एका चंद्रतळ्याची गोष्ट!
कोकणातलं एक छोटसं गाव.
त्या गावातल्या देवीचं प्राचीन मंदिर. ही देवीच या गावाची रक्षणकर्ती आहे, यावर
गावकऱ्यांची नितांत श्रद्धा. त्यांच्या या श्रद्धेचं फळही देवी तितक्याच मायेनं,
आपुलकीनं देत असे. गावात कोणाकडे लग्नकार्य निघालं आणि त्या कुटंबाची दागिने करण्याची
ऐपत नसेल, तर गावकरी रात्री एका परडीत फुलांचे दागिने ठेवत असत आणि देवळालगतच्या
तलावात सोडत. दुसऱ्या दिवशी त्या परडीत मिळत सोन्याचे दागिने. देवीच्या आपल्या
भक्तांवरच्या मायेचीच प्रचिती होती ही. हे दागिने मिळवण्यासाठी अट फक्त एकच कार्य
संपन्न झाल्यावर हे दागिने पुन्हा तळ्याच्या पाण्यात सोडायचे. देवी आणि तिच्या
भक्तांमधला हा आपुलकीचा, मायेचा करार वर्षानुवर्ष सुरू होता. पण कोणा एका
दुष्टाच्या मनात मोहाचा राक्षस शिरला. त्यानं दागिने परत तळ्यात सोडलेच नाहीत.
तेव्हापासून देवी रुसली, कोपली ती कायमचीच आणि तो करार संपला.
ही गोष्ट आहे धामापूरच्या
भगवतीच्या देवीची आणि देवळाला लागून असलेल्या तळ्याची. इयत्ता अकरावीच्या
मराठीच्या पुस्तकात आम्हाला मारुती चितमपल्लींचा एक धडा होता. त्या धड्यातच या
दंतकथेचा उल्लेख आला होता. तेव्हापासून ही कथा मनाच्या कोपऱ्यात घर करून बसली होती.
कायम वाटायचं कुठे असेल हे गाव, तिथलं ते देऊळ, तो तलाव. पंधरा एक वर्षांमागे
तारकर्लीला गेले तेव्हा तिथे रिक्षानं फिरताना रिक्षावाल्यानं एक भगवतीचं देऊळ
दाखवलं आणि माझ्या तोंडून लगेच प्रश्न निघाला,“मग इथे तळं असेल ना मागच्या बाजूला?” त्या माणसानं माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं आणि
तितक्याच विचित्र सुरात “नाही” म्हणाला. मला अगदी त्या पुनर्जन्मवाल्या सिनेमाचं
फिलिंग आलं. तिथं मी माझ्या नवऱ्याला अतिउत्साहानं ही गोष्टही सांगितली. त्यानंही निमूट
ऐकून घेतली. त्या वेळी मी समाधान करून घेतलं मनाचं, कसं का होईना भगवतीचं देऊळ
पाहिल बुवा आपण! मनाचा एक कोपरा शांत झाला.
पण
मग परवा पुन्हा तारकर्लीला जाणं झालं. त्याआधी केलेल्या ब्राऊजिंगमध्ये सोशल
मिडीयाच्या आणि नबरोबाच्या कृपेनं धामापूरचं ते देऊळ, तिथलं ते तळं माझ्यापर्यंत
पोहोचलं. यावेळी तिथं जायचंच हा निश्चय झाला. आता ते देऊळ सिनेमाचं शूटिंग, अमुक
अभिनेते इथे आले होते यासाठी प्रसिद्धीस येतंय. पण मला ओढ लागली होती ती त्या
गोष्टीतल्या तळ्याची.
आम्ही
एकदाचे तिथे जाऊन ठेपलो. देवीची सुघड, सुबक मूर्ती पाहून तिच्यापुढे हात जोडले.
दगडी गाभाऱ्यातल्या अंधारात क्षणभरच चमकणारी ती मूर्ती जणू मला सांगत होती,“हो, मीच ती!” आता पाळी होती ‘तळ्याची’...जरा सावधगिरीचा पवित्रा घेतच मी उतरले देवळाच्या
मागच्या आवारात. समोर काय दिसेल, काय असेल, याची जरा भीतीच होती मनात. पण समोरचं
ते विस्तारलेलं, शांत लाटा अंगावर घेत पहुडलेलं तळं पाहिलं आणि सारे विचार थांबले,
शंका फिटल्या. मला त्या गोष्टीतलं ते तळं भेटलं. उरला तो फक्त त्या तळ्याभोवतीच्या
निरव शांततेचा आवाज. अवर्णनीय म्हणावा असा तो अनुभव. माझ्या मनाच्या कोपऱ्यातल्या
त्या तळ्याला हे तळं भेटलं होतं – एक चंद्रतळं!
माझ्या
या अनुभवाला परीसस्पर्श झाला तो माझ्याच लाडक्या शांताबाईंच्या कवितेचा. माझ्या
मनातलं तळंच जणू काही त्यांनी वाचलं होतं.
©तृप्ती कुलकर्णी
ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.
आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व
फॉलो करा.

.jpeg)