मा प्रियताम् तुष्टः च अस्तु इति यज्ञभुक्।।

थोडक्यात सांगायचं तर त्या थाळीच्या कडांना चिकटलेले पालेभाजीचे पान पाहून श्रीकृष्णाने ते खाल्ले आणि तो म्हणाला,“ या पानाने ईश्वर संतुष्ट होवो.” त्यानंतरची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पांडवांची फजिती करून त्यांना शाप द्यायच्या उद्देशाने आलेले दुर्वास आणि त्यांचे शिष्य यांचं पोट आपोआप भरून गेलं आणि ते नदीवरूनच परतले. आता विश्वात्म्याचं, जगन्नियत्याचंच पोट भरलं म्हटल्यावर इतरांची काय कथा!

तर ही झाली मूळ गोष्ट.माझ्यासाठी या गोष्टीत महत्त्वाचं आहे ते थाळीला चिकटलेलं पान. महाभारताचे काही भाग आणि त्याच्याशी संबंधित साहित्य वाचताना या गोष्टीची वेगवेगळी रूपं सामोरी आली. त्यात कधी त्या थाळीला भाताचं शीत चिकटलेला उल्लेख होता तर कधी भाजीचं पान. आजीने जेव्हापासून ही गोष्ट सांगितली तेव्हापासून ते थाळीला चिकटलेलं भाजीचं पान मनात रेंगाळत होतं. कुठली बरं असेल ती भाजी असा प्रश्न पडला होता. मूळ कथा वाचेपर्यंत मनात मी कायम धावा करत असे की देवा, ते पालेभाजीचं पानच असू दे.

 असं म्हणयचं कारण म्हणजे मोठं होताना आवडीची झाली मेथीची भाजी. मूगडाळ घालून केलेली मेथी, तुरीचं वरण घालून केलेली मुद्दीपल्ल्या, लसणाची खमंग फोडणी दिलेली परतलेली मेथी आणि फक्त जिरे-लसणाच्या फोडणीवर परतलेली मेथी...कुठलाही प्रकार घ्या आजकालच्या फॅन्सी भाज्यांना टक्कर देईल अशी चव. नुसती जिऱ्याच्या फोडणीवर परतलेली खमंग मेथीसुद्धा काय लागते... बाजारातून आणल्यावर  हिरवीगार दिसणारी ती मेथीची पेंडी पाहिल्यावरच तिचा खमंग वास यायचा. पण एवढी मोठी पेंडी आणि तिची ती चोरटी भाजी बघितल्यावर आश्चर्यच वाटायचं, राग यायचा खरंतर. एवढ्या मोठ्या कुटुंबात आपल्या वाट्याला ती किती येणार असं वाटायचं. तीच गत स्वयंपाक करू लागल्यावर झाली. मेथीची भाजी तर आवडीची पण ती होणार केवढीशी हा प्रश्न अजूनही दरवेळी मनात येतो.

पण या मेथीची खास बात काय आहे माहितीये का...एक घास खाऊनही मी तृप्त होते. थोडीशी भाजीसुद्धा मनाला संतुष्ट करून जाते. त्यामुळे माझ्यासाठी तरी या गोष्टीत ते थाळीला चिकटलेलं पानं मेथीच्याच भाजीचं आहे. माझ्या कल्पनाविश्वात तरी श्रीकृष्ण मेथीचंच पान खातो.

आपल्या इतिहासकाव्यातील कथांना अशाच प्रकारे नवी रूपं मिळत असतील आणि प्रतिभेचा नवा साज लेऊन लोककथांच्या रूपात त्या आपल्या समोर येत असतील. शतकानुशतके सांगितल्या जाणाऱ्या या कथांचं कर्तृत्व काळाच्या ओघात लोप पावतं, पण या कथा मात्र अशाच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. आजकाल रात्री झोपताना आजीच्या गोष्टींचा जागी फेरीटेल्सनी घेतली आहे. या गोष्टीलाही हरकत नाही. पण आपल्याला समृद्ध करणाऱ्या या गोष्टी जपण्याची जबाबदारी आपली आहे. मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येकाकडे हा ठेवा असणार आहे. हा ठेवा जपणं त्याची कुठेतरी नोंद करणं गरजेचं आहे, असं वाटतं.

 

ता.क. – खाणं आणि वाचणं या माझ्या आयुष्यातील दोन अत्यंत आवडीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी त्यांची सांगड घातलीच जाते.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र – गुगलच्या सौजन्याने


शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

इट्स ऑल अबाऊट द राईट टर्न





इट्स ऑल अबाऊट द राईट टर्न

काही चित्रपट असे असतात जे आपल्याला आपल्यातल्या चांगुलपणाची आठवण करून देतात. 'द ब्लाइंड साइड.'  हा असाच एक चित्रपट. पहिल्यांदा हा पाहिला तो सँड्रा बुलकच्या प्रेमाखातर. ही बाई कुठल्याही पिक्चरमध्ये असेल, तरी तो मी पाहते... फक्त तिच्याचसाठी. पण तो एक वेगळा विषय आहे. पहिल्यांदा पाहिला तेव्हा सँड्रासाठी पाहिला. मायकल ओहर नावाच्या एका फुटबॉलपटूच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आहे. ण माझ्यासाठी ही फक्त त्याची नाही, तर ली ॲन टूही, तिचं आख्खं कुटुंब या सगळ्यांची गोष्ट आहे.

 कुठल्याही प्रकारचा बॉल हाताळण्याच्या कौशल्यामुळे शिक्षण मध्येच सोडावं लागलेल्या मायकलला म्हणजेच  बिग माईकला एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळतो. तिथे आपला वर्ण, धिप्पाड देहयष्टी यांमुळे उठून दिसणारा 'बिग माईक' खरंतर तिथल्या व्यवस्थेत रुळण्याचा जीवापाड प्रयत्न करत असतो. पण ज्यांच्या जगण्याचा, टिकून राहण्याचाच प्रश्न इतका मोठा आहे अशांना समाजात वावरायच्या पद्धतींची काय ओळख असणार! त्यामुळे शाळेतल्या विश्वाची पहिली झलक मिळाल्यानंतर माईक गोंधळून जातो. ज्यांच्या घरात तो राहत असतो, तिथे त्याच्यावरून वाद होतात. तिथून तो बाहेर पडतो. ना राहायला निवारा, ना पोटाची सोय. त्यामुळे  इथेतिथे पडलेले खाण्याचे कागदी डब्बे गोळा करून त्यातलं उरलेलं खाणं खात असतो. कधी शाळेच्या आवारात आणि तिथून हाकलून दिल्यानंतर पब्लिक वॉशिंग एरियामध्ये रात्रीचा आसरा शोधत असतो. अशातच  मुलांच्या शाळेतल्या एका कार्यक्रमावरून परत येताना ली ॲनला बिग माईक दिसतो. ती आपल्या मुलाला विचारते याचं नाव काय. तिचा मुलगा एसजे त्याला आम्ही 'बिग माईक'च म्हणतो असं सांगतो. एवढ्या थंडीत बाहेर फिरणाऱ्या या मुलाला 'तू कुठे जातोयस,' असं विचारल्यावर 'जिम' हे मिळालेलं उत्तर ऐकून ते पुढे जातात खरे. पण तिला काहीतरी वेगळं जाणवतं आणि ती आपल्या नवऱ्याला गाडी वळवायला सांगते. आणि हेच वळणं मायकलच्या आयुष्यासाठी निर्णायक ठरतं. ती  त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारते "तुझ्याकडे जाण्यासाठी जागाआहे का?" तो काही न बोलता उभा राहतो. 
एका क्षणाचाही विचार न करता ली ॲन त्याला घरी घेऊन येते. रात्री झोपायला जागा देते. एका अनोळखी व्यक्तीला आपल्या घरात रात्री आसरा देण्यासाठी किती धमक असावी लागते, हे वेगळं सांगायची गरज नाही. सकाळी उठल्यानंतर आपण कशालाही तोंड द्यायला तयार राहू, तसाही इन्शुरन्स आहेच, असा विनोद करून ती माईकला पाहायला जाते.  अंथरुणाची नीट घडी करून एका प्लास्टिकच्या पिशवीत सामावलेलं आपलं पूर्ण आयुष्य घेऊन निघालेल्या माईकला ती थांबवते त्याची चौकशी करते. त्याला खायला प्यायला देते. कोणीतरी आपल्याशी इतकं चांगलं वागत आहे ही गोष्टच माईकसाठी नवीन असते. पण थोड्या दिवसांनतर ती त्याला विचारते की 'तू इथे रोज झोपायला येणार असशील, तर मी तुझ्यासाठी बेडची व्यवस्था करते. एव्हाना माझ्या भल्याचांगल्या सोफ्याची तू वाट लावलीच आहेस. ती तू आणखी लावू नयेस, असं वाटतंय मला म्हणून विचारतेय बाकी काही नाही.' यावर माईक तिला 'हो' म्हणतो. त्यानंतर ती त्याच्यासाठी आख्खी एक रूम तयार करते. स्वतःचा बेडही नसणाऱ्या माईकला ती आपल्या घरातली एक रुम देते
.
यानंतर सुरू होतो 'माईक ते मायकलचा प्रवास'...माईकच्या प्रोटेक्टिव्ह इन्स्टिक्टला बरोब्बर हेरून फुटबॉलमध्ये त्याचा वापर करून घेणं, एका कृष्णवर्णीय मुलाला स्वतःच्या घरात आपल्या तरुण मुलीबरोबर आणि लहान मुलाबरोबर ठेवून घेणं. नकळतपणे आईच्या मायेची ऊब देणं.  लोकांनी शंकाकुशंका घेतल्यानंतरही ठाम राहणं, त्याला कुटुंबामध्ये सामावून घेणं आणि अनेक भावनिक आंदोलनांचा सामना करून शेवटी त्याला दत्तक घेणं, या ली ॲनच्या कृतींमधून तिचं व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. आणि हे सारं तिने आधी ठरवलेलं नाही. आल्या प्रसंगाला सामोरं जातानाची ही तिची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे, हे जाणवल्यावर तर हा प्रवास आणखीनच लक्षवेधी ठरतो. 

ली ॲनने माईकला मायकल बनवलं. त्यानंही तिच्यातलं माणूसपण ओळखलं. तिने पुढे केलेला हात विश्वासानं धरला. पण तो हात पुढे करण्याचा विश्वास, ते एका क्षणाचं सामर्थ्य आणि घेतलेली जबाबदारी काही झालं तरी पार पाडण्याचा आत्मविश्वास असणारी ली ॲन माझी भारी आवडती आहे.  हा एका प्रसिद्ध फुटबॉलपटूचा जीवनप्रवास आहेच, पण त्याखेरीज शिक्षणाच्या, प्रगतीच्या संधींपासून वंचित असणाऱ्या मायकलला हक्काने त्या संधी मिळवून देण्याचा, त्या स्फूर्तीचाही हा प्रवास आहे. अतिशय संयत पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता हा विषय या चित्रपटात मांडला गेला आहे. 

मी हा चित्रपट 'कथार्सिस किंवा साधारणीकरण' साधण्यासाठी पाहते. म्हणजे काय हे पुन्हा कधीतरी सांगेनच. पण थोडक्यात सांगायचं तर, एखादी कलाकृती पाहिल्यावर आपल्या मनात उमटणारे भाव आपल्याला कळणं. मग ते हसू असो रडू असो! त्यानं एक आगळं समाधान लाभतं. असाच आगळंवेगळं समाधान देणारा आणि आपणही आयुष्यात असा 'राईट टर्न' कधीतरी घ्यावा अशी जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.


© तृप्ती अ. कुलकर्णी

(छायाचित्र: अर्थात गुगलच्या सौजन्याने)