आम्ही ‘डी.आर.’च्या लेकी
परवा आईच्या बँकेच्या
कामासाठी एका काकांना फोन केला होता. पलीकडून हॅलो असा आवाज ऐकल्यावर मी काही
सेकंद शांत झाले. काय बोलावं सुचेना. मग धीर एकटवून म्हटलं मी डी.आरची मुलगी बोलतेय.
कैक वर्षांनी ही ओळख सांगितल्यावर मला रडूच यायचं बाकी होतं. माझे वडील स्टेट
बँकेत कामाला होते. त्यांचा मित्रपरिवार अफाट म्हणावा असा होता, नाही अजूनही आहे,
असंच म्हणेन मी. लहानपणी बँकेत गेल्यावर आमची ओळख करून दिली जायची किंवा आम्हीच
म्हणायचो आम्ही डी. आरच्या मुली आहोत.
आमच्या एकत्र
कम विभक्त कुटुंबात आम्ही एकूण दहा मुलं होतं. आठ मुली आणि दोन मुलं. सोलापूरच्या आयटीआय
बसस्टॉपच्या मागच्या राम मेडिकलमध्ये आम्ही आलटून-पालटून आज्जीची औषधं, छोटंमोठं
सामान आणायला जायचो, पैसे कमी पडले की
सांगायचो मी डी.आर. ची मुलगी आहे, ते देतील नंतर उरलेले पैसे आणून. या डी.आर.च्या
मुली प्रकरणाने वैतागून त्यांनी एकदा विचारलंच,“नेमक्या किती मुली आहेत हो डी.आर
ना?” त्यावर आमच्या
दादांचं ठरलेलं उत्तर होतं,“सगळ्या माझ्याच आहेत.”
त्यावेळी आपण
आपल्या वडिलांची मुलगी आहोत, हे सांगण्यात काही फार भारी आहे, असं वाटायचं नाही. आता
आम्ही सगळे जण मोठे झालो, बरेच शिकलो, आपापल्या क्षेत्रांमध्ये काम करतोय. नावांच्या
मधली जागा नवऱ्यांच्या नावाने घेतली. आमच्या नावाला आमच्या परिघांमध्ये ओळख आहे.
पण परवा मी डी.आर. ची मुलगी आहे, हे सांगताना जो आवंढा गिळला ना त्यातच त्या
स्वतंत्र ओळखीचा, आपल्या नावाचा जो काही असेल नसेल तो अहं गळून पडला. वाटलं मी यांची
मुलगी आहे यात जे मायेचा, अभिमानाचा, आपुलकीचा धागा आहे, तो बाकी कशातच नाही. आणि
महत्त्वाचं म्हणजे यात ज्यांना आम्ही सांगायचो ना की आम्ही डी.आर च्या मुली आहोत
त्या काका लोकांच्या मायेचा पण समावेश आहे. आपण कोणत्या वर्तुळात हे वाक्य वापरतो,
हे पण महत्त्वाचं असतं. तेव्हा बँक, दुकानं, दैनंदिन व्यवहाराची ठिकाणं ही फक्त
कामाची ठिकाणं नव्हती, तर त्यात कळत-नकळत जाणवणारी ऊब असायची. सगळ्यांना
सगळ्यांच्या मुलांची खबरबात असायची. हॉस्टेलवर गेल्यावर काही मुलामुलींच्या
नावापुढे फक्त कुमार-कुमारी असायचं. वडिलांचं नावच लावायची पद्धत नसते म्हणे
त्यांच्याकडे. तेव्हा मजा वाटली होती. पण तेव्हाही ते रुचलं नव्हतंच. आपण कितीही
स्वतंत्र विचारांचे झालो, अमुक-तमुकवादी झालो, तरी आपल्या वडिलांची आपल्यावरची छाप
कधीच मिटत नाही आणि ती कधी मिटू नये, असंच वाटत राहतं.
आता आमचे दादा -
सगळ्यांचे डी.आर. ऐहिक जगात नाहीत, पण त्यांच्या मायेचा ओलावा आम्हा सर्वांच्या
मनात सर्वांच्या मनात खोलवर रुजलेला आहे - अगदी सगळ्यात मोठ्या ताईपासून छोट्या
भावापर्यंत. खरंतर माझ्यासाठी हा खूप वैयक्तिक विषय आहे, नाही झेपत मला या विषयावर
लिहिणं-बोलणं. त्यांच्यावर पहिल्यांदाच काहीतरी लिहितेय. पण काल माझ्या सगळ्यात
मोठ्या ताईने महिला दिनानिमित्त आमच्या महिलाप्रधान कुटुंबावर एक छान लेख लिहिला
आणि सर्वांच्या आठवणींचा बांध फुटला. सगळ्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. फक्त दादाच
नाही, तर आमच्या कुटुंबातील प्रत्येक काका-काकू, बहिणी, भाऊ या सर्वांचा आम्हा
साऱ्यांना अभिमान आहे. आजही जेव्हा आमच्या बोलण्यात कधी ए.आर., सी.आर., डी.आर, एम.आर,
जे.आर., व्ही.आर. अशी या सहा भावांची नावं येतात तेव्हा आमची मुलं म्हणजे नक्की
कोणते ‘आबा’ हे ओळखतात. हाच पुरावा आहे
हा धागा तुटणार नाही याचा. या सगळ्या मोठ्यांच्या मायेचा, स्नेहाचा वारसा आम्ही
डी.आर.च्या लेकी कायम पुढे नेऊ याची मला खात्री आहे.
©तृप्ती कुलकर्णी
ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.
आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व
फॉलो करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा