घेतला वसा…
“तुला काय आवडतंॽ” या प्रश्नाचं माझं लहानपणापासून ठरलेलं उत्तर आहे. “मला खायला आवडतं आणि वाचायला आवडतं.” अन्न, वस्त्र, निवारा आणि पुस्तक या माझ्या प्राथमिक गरजा आहेत. लहानपणी वाचायला आवडतं म्हटल्यावर, “हो का अरे वा छान हं! वाचत जा,” वगैरे प्रोत्साहनपर शब्द कानावर पडायचे. मोठं झाल्यावर,“हो का वाचायला आवडतंॽ मग काय वाचायला आवडतं, कादंबऱ्या की सिरिअस पुस्तकं, असले प्रश्न विचारायचे लोक. तेव्हा मी ‘काहीही’ असं सांगायचे त्या ‘काहीही’ ला किती महत्त्व आहे, हे मला आज कळतंय.
लहानपणापासून मी अक्षरशः समोर येतील त्या शब्दांचा फडशा पाडला आहे. चांदोबा, चंपक, चाचा चौधरी वगैरे दुसरीतिसरीपर्यंत सोबत होते. शनिवारी दुपारी माझ्या घरी पोस्टाने चांदोबा यायचा. मी आतुरतेने वाट पाहायची त्या चांदोबाची आणि तो हातात पडला की संध्याकाळपर्यंत वाचून संपलेला असायचा. मग पुढच्या चांदोबाची वाट पाहायची. घरी कुणी पाहुणे आले की दादांबरोबर स्टेशनवर सोडायला जायचा हट्ट करायचे. तिथल्या स्टॉलवरून कॉमिक्स घ्यायचंय या एका हट्टापायी. घेतलेल्या दोन कॉमिक्सपैकी एक घरी येतायेता गाडीवर मागे बसून वाचून संपलेलं असायचं. गावातली एक लायब्ररी लावायची सुट्टीत. सकाळी पुस्तक घ्यायचं आणि संध्याकाळी ते परत करून दुसरं आणायचं. तेव्हा सकाळी एक संध्याकाळी एक किंवा एका वेळेस दोन अशी पुस्तकं लहान मुलांना घेता येत नव्हती. पण तिथल्या काकांना माझी बहुतेक दया आली. त्यांनी मला सकाळ संध्याकाळ पुस्तक बदलायची परवानगी दिली. किती भारी वाटलं होतं तेव्हा! किती हा अधाशीपणा होता, असं वाटतं आता. तर हे वाचनवेड थांबलं नाही वाढतंच गेलं.
तुम्ही काय वाचता याचं उत्तर मी पाकशास्त्राच्या पुस्तकापासून अद्वैत वेदान्तावरील ग्रंथापर्यंत सगळं काही वाचते, हे आहे. लहानपणीची माझी लाडकी आणि सदैव उपलब्ध असणारी पुस्तकं म्हणजे 'संपूर्ण चातुर्मास' आणि 'रुचिरा' भाग १ आणि २. चातुर्मासाच्या पुस्तकातल्या वारांच्या कहाण्या माझा आवडता भाग. कित्ती वेळा वाचल्या असतील त्या कहाण्या. तेव्हा त्यांचं धार्मिक महत्त्व कदाचित कळत नसावं. पण जादूची होडी सारखी पुस्तकं जशी वाचत असे तसंच या कहाण्याही वाचत असे. एक अद्भुत जग होतं ते. तीच गोष्ट रुचिराची. त्यातली चित्र, पाककृती, ती खाद्यपदार्थांच्या बाहुल्यांची पंगत, लवंगलतिकासारखी नावं असलेले पदार्थ. सुट्टीच्या कित्येक दुपारी या पुस्तकांची पानं चाळत घालवली आहेत. नंतर वाचनाचा आवाका वाढला. नवीन लेखकांची, पुस्तकांची, भाषांची भर पडली. ललित, शास्त्रीय ग्रंथ, कथा-कादबंऱ्या, बालसाहित्य, शोधनिबंध खूप काही वाचलं.
कदाचित शब्दांवरच्या-पुस्तकांवरच्या या प्रेमामुळं उपजिवीकेचं साधनही ही पुस्तकंच बनली. आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं हे सांगावसं वाटतं की वाचनाला कोणतंही बंधन असू नये. चांगलं-वाईट, भलं-बुरं सगळं वाचावं. सगळं नजरेखालून गेलं पाहिजे. प्रत्येक पुस्तक, प्रत्येक साहित्यप्रकार आपल्या ज्ञानात भर घालणाराच असतो. आज अनुवाद क्षेत्रात काम करताना ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. खूपदा समोर येणारे संदर्भ शोधावे लागतात.घटना, गोष्टी, दंतकथांचे संदर्भ पाहावे लागतात. पण आधी झालेल्या वाचनात यांचा समग्र अभ्यास झाला नसला, तरी त्या गोष्टी ओझरत्या का होईना माहीत असणं महत्त्वाचं ठरतं. म्हणतात ना ‘Jack of all trades, master of none!’ पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना चातुर्मासातल्या कहाणीप्रमाणे सांगावसं वाटतं, घेतला वसा टाकू नका. पुस्तकांवर प्रेम करत रहा. आता माध्यमं बदलली असली, तरी वाचत रहा आणि आपल्या कक्षा विस्तारत रहा. जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व पुस्तकप्रेमींना मनापासून शुभेच्छा!
© तृप्ती अ. कुलकर्णी
(छायाचित्रे: अर्थात गुगलच्या सौजन्याने)

Ho kharach.. mi pan asach.. sagala wachate.. kahi hi.. awadata mala.. 👍😊
उत्तर द्याहटवाI can totally relate with this....mi pan lahanpani asach je milel te vachayeche....sampoorn chaturmaas madhlya kahanya faar avdaychya
उत्तर द्याहटवाSame here. काहीही हेच माझेही उत्तर असते अजून
उत्तर द्याहटवा