हो, मला ‘गटणे’ व्हायचंय!
“सद्गुरुवाचूनी
सापडेना सूर...धरावेत पाय...बेमट्या, शिंच्या ऽ ऽ सूर दे मेलास का ऽ ऽय?”
सकाळी उठल्यापासून डोक्यात घुमत होतं हेच, का कोणास ठाऊक? हे काय आहे, हे सुज्ञास सांगायची गरज नाहीच. तसं पाहायला गेलं तर, आठवड्यातले ‘नऊ’ दिवस काही ना
काही कारणाने तुमची आठवण येतेच. तुमच्यावर,
तुमच्यासाठी, तुमच्याविषयी अनेकांनी लिहिलं, वाचलं आणि बरंच काही केलंय. तुम्ही
लाडके असलात, तरी अंगी अजून तुमच्यावर लिहिण्याएवढी धिटाई नाही, असंच वाटत राहिलं
कायम. पण आता बास. तुमच्याच चालीवर “राजहंसाचे
चालणे जगी झालिया शहाणे, म्हणोन काय कवणे चालूच नये,” म्हणून सुरुवात करते.
आज मी काही तुमच्या लिखाणाविषयी, ते कसं उत्तम होतं वगैरे
विषयांवर लिहिणार नाहीये. माझा अधिकारही नाही तो. आपल्या आयुष्यात काही दैवयोगामुळे
निसटून गेलेले काही क्षण असतात. काही व्यक्ती आपल्या खूप लाडक्या असतात, आपण त्यांची
अक्षरशः पूजा बांधत असतो, पण त्या आपल्या आराध्यदैवताचं दर्शन आपल्याला कधीच घडत
नाही. तुम्ही साहित्यातलं आराध्यदैवत आहात माझं. आता वाचणारे म्हणतील यात काय नवीन,
अनेकांचं दैवत आहेत ते! तू कोण मोठी लागून गेलीस
आणि हो बरोबरच आहे ते.
पण माझ्या या आराध्यदैवताचं मला आयुष्यात एकदाही दर्शन झालं
नाही, याचा सल माझ्या मनात कायम राहिल. पुण्यात शिकायला येणार होते तेव्हा वाटलं
पु.ल. राहतात पुण्यात, कधीतरी का होईना दिसतीलच की आपल्याला. पण सगळ्या भाबड्या
कल्पना होत्या. मी पुण्यात येण्याआधीच तुम्ही निघून गेलात अनंताच्या प्रवासाला.
तुमच्या जाण्यानं खूप त्रास झाला. पुढे पुण्यात आल्यावर मालतीमाधवच्या समोर जाऊन
नुसतीच उभी राहायचे. काही सुधरेनासं झालं की निमूट परतायचे तिथून. आजही तिथून
जाताना पावलं आपसूक थांबतात. मनात हात जोडले जातात. पुढे छोट्याश्या आजारपणासाठी
प्रयाग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, तेव्हाही मनात तुम्हीच होता. वेडेपणा नुसता!
आजकाल या समाजमाध्यमांवरच्या मुलाखतींमध्ये, पॉडकास्टमध्ये बरेच
जण तुमच्या आठवणी सांगतात. हे लोक तुमच्या सान्निध्यात राहिले आहेत, त्यांनी
तुम्हाला पाहिलं आहे, हे ऐकल्यावर मत्सर वाटतो मला त्यांचा. मग उपाय म्हणून मुलाला
तुमची ओळख करून दिलीये. आधी अगम्य वाटणारी तुमची भाषा आता उमजू लागलीये त्याला. कुठूनही
तुमचा आवाज ओळखतो तो, उत्सुकतेने ऐकायला येतो, संवाद लक्षात ठेवतो. यामुळे थोड्या
वेळापुरतं का होईना बरं वाटतं. पण सल काही जात नाही मनातला.
मलाही आवडेल तुमच्या संगतीत राहायला. बोलला नाहीत माझ्याशी
तरी चालेल, फक्त पाहायचं आहे तुम्हाला. आपल्या आवडत्या देवाच्या नुसत्या दर्शनानं
मन भरून येतं ना तसंच. कुणी म्हणेल त्यांचं साहित्य, आवाज आहेच की आपल्याजवळ,
अजरामर आहेत ते! पण नाही, मला तुम्हालाच पाहायचं आहे. तुमच्याजवळ
काही क्षण का होईना थांबायचं आहे. तुमच्या लिखाणामधल्या शेवटच्या ओळी वाचून
डोळ्यांच्या कडा कायम पाणावतात. त्या पाणावल्या डोळ्यांनी पाहायचं आहे तुम्हाला.
‘अतिपुस्तकी’ बोलणाऱ्याला आमच्या आमच्यात आम्ही पूर्वी ‘गटणे’ म्हणत असू. पण
आता असं वाटतं की किती भाग्यवान असेल तो गटणे ज्याला तुम्ही पुस्तकं दिलीत, ज्याच्याशी
तुम्ही कंटाळून का होईना बोललात, ज्याच्या तुम्ही घरी गेलात, त्याची काळजी केलीत. किती नशीबवान होता
तो! कसा का असेना पण ज्याला तुमचा समृद्ध करणारा
सहवास लाभला तो ‘गटणे’ व्हायचंय मला.
©तृप्ती कुलकर्णी
ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.
आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व
फॉलो करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा