‘सदाबहार’ स्मृतिगंध
मनोरंजन विश्वाच्या या जंजाळात कधीतरी अचानकच लॉटरी लागते.
अपेक्षित माणसांकडूनही अनपेक्षित सुखद धक्के मिळतात. परवा युट्यूबवर ‘सदाबहार’ नावाचा
चित्रपट पाहिला. यात आपल्याकडच्या ज्येष्ठ मंडळींची अवस्था, त्यांचे प्रश्न या
गोष्टी गजेंद्र अहिरेंनी कुशलपणे हाताळले आहेत आणि नितांतसुंदर चित्रपट बनवला आहे.
खरंतर आधी संथ, दुःखद काही तरी आहे, असं वाटलं; पण जया बच्चन,
राजेन्द्र गुप्ता आणि रजत कपूर अशी तगडी कास्टिंग पाहून सुरुवात केलीच मग थांबता
आलंच नाही.
ही आहे निनीची गोष्ट. सध्या आपल्या आसपास दिसतात ना अगदी तंतोतंत तशीच ही एक आजी.
मुलं परदेशी, नवरा पुढच्या प्रवासास निघून गेलेला, स्वतःची चाकोरी न सहजासहजी न
सोडणारी ही निनी. हिचा जीव अडकलाय आहे अनेक वर्षांपूर्वी वडिलांनी भेट दिलेल्या रेडिओमध्ये.
हिच्या घराचा दिवस उजाडतो तो या रेडिओच्या साथीनं आणि मावळतो तोही त्याच्याच
आवाजानं. घरी सोबत म्हणून काम करणाऱ्या मुलीलाही या निनीच्या स्वभावाचा पुरेपूर
अंदाज आला आहे. ती सगळं काही तिच्या कलानं घेते. निनीच्या मुलानं किल्लीवर
चालणाऱ्या घडाळ्याचं रूपातंर बॅटरीवर चालणाऱ्या घडाळ्यात केल्याचं गुपितही शक्य
होईतोवर लपवून ठेवते.
एक दिवस निनीचा हा लाडका रेडिओ बंद पडतो आणि तिच्या संथ,
एकसुरी आयुष्यात एकाएकी खंड पडतो. ती प्रचंड अस्वस्थ होते. कधीकाळी बारा-तेरा
वर्षांपूर्वी त्यांच्या नवऱ्यानं ज्यांच्याकडून रेडिओ दुरुस्त करून आणला होता त्या
माणसाचा नंबर माळ्यावरच्या बॅगेत लपलेल्या डायरीतून शोधून काढते. त्याला फोन करते.
इतकं सगळं होत असताना आपल्या मनात धाकधूक की आता तो माणूस, त्याचं दुकान यातलं
काहीतरी शिल्लक असेल का...पण फोन उचलला जातो. पलीकडचा माणूस अत्यंत तटस्थपणे
त्यांना रेडिओ दुकानात घेऊन यायला सांगतो. आपल्याला वाटतं,‘अरे बापरे, आता या कशा घेऊन जाणार ते रेडिओचं एवढं मोठं धूड?’
पण नाही...आपली ही खमकी निनी मुंबईच्या कुठल्यातरी उपनगरातल्या
गल्लीबोळातल्या त्या दुकानात जाऊन ठेपते. तिथे त्यांची गाठ पडते कस्तुरीमियाँशी.
एक अवलिया जो ना फुलटाईम इंजिनिअर आहे ना फुलटाईम शायर.
दोन्हीचं एक कमाल रसायन. त्यांना तो रेडिओ दुरुस्त केलेला आठवतोय, हे कळल्यावर
आपल्या आजींना जरा बरं वाटतं. विश्वास वाटतो की आता काहीतरी होऊ शकेल या बंद
पडलेल्या रेडिओचं. कस्तुरीमियाँचं जरा शायराना अंदाजातलं बोलणं, त्यांनी घेतलेल्या
फिरक्या या सर्वाचा निनीवर काहीही परिणाम होत नाही. दिवस मावळत आल्यावरही रेडिओचं
काही होत नाही, हे पाहून कस्तुरीमियांच्या रेडिओ दुकानातच ठेवण्याची विनंती
धुडकावत त्या रेडिओ घेऊन आपलं घर गाठतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी आख्खा रेडिओ उचलून
दुकानात नेतात.
कस्तुरीमियाँ रेडिओला कुठली मात्रा लागू पडेल, हे रोज
नव्यानं आजमावत असतात. या रेडिओदुरुस्तीच्या वाटेवर या दोघांनाही हळूहळू मैत्रीचं सुंदर
नातं गवसतं. कधी चहाच्या पेल्याबरोबर, कधी सामोसे-जिलेब्यांचा आस्वाद घेत आणि
कस्तुरीमियांच्या शायरीच्या साथीनं ते बहरंतही. समवयस्काशी मारलेल्या मनमोकळ्या,
दिलखुलास गप्पा कशी जादूची कांडी फिरवतात, हे दिग्दर्शकानं खुबीनं दाखवलं आहे. निनीच्या
व्यक्तिरेखेचा एका खमक्या हटवादी आजीपासून दिलखुलास दाद देणाऱ्या आजीपर्यंतचा
प्रवास आपल्याला सुखावून जातो. रेडिओ दुरुस्त होईपर्यंत कस्तुरीमियांच्या दुकानात
ठेवायला तयार होण्यापर्यंत ही मजल जाते.
“ईदच्या दिवशी
या. आमच्याबरोबर शीरखुर्मा खा आणि तुमचा रेडिओ घेऊन जा,” असं कस्तुरीमिया निनीला सांगतात.
दरम्यानच्या काळात छोटसं आजारपणं येऊन गेल्यावर ईदच्या दिवशी निनीला आठवतं की
आपल्याला रेडिओ आणायला जायचं आहे. ती थेट जाऊन थडकते दुकानात. पाहते तर काय दुकान
बंद. सैरभैर होऊन ती आसपास चौकशी करते, तेव्हा तिला कळतं की आजच ईदच्या दिवशी ते
स्वर्गवासी झाले. हे ऐकून सुन्न होऊन ती घरी परत येते. एक माणूस गेल्यावरही आपल्याला
मात्र रेडिओचीच काळजी होती, हे जाणवून तिला स्वतःचीच लाज वाटते.
पण थोड्या दिवसांनंतर तिला रेडिओचा विरह सहन होत नाही.
पुन्हा त्या दुकानात जाऊन ती कस्तुरीमियांच्या मुलाच्या दुकानाचा पत्ता शोधून काढते.
त्यांचा मुलगा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एका चकचकीत मोठ्या दुकानाचा मालक आहे, हे
कळल्यावर बसलेला आश्चर्याचा धक्का ती पचवते आणि माझा रेडिओ मला परत द्या, असं
सांगते. पण रिकाम्या केलेल्या दुकानात तिचा रेडिओ नाही, हे कळल्यावर त्रागा करते. कस्तुरीमियांचा
मुलगा मात्र तिला शांतपणे मी तुम्हाला तुमचा रेडिओ परत देईन असं आश्वासन देतो.
दुकानातल्या नोकरांनी जुन्या रेडिओतले भाग विकून टाकल्यामुळे नवे भाग बसवून तयार
केलेला रेडिओ निनी अवघ्या काही सेकंदात ओळखते आणि आपण चमकतो, हिचा रेडिओवर फक्त
जीव नाहीये, तर त्याच्या कणाकणाशी ही जोडलेली आहे, हे आपल्याला कळतं.
मग पुढे कस्तुरीमियांचा मुलगा चोरबाजारात फिरून स्वतः त्या
रेडिओचे भाग गोळा करतो. रात्रंदिवस खपून तो रेडिओ दुरुस्त करतो. ते करताना आपल्या
गेलेल्या वडिलांशी त्याची नव्याने भेट होते. वडिलांच्या प्रेमापायी ते जाईपर्यंत जुन्यापान्या
वस्तू पुन्हापुन्हा दुरुस्तीला पाठवत राहणारा आणि त्यांच्या कष्टाची शेवटची कमाई निनीकडून
घेताना भावूक होणारा हा मुलगा आपल्याला एकदम आवडूनच जातो.
चित्रपटातील शेवटचा प्रसंग - निनीचं झोपेतून उठणं,
नेहमीप्रमाणे रेडिओ लावणं, आवाज येत नाही म्हणून आवाज मोठा करणं आणि तिच्या
मोलकरणीनं येऊन ‘किती हा मोठा आवाज’ असं म्हणत आवाज लहान करणं. आजिबात वेगवान नसणाऱ्या
चित्रपटातली ही दृश्यांची साखळी आपली उत्कंठा शिगेला पोहोचवते. हिला आत्ता ऐकू
येईल की मग, या आशेने आपण पुढे पाहत राहतो. पण नाही...ज्या रेडिओच्या आवाजावर तिचा
आनंद, शांतता अवलंबून असते तो तिला परत कधीच ऐकू येणार नसतो, हे आपल्याला कळतं. आता
आपण रडणार एवढ्यात दारात एक माणूस कस्तुरीमियांनी तिच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी घेऊन
येतो. त्या चिठ्ठीचा आशय असा असतो –
मोहतरमा, मिट्टी कभी बासी नही होती।
उम्मीद की बारिशें ऐसा होने नही देती।
दुनिया तो बदलेगी जरूर, बदलते रेहना वक्त की फितरत है।
कल न ये रेडिओ होगा न इसका दुरुस्तगार मैं।
न सुननेवाले ये कान होगें।
मगर दिल पर जो आवाज शाया हो रखी है
वो कभी नही मिटेगी।
आपका रेडिओ बक्से में नही आपके दिल में साहिबा।
हम रहें ना रहे, मगर जिसे जी चुकें हम
वो मिश्री में घुले गीत रुहों में गुंजते रहेंगे हमेशा।
ही वाक्य ऐकून ना खेद ना खंत, ना आनंद काहीचं वाटलं नाही.
पोचली ती या शब्दांमागची नेमकी भावना. गेले कित्येक दिवस लेखासाठी एक संदर्भ शोधत
होते. ज्यात सूक्ष्म इंद्रिये म्हणजे काय वगैरची चर्चा करून आपल्या मनात घर करून
राहिलेल्या गोष्टींविषयी लिहायचा विचार करत होते. पण काही केल्या लिहिलं जात
नव्हतं माझ्याच्यानं. असं का होतंय हे कळत नव्हतं. पण मला जे सगळं सांगायचं होतं
ते वरच्या या कवितेत येऊन गेलं. लहानपणापासून म्हणजे आपल्याला जेव्हापासूनचं आठवतं
तेव्हापासून आपल्या स्मृतिपटलावर काही स्मृती कोरल्या गेलेल्या असतात. मग त्या
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध कशाच्याही असू शकतात. नेहमीच्या रस्त्यावरून जाताना
एखाद्या वेलीवरच्या फुलांचा विशिष्ट वास, एखादा विशिष्ट आवाज, स्पर्श, दृश्य यांची
आठवण. माझ्याकडे अशा खूप स्मृती आहेत. राघवेंद्र स्वामींच्या मठात दिलं जाणारं
कापूर घातलेलं तीर्थ, भल्या पहाटे पूजेसाठी तगरीची फुलं तोडणारे माझे आजोबा,
रामेश्वरमधल्या कुठल्याशा एका खानावळीत खाल्लेलं वेगळ्याचं चवीचं दही अशा अनेक गोष्टी
आहेत. आपण त्या अनुभवलेल्या असतात. तसं तर आपण खूप काही अनुभवतो. पण काही गोष्टी
मात्र आपली छाप सोडून जातात. तीच ती स्मृती – संस्कारमात्रजन्यज्ञानं स्मृतिः। अशी
स्मृतीची व्याख्या केली जाते. मग हे संस्कार नेमके होतात कोणावर हा शास्त्रार्थाचा
विषय आहे. पण आपल्याला आलेले अनुभव स्मृतिपटलावर स्थळ, काळ अशी बंधनं न जुमानता
राहतात. कधीकधी यात अप्रिय स्मृतीही असतील. पण आपल्याला प्रिय असलेल्या वस्तूंशी
संबंधित स्मृती या आपल्यात असतात, त्या वस्तूंमध्ये नाही. त्यामुळे काळाच्या ओघात
हातून निसटलेल्या गोष्टींविषयी खंत न बाळगता त्यांचा स्मृतिगंध बाळगावा आणि आनंदात
राहावं.
©तृप्ती कुलकर्णी
छायाचित्र –गुगलच्या
सौजन्याने
ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू
शकता.
आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व
फॉलो करा.
कवितेच्या ओळी सदाबहार चित्रपटातील आहेत.




