शनिवार, १५ मे, २०२१

छोट्यांच्या मोठ्ठ्या मोठ्ठ्या गोष्टी!

 

छोट्यांच्या मोठ्ठ्या मोठ्ठ्या गोष्टी!






काही कामानिमित्त मुलाच्या शाळेत गेले होते. तिथे शाळेच्या संचालिकांशी बोलणं सुरू होतं. बोलण्याच्या ओघात माझा मुलगा त्याच्या वयाच्या मुलांमध्ये कमी मिसळतो, याविषयी मी थोडी चिंता व्यक्त केली. तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या,“अहो त्याच्या वर्गातला सगळ्यात जास्त मॅच्युअर मुलगा आहे तो.” त्या पुढे म्हणाल्या,“रोज शाळा भरण्याआधी सकाळी मी शाळेच्या गेटपाशी उभी असते. येणारी सगळी मुलं माझ्याशी गप्पा मारून, मला टाळी देऊन किंवा मिठी मारून पुढे जातात. होय…टाळी देऊन!!! आपल्या काळात असलं काही नव्हतं. शिक्षकांशी, मुख्याध्यापकांशी फक्त हुशार मुलंच एकट्याने बोलायची. बाकी सगळी पोरं वर्गाव्यतिरिक्त कुठेही शिक्षक समोरून येताना दिसले की एकतर मागे फिरायची किंवा कसंतरी हसून मान डोलावून ‘सुटलो बुवा!’ म्हणत पळ काढायची. आताची मुलं खरचं लकी आहेत. त्यांना आपल्या शिक्षकांशी गप्पा मारता येतात. हे तुमचे विचार ऐकू येत आहेत मला. जाऊ दे ना. नशीब असतं एकेका पिढीचं!

तर त्यांनी मला सांगितलं की माझा मुलगा कधीच त्यांना मिठी मारत नाही. एकदोनदा पाहून त्यांनी याला कारण विचारलं. तर पठ्ठ्याने काय सांगितलं असेल…म्हणे तुम्हाला मिठी मारल्यावर मला माझ्या बहिणीची आठवण येते. ती माझी खूप लाडकी आहे. हे  ऐकून त्यांनी मुलाच्या वर्गशिक्षिकेला विचारलं,“हा एकटाच आहे ना की याची बहीण हॉस्टेलवर वगैरे राहते.”

 माझा मुलगा एकटाच असला, तरी तो त्याच्या कुठल्या ताईविषयी बोलत होता, हे मला कळलं. शाळेत घडलेल्या या संवादाविषयी मला काहीच माहीत नव्हतं. एवढसं खुट्ट झालं तरी मला लगेच येऊन सांगणारा माझ्या मुलानं मला ही एवढी मोऽऽठ्ठी गोष्ट सांगिली नव्हती. पण या प्रसंगावरून मला आठवण झाली प्रकाश संतांच्या ‘वनवास’ आणि ‘शारदा संगीत’ ची. लंपन नावाच्या छोट्याश्या मुलाचं भावविश्व आपल्यासमोर मांडणारी ही पुस्तकांची मालिका. कर्नाटकातल्या लाल मातीच्या गावातली कौलारू घरं, तिथलं कुंद वातावरण, पात्रांचे कानडी हेल असणारे संवाद, संतांची सोपी पण मनाला स्पर्शून जाणारी भाषाशैली या सगळ्या पुस्तकाच्या जमेच्या बाजू.

 आपल्या आई-वडिलांपासून दूर आजीआजोबांच्या गावी राहणारा हा लंपन. साधारण अकरा-बारा वर्षांचा, शाळेत जाणारा, आहे त्या गावात रमणारा. थोडासा घाबरट, थोडासा खोडकर, थोडासा धीट.  लहान असताना आपण कसे असतो ना अगदी तसा आणि म्हणूनच जवळचा वाटणारा. आजी-आजोबांच्या भांडणातला मधला कावळा बनणारा, सुमीच्या खोड्या काढणारा, आई-बाबांना पत्र लिहिणारा, वंटमुरीकर देसायांच्या बोक्याच्या खोड्या सांगणारा आणि बाबूरावच्या खोड्या काढणारा हा लंपू.  शाळेच्या शेवटच्या तासाला मास्तर जेव्हा ‘आई’ कविता शिकवत असतात तेव्हा पोटात खड्डा पडल्यासारखा वाटतोय, घसा दुखल्यासारखा वाटतोय पण रडताही येत नाहीये, असं म्हणणारा लंपू. ‘आई’ या विषयावरच्या एखाद्या उत्कृष्ट निबंधाला  लाजवेल, असं हे वर्णन आहे. सुट्टीत आपली आई येणार म्हटल्यावर आतुरतेने तिची वाट पाहणारा…पण आलीये ती आपली आई आहे, आपल्या लहान भावडांची आई आहे की आजी-आजोबांची माहेरी आलेली मुलगी आहे, हे आजिबातच न समजल्यामुळे वैतागलेला लंपू. शेवटी आईने मायेने जवळ घेतल्यावर तिच्या कुशीत शिरणारा हा लंपू. 

संतांचा हा लंपन १९६४ साली वनवास मधून वाचकांसमोर आला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्याच्या इतर कथाही आल्या. पौगंडावस्थेतील मुलांच्या मनोविश्वाचं निरागस, चपखल वर्णन आहे या कथांमध्ये. या कथा वाचताना मुलांना मजा येतेच, पण मोठ्यांनाही मूल होताना पाहिलं आहे मी. आपल्यातलं मूलपण जागवणाऱ्या कथा आहेत या! आपल्या हरवलेल्या भावविश्वात परत नेऊन सोडणाऱ्या कथा आहेत या. माझ्या दृष्टीने या कथा वाचणं, त्यांचा आनंद घेणं इथपर्यंतच महत्त्वाच्या नाहीत. आपण आपल्या पुढच्या पिढीची मानसिकता, त्यांचं भावविश्व समजून घेण्यासाठी ही पुस्तकं वाचायलाचं हवीत. मान्य आहे जमाना बदलला आहे. आताच्या पिढ्या फारच हुशार आहेत. पण आधारभूत भावना बदलल्या नाहीयेत, हे नक्की. आपल्या मुलांना समजून घेण्यासाठी, आपलं बालपण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी वनवास, शारदा संगीत, झुंबर आणि पंखा वाचाच.

लंपूशी माझी ओळख तशी उशिराच झाली. पण झाली तेव्हा फक्त ओळख नाही, तर पक्की दोस्ती झाली. दिवसातून ‘एकोणीस वेळा’ तरी मी त्याच्याविषयी बोलायचे. त्याचं कौतुक करायचे. सतराशे सत्याहत्तर लोकांना तरी मी या पुस्तकांविषयी सांगितलंय आणि त्यांनीसुद्धा पुढच्या सतराशे सत्याहत्तर जणांना आता तुम्हीही वाचा आणि सांगून टाका की पुढच्या सतराशे सत्त्याहत्तर जणांना म्हणते मी…

 © तृप्ती अ. कुलकर्णी

(छायाचित्र: अर्थात गुगलच्या सौजन्याने)

३ टिप्पण्या: