गुरुवार, २६ मार्च, २०२६

 

हो, मला गटणे व्हायचंय!

सद्गुरुवाचूनी सापडेना सूर...धरावेत पाय...बेमट्या, शिंच्या ऽ ऽ सूर दे मेलास का ऽ ऽ?

सकाळी उठल्यापासून डोक्यात घुमत होतं हेच, का कोणास ठाऊक? हे काय आहे, हे सुज्ञास सांगायची गरज नाहीच. तसं पाहायला गेलं तर, आठवड्यातले नऊ दिवस काही ना काही कारणाने तुमची आठवण येतेच.  तुमच्यावर, तुमच्यासाठी, तुमच्याविषयी अनेकांनी लिहिलं, वाचलं आणि बरंच काही केलंय. तुम्ही लाडके असलात, तरी अंगी अजून तुमच्यावर लिहिण्याएवढी धिटाई नाही, असंच वाटत राहिलं कायम. पण आता बास. तुमच्याच चालीवर राजहंसाचे चालणे जगी झालिया शहाणे, म्हणोन काय कवणे चालूच नये, म्हणून सुरुवात करते.

आज मी काही तुमच्या लिखाणाविषयी, ते कसं उत्तम होतं वगैरे विषयांवर लिहिणार नाहीये. माझा अधिकारही नाही तो. आपल्या आयुष्यात काही दैवयोगामुळे निसटून गेलेले काही क्षण असतात. काही व्यक्ती आपल्या खूप लाडक्या असतात, आपण त्यांची अक्षरशः पूजा बांधत असतो, पण त्या आपल्या आराध्यदैवताचं दर्शन आपल्याला कधीच घडत नाही. तुम्ही साहित्यातलं आराध्यदैवत आहात माझं. आता वाचणारे म्हणतील यात काय नवीन, अनेकांचं दैवत आहेत ते! तू कोण मोठी लागून गेलीस आणि हो बरोबरच आहे ते.

पण माझ्या या आराध्यदैवताचं मला आयुष्यात एकदाही दर्शन झालं नाही, याचा सल माझ्या मनात कायम राहिल. पुण्यात शिकायला येणार होते तेव्हा वाटलं पु.ल. राहतात पुण्यात, कधीतरी का होईना दिसतीलच की आपल्याला. पण सगळ्या भाबड्या कल्पना होत्या. मी पुण्यात येण्याआधीच तुम्ही निघून गेलात अनंताच्या प्रवासाला. तुमच्या जाण्यानं खूप त्रास झाला. पुढे पुण्यात आल्यावर मालतीमाधवच्या समोर जाऊन नुसतीच उभी राहायचे. काही सुधरेनासं झालं की निमूट परतायचे तिथून. आजही तिथून जाताना पावलं आपसूक थांबतात. मनात हात जोडले जातात. पुढे छोट्याश्या आजारपणासाठी प्रयाग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, तेव्हाही मनात तुम्हीच होता. वेडेपणा नुसता!

आजकाल या समाजमाध्यमांवरच्या मुलाखतींमध्ये, पॉडकास्टमध्ये बरेच जण तुमच्या आठवणी सांगतात. हे लोक तुमच्या सान्निध्यात राहिले आहेत, त्यांनी तुम्हाला पाहिलं आहे, हे ऐकल्यावर मत्सर वाटतो मला त्यांचा. मग उपाय म्हणून मुलाला तुमची ओळख करून दिलीये. आधी अगम्य वाटणारी तुमची भाषा आता उमजू लागलीये त्याला. कुठूनही तुमचा आवाज ओळखतो तो, उत्सुकतेने ऐकायला येतो, संवाद लक्षात ठेवतो. यामुळे थोड्या वेळापुरतं का होईना बरं वाटतं. पण सल काही जात नाही मनातला.

मलाही आवडेल तुमच्या संगतीत राहायला. बोलला नाहीत माझ्याशी तरी चालेल, फक्त पाहायचं आहे तुम्हाला. आपल्या आवडत्या देवाच्या नुसत्या दर्शनानं मन भरून येतं ना तसंच. कुणी म्हणेल त्यांचं साहित्य, आवाज आहेच की आपल्याजवळ, अजरामर आहेत ते! पण नाही, मला तुम्हालाच पाहायचं आहे. तुमच्याजवळ काही क्षण का होईना थांबायचं आहे. तुमच्या लिखाणामधल्या शेवटच्या ओळी वाचून डोळ्यांच्या कडा कायम पाणावतात. त्या पाणावल्या डोळ्यांनी पाहायचं आहे तुम्हाला.

अतिपुस्तकी बोलणाऱ्याला आमच्या आमच्यात आम्ही पूर्वी गटणे म्हणत असू. पण आता असं वाटतं की किती भाग्यवान असेल तो गटणे ज्याला तुम्ही पुस्तकं दिलीत, ज्याच्याशी तुम्ही कंटाळून का होईना बोललात, ज्याच्या तुम्ही घरी गेलात, त्याची काळजी केलीत.  किती नशीबवान होता तो! कसा का असेना पण ज्याला तुमचा समृद्ध करणारा सहवास लाभला तो गटणे व्हायचंय मला.

©तृप्ती कुलकर्णी

 ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

 

सोमवार, ९ मार्च, २०२६

 

आम्ही डी.आर.च्या लेकी

परवा आईच्या बँकेच्या कामासाठी एका काकांना फोन केला होता. पलीकडून हॅलो असा आवाज ऐकल्यावर मी काही सेकंद शांत झाले. काय बोलावं सुचेना. मग धीर एकटवून म्हटलं मी डी.आरची मुलगी बोलतेय. कैक वर्षांनी ही ओळख सांगितल्यावर मला रडूच यायचं बाकी होतं. माझे वडील स्टेट बँकेत कामाला होते. त्यांचा मित्रपरिवार अफाट म्हणावा असा होता, नाही अजूनही आहे, असंच म्हणेन मी. लहानपणी बँकेत गेल्यावर आमची ओळख करून दिली जायची किंवा आम्हीच म्हणायचो आम्ही डी. आरच्या मुली आहोत.

आमच्या एकत्र कम विभक्त कुटुंबात आम्ही एकूण दहा मुलं होतं. आठ मुली आणि दोन मुलं. सोलापूरच्या आयटीआय बसस्टॉपच्या मागच्या राम मेडिकलमध्ये आम्ही आलटून-पालटून आज्जीची औषधं, छोटंमोठं सामान  आणायला जायचो, पैसे कमी पडले की सांगायचो मी डी.आर. ची मुलगी आहे, ते देतील नंतर उरलेले पैसे आणून. या डी.आर.च्या मुली प्रकरणाने वैतागून त्यांनी एकदा विचारलंच,नेमक्या किती मुली आहेत हो डी.आर ना?  त्यावर आमच्या दादांचं ठरलेलं उत्तर होतं,सगळ्या माझ्याच आहेत.

त्यावेळी आपण आपल्या वडिलांची मुलगी आहोत, हे सांगण्यात काही फार भारी आहे, असं वाटायचं नाही. आता आम्ही सगळे जण मोठे झालो, बरेच शिकलो, आपापल्या क्षेत्रांमध्ये काम करतोय. नावांच्या मधली जागा नवऱ्यांच्या नावाने घेतली. आमच्या नावाला आमच्या परिघांमध्ये ओळख आहे. पण परवा मी डी.आर. ची मुलगी आहे, हे सांगताना जो आवंढा गिळला ना त्यातच त्या स्वतंत्र ओळखीचा, आपल्या नावाचा जो काही असेल नसेल तो अहं गळून पडला. वाटलं मी यांची मुलगी आहे यात जे मायेचा, अभिमानाचा, आपुलकीचा धागा आहे, तो बाकी कशातच नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे यात ज्यांना आम्ही सांगायचो ना की आम्ही डी.आर च्या मुली आहोत त्या काका लोकांच्या मायेचा पण समावेश आहे. आपण कोणत्या वर्तुळात हे वाक्य वापरतो, हे पण महत्त्वाचं असतं. तेव्हा बँक, दुकानं, दैनंदिन व्यवहाराची ठिकाणं ही फक्त कामाची ठिकाणं नव्हती, तर त्यात कळत-नकळत जाणवणारी ऊब असायची. सगळ्यांना सगळ्यांच्या मुलांची खबरबात असायची. हॉस्टेलवर गेल्यावर काही मुलामुलींच्या नावापुढे फक्त कुमार-कुमारी असायचं. वडिलांचं नावच लावायची पद्धत नसते म्हणे त्यांच्याकडे. तेव्हा मजा वाटली होती. पण तेव्हाही ते रुचलं नव्हतंच. आपण कितीही स्वतंत्र विचारांचे झालो, अमुक-तमुकवादी झालो, तरी आपल्या वडिलांची आपल्यावरची छाप कधीच मिटत नाही आणि ती कधी मिटू नये, असंच वाटत राहतं.

आता आमचे दादा - सगळ्यांचे डी.आर. ऐहिक जगात नाहीत, पण त्यांच्या मायेचा ओलावा आम्हा सर्वांच्या मनात सर्वांच्या मनात खोलवर रुजलेला आहे - अगदी सगळ्यात मोठ्या ताईपासून छोट्या भावापर्यंत. खरंतर माझ्यासाठी हा खूप वैयक्तिक विषय आहे, नाही झेपत मला या विषयावर लिहिणं-बोलणं. त्यांच्यावर पहिल्यांदाच काहीतरी लिहितेय. पण काल माझ्या सगळ्यात मोठ्या ताईने महिला दिनानिमित्त आमच्या महिलाप्रधान कुटुंबावर एक छान लेख लिहिला आणि सर्वांच्या आठवणींचा बांध फुटला. सगळ्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. फक्त दादाच नाही, तर आमच्या कुटुंबातील प्रत्येक काका-काकू, बहिणी, भाऊ या सर्वांचा आम्हा साऱ्यांना अभिमान आहे. आजही जेव्हा आमच्या बोलण्यात कधी ए.आर., सी.आर., डी.आर, एम.आर, जे.आर., व्ही.आर. अशी या सहा भावांची नावं येतात तेव्हा आमची मुलं म्हणजे नक्की कोणते आबा हे ओळखतात. हाच पुरावा आहे हा धागा तुटणार नाही याचा. या सगळ्या मोठ्यांच्या मायेचा, स्नेहाचा वारसा आम्ही डी.आर.च्या लेकी कायम पुढे नेऊ याची मला खात्री आहे.


©तृप्ती कुलकर्णी

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.



शनिवार, ७ मार्च, २०२६

 

एका चंद्रतळ्याची गोष्ट!



कोकणातलं एक छोटसं गाव. त्या गावातल्या देवीचं प्राचीन मंदिर. ही देवीच या गावाची रक्षणकर्ती आहे, यावर गावकऱ्यांची नितांत श्रद्धा. त्यांच्या या श्रद्धेचं फळही देवी तितक्याच मायेनं, आपुलकीनं देत असे. गावात कोणाकडे लग्नकार्य निघालं आणि त्या कुटंबाची दागिने करण्याची ऐपत नसेल, तर गावकरी रात्री एका परडीत फुलांचे दागिने ठेवत असत आणि देवळालगतच्या तलावात सोडत. दुसऱ्या दिवशी त्या परडीत मिळत सोन्याचे दागिने. देवीच्या आपल्या भक्तांवरच्या मायेचीच प्रचिती होती ही. हे दागिने मिळवण्यासाठी अट फक्त एकच कार्य संपन्न झाल्यावर हे दागिने पुन्हा तळ्याच्या पाण्यात सोडायचे. देवी आणि तिच्या भक्तांमधला हा आपुलकीचा, मायेचा करार वर्षानुवर्ष सुरू होता. पण कोणा एका दुष्टाच्या मनात मोहाचा राक्षस शिरला. त्यानं दागिने परत तळ्यात सोडलेच नाहीत. तेव्हापासून देवी रुसली, कोपली ती कायमचीच आणि तो करार संपला.

ही गोष्ट आहे धामापूरच्या भगवतीच्या देवीची आणि देवळाला लागून असलेल्या तळ्याची. इयत्ता अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात आम्हाला मारुती चितमपल्लींचा एक धडा होता. त्या धड्यातच या दंतकथेचा उल्लेख आला होता. तेव्हापासून ही कथा मनाच्या कोपऱ्यात घर करून बसली होती. कायम वाटायचं कुठे असेल हे गाव, तिथलं ते देऊळ, तो तलाव. पंधरा एक वर्षांमागे तारकर्लीला गेले तेव्हा तिथे रिक्षानं फिरताना रिक्षावाल्यानं एक भगवतीचं देऊळ दाखवलं आणि माझ्या तोंडून लगेच प्रश्न निघाला,मग इथे तळं असेल ना मागच्या बाजूला? त्या माणसानं माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं आणि तितक्याच विचित्र सुरात नाही म्हणाला. मला अगदी त्या पुनर्जन्मवाल्या सिनेमाचं फिलिंग आलं. तिथं मी माझ्या नवऱ्याला अतिउत्साहानं ही गोष्टही सांगितली. त्यानंही निमूट ऐकून घेतली. त्या वेळी मी समाधान करून घेतलं मनाचं, कसं का होईना भगवतीचं देऊळ पाहिल बुवा आपण! मनाचा एक कोपरा शांत झाला.

पण मग परवा पुन्हा तारकर्लीला जाणं झालं. त्याआधी केलेल्या ब्राऊजिंगमध्ये सोशल मिडीयाच्या आणि नबरोबाच्या कृपेनं धामापूरचं ते देऊळ, तिथलं ते तळं माझ्यापर्यंत पोहोचलं. यावेळी तिथं जायचंच हा निश्चय झाला. आता ते देऊळ सिनेमाचं शूटिंग, अमुक अभिनेते इथे आले होते यासाठी प्रसिद्धीस येतंय. पण मला ओढ लागली होती ती त्या गोष्टीतल्या तळ्याची.

आम्ही एकदाचे तिथे जाऊन ठेपलो. देवीची सुघड, सुबक मूर्ती पाहून तिच्यापुढे हात जोडले. दगडी गाभाऱ्यातल्या अंधारात क्षणभरच चमकणारी ती मूर्ती जणू मला सांगत होती,हो, मीच ती!  आता पाळी होती तळ्याची...जरा सावधगिरीचा पवित्रा घेतच मी उतरले देवळाच्या मागच्या आवारात. समोर काय दिसेल, काय असेल, याची जरा भीतीच होती मनात. पण समोरचं ते विस्तारलेलं, शांत लाटा अंगावर घेत पहुडलेलं तळं पाहिलं आणि सारे विचार थांबले, शंका फिटल्या. मला त्या गोष्टीतलं ते तळं भेटलं. उरला तो फक्त त्या तळ्याभोवतीच्या निरव शांततेचा आवाज. अवर्णनीय म्हणावा असा तो अनुभव. माझ्या मनाच्या कोपऱ्यातल्या त्या तळ्याला हे तळं भेटलं होतं – एक चंद्रतळ!

नंतर चंद्र पाहिला...
तेंव्हा मी होते रानातले एक तृप्त तळे,
हृदयात फुलली होती शतदल शुभ्र कमळे!
चंद्र अलगद उतरून खाली आला,
आपखुशीने कमळाकमळांत बंदिस्त झाला!

माझ्या या अनुभवाला परीसस्पर्श झाला तो माझ्याच लाडक्या शांताबाईंच्या कवितेचा. माझ्या मनातलं तळंच जणू काही त्यांनी वाचलं होतं.

 

©तृप्ती कुलकर्णी

 ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

 

 


शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

 




सदाबहार स्मृतिगंध

मनोरंजन विश्वाच्या या जंजाळात कधीतरी अचानकच लॉटरी लागते. अपेक्षित माणसांकडूनही अनपेक्षित सुखद धक्के मिळतात. परवा युट्यूबवर सदाबहार नावाचा चित्रपट पाहिला. यात आपल्याकडच्या ज्येष्ठ मंडळींची अवस्था, त्यांचे प्रश्न या गोष्टी गजेंद्र अहिरेंनी कुशलपणे हाताळले आहेत आणि नितांतसुंदर चित्रपट बनवला आहे. खरंतर आधी संथ, दुःखद काही तरी आहे, असं वाटलं; पण जया बच्चन, राजेन्द्र गुप्ता आणि रजत कपूर अशी तगडी कास्टिंग पाहून सुरुवात केलीच मग थांबता आलंच नाही.

ही आहे निनीची गोष्ट. सध्या आपल्या आसपास दिसतात ना अगदी तंतोतंत तशीच ही एक आजी. मुलं परदेशी, नवरा पुढच्या प्रवासास निघून गेलेला, स्वतःची चाकोरी न सहजासहजी न सोडणारी ही निनी. हिचा जीव अडकलाय आहे अनेक वर्षांपूर्वी वडिलांनी भेट दिलेल्या रेडिओमध्ये. हिच्या घराचा दिवस उजाडतो तो या रेडिओच्या साथीनं आणि मावळतो तोही त्याच्याच आवाजानं. घरी सोबत म्हणून काम करणाऱ्या मुलीलाही या निनीच्या स्वभावाचा पुरेपूर अंदाज आला आहे. ती सगळं काही तिच्या कलानं घेते. निनीच्या मुलानं किल्लीवर चालणाऱ्या घडाळ्याचं रूपातंर बॅटरीवर चालणाऱ्या घडाळ्यात केल्याचं गुपितही शक्य होईतोवर लपवून ठेवते.

एक दिवस निनीचा हा लाडका रेडिओ बंद पडतो आणि तिच्या संथ, एकसुरी आयुष्यात एकाएकी खंड पडतो. ती प्रचंड अस्वस्थ होते. कधीकाळी बारा-तेरा वर्षांपूर्वी त्यांच्या नवऱ्यानं ज्यांच्याकडून रेडिओ दुरुस्त करून आणला होता त्या माणसाचा नंबर माळ्यावरच्या बॅगेत लपलेल्या डायरीतून शोधून काढते. त्याला फोन करते. इतकं सगळं होत असताना आपल्या मनात धाकधूक की आता तो माणूस, त्याचं दुकान यातलं काहीतरी शिल्लक असेल का...पण फोन उचलला जातो. पलीकडचा माणूस अत्यंत तटस्थपणे त्यांना रेडिओ दुकानात घेऊन यायला सांगतो. आपल्याला वाटतं,अरे बापरे, आता या कशा घेऊन जाणार ते रेडिओचं एवढं मोठं धूड?

पण नाही...आपली ही खमकी निनी मुंबईच्या कुठल्यातरी उपनगरातल्या गल्लीबोळातल्या त्या दुकानात जाऊन ठेपते. तिथे त्यांची गाठ पडते कस्तुरीमियाँशी. एक अवलिया जो ना फुलटाईम इंजिनिअर आहे ना फुलटाईम शायर. दोन्हीचं एक कमाल रसायन. त्यांना तो रेडिओ दुरुस्त केलेला आठवतोय, हे कळल्यावर आपल्या आजींना जरा बरं वाटतं. विश्वास वाटतो की आता काहीतरी होऊ शकेल या बंद पडलेल्या रेडिओचं. कस्तुरीमियाँचं जरा शायराना अंदाजातलं बोलणं, त्यांनी घेतलेल्या फिरक्या या सर्वाचा निनीवर काहीही परिणाम होत नाही. दिवस मावळत आल्यावरही रेडिओचं काही होत नाही, हे पाहून कस्तुरीमियांच्या रेडिओ दुकानातच ठेवण्याची विनंती धुडकावत त्या रेडिओ घेऊन आपलं घर गाठतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी आख्खा रेडिओ उचलून दुकानात नेतात.

कस्तुरीमियाँ रेडिओला कुठली मात्रा लागू पडेल, हे रोज नव्यानं आजमावत असतात. या रेडिओदुरुस्तीच्या वाटेवर या दोघांनाही हळूहळू मैत्रीचं सुंदर नातं गवसतं. कधी चहाच्या पेल्याबरोबर, कधी सामोसे-जिलेब्यांचा आस्वाद घेत आणि कस्तुरीमियांच्या शायरीच्या साथीनं ते बहरंतही. समवयस्काशी मारलेल्या मनमोकळ्या, दिलखुलास गप्पा कशी जादूची कांडी फिरवतात, हे दिग्दर्शकानं खुबीनं दाखवलं आहे. निनीच्या व्यक्तिरेखेचा एका खमक्या हटवादी आजीपासून दिलखुलास दाद देणाऱ्या आजीपर्यंतचा प्रवास आपल्याला सुखावून जातो. रेडिओ दुरुस्त होईपर्यंत कस्तुरीमियांच्या दुकानात ठेवायला तयार होण्यापर्यंत ही मजल जाते.

ईदच्या दिवशी या. आमच्याबरोबर शीरखुर्मा खा आणि तुमचा रेडिओ घेऊन जा, असं कस्तुरीमिया निनीला सांगतात. दरम्यानच्या काळात छोटसं आजारपणं येऊन गेल्यावर ईदच्या दिवशी निनीला आठवतं की आपल्याला रेडिओ आणायला जायचं आहे. ती थेट जाऊन थडकते दुकानात. पाहते तर काय दुकान बंद. सैरभैर होऊन ती आसपास चौकशी करते, तेव्हा तिला कळतं की आजच ईदच्या दिवशी ते स्वर्गवासी झाले. हे ऐकून सुन्न होऊन ती घरी परत येते. एक माणूस गेल्यावरही आपल्याला मात्र रेडिओचीच काळजी होती, हे जाणवून तिला स्वतःचीच लाज वाटते.

पण थोड्या दिवसांनंतर तिला रेडिओचा विरह सहन होत नाही. पुन्हा त्या दुकानात जाऊन ती कस्तुरीमियांच्या मुलाच्या दुकानाचा पत्ता शोधून काढते. त्यांचा मुलगा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एका चकचकीत मोठ्या दुकानाचा मालक आहे, हे कळल्यावर बसलेला आश्चर्याचा धक्का ती पचवते आणि माझा रेडिओ मला परत द्या, असं सांगते. पण रिकाम्या केलेल्या दुकानात तिचा रेडिओ नाही, हे कळल्यावर त्रागा करते. कस्तुरीमियांचा मुलगा मात्र तिला शांतपणे मी तुम्हाला तुमचा रेडिओ परत देईन असं आश्वासन देतो. दुकानातल्या नोकरांनी जुन्या रेडिओतले भाग विकून टाकल्यामुळे नवे भाग बसवून तयार केलेला रेडिओ निनी अवघ्या काही सेकंदात ओळखते आणि आपण चमकतो, हिचा रेडिओवर फक्त जीव नाहीये, तर त्याच्या कणाकणाशी ही जोडलेली आहे, हे आपल्याला कळतं.

मग पुढे कस्तुरीमियांचा मुलगा चोरबाजारात फिरून स्वतः त्या रेडिओचे भाग गोळा करतो. रात्रंदिवस खपून तो रेडिओ दुरुस्त करतो. ते करताना आपल्या गेलेल्या वडिलांशी त्याची नव्याने भेट होते. वडिलांच्या प्रेमापायी ते जाईपर्यंत जुन्यापान्या वस्तू पुन्हापुन्हा दुरुस्तीला पाठवत राहणारा आणि त्यांच्या कष्टाची शेवटची कमाई निनीकडून घेताना भावूक होणारा हा मुलगा आपल्याला एकदम आवडूनच जातो.

चित्रपटातील शेवटचा प्रसंग - निनीचं झोपेतून उठणं, नेहमीप्रमाणे रेडिओ लावणं, आवाज येत नाही म्हणून आवाज मोठा करणं आणि तिच्या मोलकरणीनं येऊन किती हा मोठा आवाज असं म्हणत आवाज लहान करणं. आजिबात वेगवान नसणाऱ्या चित्रपटातली ही दृश्यांची साखळी आपली उत्कंठा शिगेला पोहोचवते. हिला आत्ता ऐकू येईल की मग, या आशेने आपण पुढे पाहत राहतो. पण नाही...ज्या रेडिओच्या आवाजावर तिचा आनंद, शांतता अवलंबून असते तो तिला परत कधीच ऐकू येणार नसतो, हे आपल्याला कळतं. आता आपण रडणार एवढ्यात दारात एक माणूस कस्तुरीमियांनी तिच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी घेऊन येतो. त्या चिठ्ठीचा आशय असा असतो –

मोहतरमा, मिट्टी कभी बासी नही होती।

उम्मीद की बारिशें ऐसा होने नही देती।

दुनिया तो बदलेगी जरूर, बदलते रेहना वक्त की फितरत है।

कल न ये रेडिओ होगा न इसका दुरुस्तगार मैं।

न सुननेवाले ये कान होगें।

मगर दिल पर जो आवाज शाया हो रखी है

वो कभी नही मिटेगी।

आपका रेडिओ बक्से में नही आपके दिल में साहिबा।

हम रहें ना रहे, मगर जिसे जी चुकें हम

वो मिश्री में घुले गीत रुहों में गुंजते रहेंगे हमेशा।

ही वाक्य ऐकून ना खेद ना खंत, ना आनंद काहीचं वाटलं नाही. पोचली ती या शब्दांमागची नेमकी भावना. गेले कित्येक दिवस लेखासाठी एक संदर्भ शोधत होते. ज्यात सूक्ष्म इंद्रिये म्हणजे काय वगैरची चर्चा करून आपल्या मनात घर करून राहिलेल्या गोष्टींविषयी लिहायचा विचार करत होते. पण काही केल्या लिहिलं जात नव्हतं माझ्याच्यानं. असं का होतंय हे कळत नव्हतं. पण मला जे सगळं सांगायचं होतं ते वरच्या या कवितेत येऊन गेलं. लहानपणापासून म्हणजे आपल्याला जेव्हापासूनचं आठवतं तेव्हापासून आपल्या स्मृतिपटलावर काही स्मृती कोरल्या गेलेल्या असतात. मग त्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध कशाच्याही असू शकतात. नेहमीच्या रस्त्यावरून जाताना एखाद्या वेलीवरच्या फुलांचा विशिष्ट वास, एखादा विशिष्ट आवाज, स्पर्श, दृश्य यांची आठवण. माझ्याकडे अशा खूप स्मृती आहेत. राघवेंद्र स्वामींच्या मठात दिलं जाणारं कापूर घातलेलं तीर्थ, भल्या पहाटे पूजेसाठी तगरीची फुलं तोडणारे माझे आजोबा, रामेश्वरमधल्या कुठल्याशा एका खानावळीत खाल्लेलं वेगळ्याचं चवीचं दही अशा अनेक गोष्टी आहेत. आपण त्या अनुभवलेल्या असतात. तसं तर आपण खूप काही अनुभवतो. पण काही गोष्टी मात्र आपली छाप सोडून जातात. तीच ती स्मृती – संस्कारमात्रजन्यज्ञानं स्मृतिः। अशी स्मृतीची व्याख्या केली जाते. मग हे संस्कार नेमके होतात कोणावर हा शास्त्रार्थाचा विषय आहे. पण आपल्याला आलेले अनुभव स्मृतिपटलावर स्थळ, काळ अशी बंधनं न जुमानता राहतात. कधीकधी यात अप्रिय स्मृतीही असतील. पण आपल्याला प्रिय असलेल्या वस्तूंशी संबंधित स्मृती या आपल्यात असतात, त्या वस्तूंमध्ये नाही. त्यामुळे काळाच्या ओघात हातून निसटलेल्या गोष्टींविषयी खंत न बाळगता त्यांचा स्मृतिगंध बाळगावा आणि आनंदात राहावं.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र –गुगलच्या सौजन्याने

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

कवितेच्या ओळी सदाबहार चित्रपटातील आहेत.

 

 

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

 न पाहिलेलं स्वप्न!


भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक मिळवला. महिला क्रिकेटचं अनेक दशकांपासूनचं अपुरं स्वप्न पूर्ण केलं. आता या विजयामुळे महिला क्रिकेटची व्यावसायिक गणितं बदलतील, महिला क्रिकेटला नवी दिशा मिळेल. आपल्या संघातल्या सर्वच खेळाडूंची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशीच आहे.
आता तुम्ही म्हणाल सगळं जग हेच सांगतंय. यात तुम्ही काय भर घालताय, नवीन काय सांगताय...तेच तेच काय वाचायचं सारखं. पण हे सामने सुरू झाल्यापासून आत खोलवर काहीतरी घडत होतं, कळत होतं पण वळत नव्हतं. याआधी महिला संघ विश्वचषक खेळला नाही, अटीतटीचे सामने खेळला नाही, असंही काही नव्हतं. पण यावेळेस बातच काही और होती. इतकी वर्ष उपेक्षा सोसलेल्या या संघावर अचानक संपूर्ण देशाच्या अपेक्षांचं ओझं लादलं गेलं आणि या पोरींनीही त्या अपेक्षा पुऱ्या केल्या, प्रतिस्पर्धींना पुरून उरल्या. मैदानांवर अत्यंत संयतपणे, डाव आखून खेळणाऱ्या या मुलींनी सामना जिंकल्यावर तितक्याच खुल्या दिलानं रडून विजयही साजरा केला. त्यांच्या खेळाला मिळालेल्या ग्लॅमरचं शिवधनुष्य पेलण्याची ताकदही त्यांच्यात आहे, हे त्यांनी त्यांच्या विजयोत्सवातून दाखवून दिलं.

हा विजयोत्सव पाहताना एखादं न सुटणारं गणित अचानक सुटावं तसं इतके दिवस काय खुपत होतं ते उमजून गेलं. क्रिकेटमधलं करिअर वगैरे गोष्टी खिजगणतीतही नसलेल्या आणि आयुष्यभर पुरुषांच्या क्रिकेटचे सामने पाहून त्यातचं खूश होणाऱ्या आमच्यासारख्या ‘बायकांना’... हो एके काळी जीव तोडून क्रिकेट खेळणाऱ्या आणि आता बायका कॅटेगरीत मोडणाऱ्या ‘आम्हा मुलींना’ या सामन्यांनी एक अनामिक समाधान दिलंय.

संध्याकाळी शाळेतून आल्यावर, सुट्टीच्या दिवशी, सोलापूरच्या मे महिन्याच्या दुपारी रणरणत्या उन्हात आमचं मानसमधलं (आमच्या बिल्डिंगमधलं) टोळकं खाली जमायचं. टीम पाडल्या जायच्या आणि “और ... ने अपना खाता खोला!!!” या राजेश काकांच्या वाक्याने आमची मॅच सुरू व्हायची आणि मग पुढे काय व्हायचं कळायचं नाही. रोज नव्यानं कळणारे नियम, बॉल इकडे गेला की फोर, अमुक एका भिंतीच्या पुढे गेला की २ रन वगैरे नियम तेव्हा जगन्मान्य आहेत, असचं वाटायचं. या मॅचवर आपलं आख्खं आयुष्य अवलंबून आहे, अशा पोटतिडकीनं, दातओठ खात मॅच खेळली जायची. भांडणं, रडारड, चिडाचिड सगळं व्हायचं. कधी मॅच अर्ध्यातच संपायची, कधी कुणी जिंकायचं तर कधी कोणी हरायचं. पण काही झालं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे तिथे हजर व्हायचे. 
तेव्हा आम्ही मुलं-मुली एकत्र खेळायचो. सुदैवानं आमच्या घरात तरी मुलींना काय करायचंय क्रिकेट वगैरे खेळून असलं काही ऐकावं लागलं नाही, कारण ‘जास्ती की मेजॉरिटी’ मुलींचीच होती. जरी क्रिकेटच्या बाबतीत जास्त प्रोत्साहन वगैरे दिलं गेलं नाही, तरी कधी कुणी आडकाठीही केली नाही. त्यामुळे मनसोक्त खेळायला मात्र मिळालं. खेळताना कळत गेलं की मुलगी म्हणून बॉलिंग करताना, बॅटिंग करताना आपला जोर कमी पडतो, मग ती उणीव भरून काढायची एक चटक लागली. आऊट व्हायचं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि हे सगळं करताना शिकवणारे होते राजेश काका! आमचं आराध्यदैवत. ते म्हणतील ते प्रमाण असायचं आमच्यासाठी. त्यांनीच आम्हाला रोज शाळेतून आल्यावर नियमित व्यायाम करावा लागेल, हे सांगितलं. आमच्या कंपूमध्ये हरतऱ्हेचे नमुने होते. अतिशय हुशारीनं ते प्रत्येकासाठी वेगळा नियम बनवत. आमच्या घडणीच्या वर्षांमध्ये आम्हाला त्यांनी खूप काही दिलं. खरं तर त्यांना आमच्यासारख्या शाळकरी पोरांमध्ये रमण्याचं काही कारण नव्हतं, पण असतात अशी काही माणसं जी आपल्या आयुष्यावर खूप मोठी छाप पाडून जातात. 

तर कालचा महिलांच्या विश्वचषकाचा अंतिम सामना पाहिल्यावर आमचा क्रिकेटचा हा छोटासा प्रवास माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्या काळी छोट्या शहरांमध्ये मुलीच काय मुलांनीही क्रिकेटमध्ये करिअर करणं हे स्वप्नवतच होतं. जिथे मुलांची ही गत होती तिथे मुलींचा तर प्रश्नच उद्भवत नाही. पण आज भारतीय संघानं मिळवलेला हा विजय अशा छोट्या-छोट्या शहरांमधून आलेल्या मुलींनीच मिळवलेला आहे. अशा लहानमोठ्या गल्ल्यांमध्ये खेळणाऱ्या कितीतरी मुलींना आपण हे स्वप्न पाहू शकतो, याची जाणीवही नव्हती. पण तरीही त्या मुलांइतक्याच त्वेषाने खेळत असत. फक्त या खेळाच्या प्रेमापोटी. 

आता परिस्थिती बदलली आहे. अशा मुलींना आता योग्य दिशा मिळाली आहे, याचं समाधान आहे. जिथे मुलामुलींमध्ये भेदभाव केला जायचा तो कमी होईल. मुलींना योग्य संधी लाभतील. आता सगळ्याच खेळांकडे व्यावसायिक पातळीवरून पाहिलं जातयं. कोचिंग, ट्रेनिंग सगळ्या गोष्टी एकदम फोकसने होताहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. महिला क्रिकेटचे ‘अच्छे दिन’ आता खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि आधीच्या टीमच्या तपश्चर्येनंतर सुरू होतील. 

हे सगळं ग्लॅमर फक्त क्रिकेटलाच का, बाकीच्या खेळांचं काय, हा प्रश्न तूर्तास तरी बाजूला ठेवूया. काही झालं तरी या खेळात आपल्या देशाला बांधून ठेवण्याचं सामर्थ्य आहे, हे मान्य करावचं लागेल. माझा नवरा काल मॅच संपल्यावर म्हणला,“या देशातल्या फक्त पुरुषांच्याच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या नसांनसांतून क्रिकेट वाहतंय - मग ती स्त्री असो किंवा पुरुष!” कालच्या सामन्यानंतर स्टेडियममध्ये, संपूर्ण भारतात झालेल्या जल्लोषाने हेच सिद्ध झालंय. विश्वविजेत्या महिला संघाचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. त्यांनी अनेक मुलींच हे ‘न पाहिलेलं स्वप्नही’ पूर्ण केलंय, त्यांनी मेहनतीनं तयार केलेला हा विजयमार्ग फक्त क्रिकेटच नाही तर सर्व खेळांसाठी प्रेरणादायी ठरो. क्रिकेटसाठी कायमच भारतीयांची मनं कायमच म्हणतात,“दिल मांगे मोअर!”

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.



मंगळवार, २५ मार्च, २०२५

 

मैदान



मला माहीत आहे मागच्या लेखात मी मला आवडलेल्या सिरीजविषयी लिहिणार आहे. त्याचीच तुम्ही वाट पाहत आहात. पण त्याआधी हा एक लेख वाटेत आडवा आला...थांबवू शकले नाही म्हणून पोस्ट करतेय. माफ करा.

परवा एका परीक्षेसाठी मुलाला दुसऱ्या एका शाळेत घेऊन गेले होते. शाळेत पहिलं पाऊल टाकल्यावर नजरेस पडलं ते भलंमोठं मैदान, तिथं मनसोक्त खेळणारी मुलं. अगदी हरखून गेले मी ते मैदान पाहून, थेट आमच्या हरिभाई शाळेच्या मैदानावर जाऊन थडकले. जगात शोधूनही आमच्या शाळेसारखं मैदान सापडणार नाही. एक नाही तर दोन-दोन मैदानं होती आमच्या शाळेला. एक खालचं अगदी विस्तीर्ण आणि दुसरं वरचं आखीवरेखीव, मऊसूत लाल मातीचं. पाचवीत नव्यानं या शाळेत आल्यानंतर पहिली सलामी दिली या मैदानानेच. शाळेच्या इमारतीच्या भव्यतेला या मैदानानं आपल्या कवेत सामावून घेतलं होतं.

पूर्वी मैदानी खेळ खेळण्यासाठी शक्यतो कुठले क्लास लावावे लागत नसत. त्यामुळे नवीन शाळेत आल्यावर या मैदानाशी गट्टी जमायला आजिबात वेळ लागला नाही. पाचवी ते दहावीच्या आठ तुकड्यांमधील जवळपास सर्व मुलामुलींना सामावून घेऊनही तिथे गर्दी झाली आहे, असं आजिबात वाटायचं नाही. सुट्टी होण्याआधी सगळ्यांचं लक्ष खिडकीतून दिसणाऱ्या मैदानाकडे लागलेलं असायचं. खरंतर दुपारच्या तळपत्या उन्हात चमकणाऱ्या त्या मैदानाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणंही मुश्किल व्हायचं, पण डबा खाऊन झाल्यावर धावत जाऊन त्या मैदानाला भेटणं म्हणजे अभ्यासाच्या विचारांतून मिळणारा एक पॉवरब्रेक असायचा. आमची पॉरबँकच होती ती. आमच्याकडे दोन सुट्ट्या असायच्या एक छोटी व एक मोठी. मोठ्या सुट्टीत डबा वगैरे खाणं अपेक्षित असायचं. पण मुलं शक्यतो छोट्या सुट्टीतच डबा खाऊन मोकळी व्हायची आणि सुट्टी झाली रे झाली की वेगवेगळ्या गटातली मुलंमुली भराभर जागा पकडायला पळायची. लंगडीचा कट्टा, कबड्डीचं मैदान, डॉचब़ॉलची जागा...भराभर रुमाल टाकले जायचे या जागांवर आणि शाळा पुन्हा भरेपर्यंत खेळ चालायचा. अर्धवट रहिलेला डाव दुसऱ्या दिवशी पूर्ण करायचा. ऊंची वाढवण्याचा ध्यास घेतलेल्यांसाठी कडेला डबलबार, सिंगलबार होते. मैदानाच्या टोकाला व्यायामशाळा होती. जी थोडक्याच जणांना माहीत होती. काही मुलं जायची खरी तिथं. जी मुलं सगळ्यांमध्ये मिसळत नसत, सुरुवातीला थोडी एकटी राहत त्यांनाही हे मैदान मोठ्या मायेनं धीर द्यायचं. तिथल्या मोठ्यामोठ्या झाडांच्या सावलीत निवांत बसून खेळणाऱ्या मुलांकडे नुसतं पाहत राहण्यातही मजा होती. कधी खेळायचा मूड नसेल, तर दोन्ही मैदानांवर एक चक्कर जरी मारली, तरी सुट्टी संपायची. सुट्टी संपत आली की खालच्या मैदानावर भांडाराच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीवर गर्दी व्हायची. तिथलं पाणी पिऊन मोठी झालेली मुलं आता आयुष्याचं मैदान गाजवतायत. तेव्हा हायजिन वगैरेसारख्या कुठल्याही गोष्टीचा किंतु न बाळगता सरसकट सर्वजण ते पाणी प्यायचे.

मैदानाची खरी शोभा वाढायची ती शनिवारी सकाळी. पीटीचा तास, गणवेशातील विद्यार्थ्यांच्या रांगा, ढोलपथकाच्या तालावरची कवायत, सर्वांनी एका सुरात म्हटलेली गाणी, कौतुकसमारंभ, स्टेजवरची भाषणं... मैदानावर मातीत रांगेनं बसलेली मुलं, त्यांच्यावर नजर ठेवणारे वर्गशिक्षक. त्यांची नजर चुकवून रांगांमध्ये लपूनछपून चाललेल्या खोड्या यांच्यामुळे शनिवारी सकाळी एक चैतन्य संचारायचं त्या आख्ख्या परिसरात.

ही दोन्ही मैदानं खऱ्या अर्थानं जागती व्हायची ते हिवाळ्यात; शाळेची शान असणाऱ्या हिवाळी सामन्यांच्या वेळेस. अठ्ठ्याऐंशी तुकड्यांचे विविध खेळांचे सामने त्यावेळी आयोजित केले जायचे. फायनलपर्यंत कोणता वर्ग जाईल याची उत्सुकता ताणलेली असायची. प्रत्येकानं आपल्या वर्गासाठी ठोकलेल्या आरोळ्यांनी दणदणून जायचं ते मैदान! सामन्यात भाग घेणारे, न घेणारे सगळेच जण त्या उपक्रमाचा भाग असत. आजकालसारखे फक्त ‘पार्टिसिपंट्स’ आणि ‘त्यांचे पेरेंट्स’ येत नसत ‘स्पोर्ट्स डे’ला. तेव्हा पालक वगैरे शाळेत येण्याचा तर प्रश्नच नव्हता. भले तुम्ही सामन्यात असा किंवा नसा आपल्या वर्गाला सपोर्ट करणं, हे त्या दिवसांमधलं राष्ट्रीय कर्तव्यच होतं. एरवी वर्षभर एकमेकांशी भांडणाऱ्या मुलामुलींमध्ये त्याकाळात मात्र एकजूट होत असे. शाळेच्या कंपाऊंडला लागून उभ्या असलेल्या काकाकंडून घेतलेला पेप्सीकोला खात सामने बघताना अभ्यास, परीक्षा, उज्ज्वल भविष्य वगैरेसारख्या क्षुल्लक गोष्टींची पुसटशीही आठवण राहत नसे. आता मोठं झाल्यावर या सामन्यांचं नियोजन करणाऱ्या शिक्षकांविषयी खरंच आदर वाटतो. कसं मॅनेज करत असतील देवच जाणे.

तर असं हे मैदान! ते कोणाच्याही शाळेचं असू शकतं. लहानपणी रुजलेली मैत्री, भांडणं, समेट, शिक्षा म्हणून मारलेल्या चकरा, वाढत्या वयातली गुपितं यांची साक्ष असणारं. तुमच्या-आमच्या सर्वांच्या भावविश्वाचा एक कायम आनंदी असणारा कोपरा या मैदानानं दिलाय आपल्याला. आपणही असाच एक कोपरा कायम जपून ठेवायला हवा, जो कोणत्याही आडकाठीशिवाय सर्वांना आपलंसं करेल.


©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

 

सोमवार, २४ मार्च, २०२५

 

नियमांचं कोंदण!

कोणे एके काळी भासानं ‘स्वप्नवासवदत्तम्’ नाटकामध्ये स्वप्नप्रसंग रचला. त्यात राजा उदयनाच्या स्वप्नात आलेली वासवदत्ता आणि रंगमंचावरील प्रत्यक्षातील वासवदत्ता यांचा अद्भुत ताळमेळ साधून त्याने सुंदर स्वप्नप्रसंग रचला. भासाची ही कलाकृती अजरामर झाली. त्यातील स्वप्नप्रसंग हे एक नितांतसुंदर काव्यच आहे. पण याच स्वप्नप्रसंगात राजा उदयनाला रंगमंचावर निद्राधीन दाखवण्यात आल्यामुळे या नाटकावर आक्षेप घेतले गेले. कारण भासानं नाट्यशास्त्राच्या नियमांचं पालन केलं नाही म्हणे! रंगमंचावर निद्रा, युद्ध असे प्रसंग शक्यतो दाखवू नयेत, हा तो नियम. भासाने त्याच्या नाटकांमध्ये असे अनेक नियम मोडले म्हणा!  पण काळाच्या मोजपट्टीवर भासाचा काळ हा भरतमुनींच्या आधीचा दाखवल्यामुळे नाट्यशास्त्राचे नियम भासाला लागू होत नाहीत, असा युक्तिवाद करण्यात येतो.

भासाने त्याच्या काळी लागू नसलेल्या अनेक नियमांचं उल्लंघन केलंच! त्यातूनच तर भासनाटकचक्रातील तेरा वैविध्यपूर्ण नाटकं जन्माला आली. पण आजच्या या लेखात मला वेगळंच काही म्हणायचं आहे. आजकालच्या दृक्‌श्राव्य कलाकृतींमध्ये वापरण्यात आलेले ‘रस आणि रसनिष्पती’ याबद्दल थोडं बोलायचं आहे. मला माहीत आहे, हा लेख थोडा ‘वरातीमागून घोडे’ वर्गात मोडणारा आहे. पण लिहिताना ‘खूप लिहावं लागेल’ म्हणून केलेला कंटाळा भोवला, बाकी काही नाही.

तर, आजकालचे चित्रपट, ओटीटी यांच्यामध्ये दिसणारा प्रमुख रस म्हणजे ‘बीभत्स’ ज्याचा मूळ भाव आहे ‘जुगुप्सा’ म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीची ‘किळस’. एखादी गोष्ट पडद्यावर दाखवताना त्या रसाचा कडेलोट केला, तरच आपल्या जन्माचे सार्थक होणार आहे, अशा आविर्भावात पडद्यावर सर्वकाही योजलेलं दिसतं.  आणि या कडेलोटाचा अंतिम परिणाम म्हणजे जुगुप्सा.

उदा. पूर्वी दोन सूर्यफुलांच्या आड होणाऱ्या शृंगाराचा आता होणारा कडेलोट, पूर्वी बंदुकीच्या गोळीच्या आवाजाने सूचित केलेल्या मुत्यूऐवजी एखाद्याच्या मेंदूला भेदणारं दृश्य, उडवलेलं मुंडकं आणि धड यांचं वेगळं होणं यातला वीररस, गरिबीच्या प्रदर्शनातून जाणूनबुजून मांडलेला कारुण्याचा बाजार, तंत्रज्ञानाच्या कृपेने चाललेली अद्भुताची लयलूट. स्टँडअप कॉमेडी वगैरेमधून होणाऱ्या हास्याच्या लयलुटीची कथा सर्वज्ञातच आहे, त्याबद्दल जास्त न बोललेलंच बरं. रौद्र, भयानक आणि बीभत्स तर एकमेकांचे पक्के साथीदार झाले आहेत. या संदर्भात शांत रसाविषयी फार काही न बोलणं बरं.

आजच्या या ओटीटी कंटेटला स्वातंत्र्याच्या नावाखाली कसलाच धरबंद उरलेला नाही. यांनी लोकांची ज्ञानेंद्रिये पूर्णपणे बधिर करण्याचा विडाच उचलला आहे जणू! त्यामुळे सतत काहीतरी नवे पाहण्याचा, ऐकण्याचा, अनुभवण्याचा नाद असलेली माझ्यासारखी माणसं एखादा एपिसोड पाहून कंटाळून जातात. या लोकाचं धक्कातंत्रही आता पुरातन झालं आहे.

चित्रपटगृहात सर्व गोष्टी दाखवता येत नाहीत. ओटीटीवर एक अस्वीकरण - डिस्क्लेमर टाकून काहीही दाखवलं तरी चालतं, हा ट्रेंडच आहे सध्याचा. भासाने जरी नियमांचं उल्लंघन केलं तरी त्यातून त्यानं रसनिष्पत्ती साधली आहे. आपल्या प्रेक्षकांना आनंद दिला आहे. अलीकडे आजकालच्या या सिरीजना नियमांचं कुंपण असावं, असं वाटू लागलंय. सूचक घटकांमधून प्रेक्षकांपर्यंत भावना पोहोचवण्यासाठी मोठी ताकद लागते. कदाचित काही नियम लागू केले तर ती प्रतिभा पुन्हा जागी होईल. रसांच्या परिपोषाला हातभार लागेल.

चुकीच्या गोष्टींचं गौरवीकरण करणं, प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू दाखवून उदात्तीकरण करणं, या गोष्टी तरी उणावतील. या वेबसिरीज पाहून समाजात बळावणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. या गोष्टीस अपवाद आहेतच. काही उत्कृष्ट कंटेंटही या ओटीटींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. पण जे सातत्याने दाखवलं जात आहे, मांडलं जात आहे, तेच योग्य आहे, अशी भावना बळावत चालली आहे. त्यासाठी या ओटीटीचा वापर प्रेक्षक म्हणून विवेकानं करणं गरजेचं  आहे. तरच या गोष्टी नियमित होतील.

कुपी उघडी राहिली तर अत्तराच्या कुपीतला सुगंध उडून जातो, तसंच या खुल्या मनोरंजनामुळे त्यातला आनंदही नष्ट होईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. मागे एकदा मीच कधीतरी कुठल्याशा लेखात फुशारकी मारत म्हटलं होतं, ‘नियम हे मोडण्यासाठीच असतात’. पण हे नियम भासासारख्या पात्र माणसांनीच मोडण्याचाही एक नियम आणावा लागेल, असं आता वाटतंय.

पुढील काही लेखांमध्ये अतिरेक न करता रसनिष्पत्तीचा अनुभव देणाऱ्या माझ्या काही आवडत्या सिरीजविषयी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.

 ©तृप्ती कुलकर्णी

 

 

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

 

‘हयग्रीव’ एक गूढ प्रवास







लॉकडाऊनच्या काळात ‘मायमिरर पब्लिशिंग हाऊस’ने ‘किताबकल्हई’ उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत त्यांनी काही जुन्या पुस्तकांचे प्रकाशन केलं. त्यातच रामचंद्र सखाराम गुप्ते यांचं ‘सूपशास्त्र’ (स्वयंपाक शास्त्र) हे पुस्तक होतं. त्याची जाहिरात पाहताच मी ते उत्साहात मागवून घेतलं, चाळलं. पण लॉकडाऊनच्या धामधुमीत पूर्ण वाचणं काही झालं नाही. आज सहजच हाताशी आलेलं हे पुस्तक चाळताना मला लॉटरी लागली, अनेक वर्षं पडलेल्या एका कोड्याचं उत्तर मिळालं. आता तुम्ही म्हणाल नमनाला घडाभर तेल नको...पुढे चला...

तर, आमचं गाव सोलापूर अंद्रऽऽ कर्नाटक – महाराष्ट्राच्या सीमेवरचं गाव. घरातलं वातावरण, खाद्यसंस्कृती यांवर थोडाबहुत कानडी पगडा होता आणि म्हणायला गेलं तर विजापूरच्या अगदी थोडसं पुढं असणारं तोरवी नावाचं गाव, तिथला नरसिंह आमचं कुलदैवत. वर्षा- दोन वर्षांतून तिकडे गेलो की तिथलं पूर्ण कानडी वातावरण अनुभवायला मिळायचं. मुघलांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी मोगल शैलीत बांधलेलं हे मंदिर, तिथल्या अंधारगुडूप भुयारातून “हादी...हादी...” म्हणजे वाट द्या अशी मजेत हाळी देत गाभाऱ्यापर्यंत जाऊन दर्शन घेतलं की ओढ लागायची वरच्या स्वयंपाकघरातून येणाऱ्या सुवासाची. तिथे बरेच पदार्थ असायचे. कर्नाटकी हुळीअन्ना, कोसंबरी, विविध चटण्या, कायरस आणि अजून बरंच काय काय...फक्त पोळी सोडून बरं का...या सगळ्यात माझ्यासाठी प्रमुख आकर्षण असायचा तो म्हणजे ‘हयग्रीव’. तिथे पंगतीत ऐकताना “हैग्रीवऽऽ हैग्रीवऽऽ” असंच ऐकू यायचं. मोठं झाल्यावर कळलं तो शब्द आहे हयग्रीव. मग तर त्या पदार्थामागचा गूढ अर्थ अनेक वर्ष उकललाच नाही, पण त्याची आवड मात्र कायम राहिली. तर संस्कृतात ‘हय’ म्हणजे घोडा आणि ‘ग्रीवा’ म्हणजे मान. थोडक्यात घोड्याचे शिर आणि माणसाचे शरीर असणारा. हयग्रीव हा विष्णुच्या अवतारांपैकी एक अवतार. पुढे एकदा प्रवासात कर्नाटकातल्या एका मोठ्या घाटातून प्रवास करताना मोठ्यांनी एके ठिकाणी थांबून आम्हाला दरीतलं एक गाव दाखवलं आणि सांगितलं त्या गावाचं नाव हयग्रीव –कारण त्याचा आकार घोड्याच्या डोक्यासारखा आहे. तेव्हा तो आकार दिसला नाही तरी आम्ही बापड्यांनी “हो खरंच कीऽ” वगैरे म्हणून वेळ मारून नेली होती.

तर हयग्रीव शब्दाचा अर्थ आणि माझा लाडक्याच्या पदार्थाचं नाव याची काही केल्या उकल होत नव्हती. पण सूपशास्त्र या पुस्तकात मला ‘हरभऱ्यांचे डाळीची क्षीर’ हा पदार्थ दिसला आणि मी थबकले. पाककृतीच्या तपशीलात आता शिरत नाही. पण हयग्रीव म्हणजे हरभरा डाळ, गूळ, खसखस, सुक्या खोबऱ्याचे, काजू-बदामाचे मुबलक प्रमाणात काप आणि भरपूर तूप. यात काही ठिकाणी दूधही घालतात. हा पदार्थ पुरणासारखा घोटून एकजीव करत नाहीत, तर त्यात प्रत्येक घटक स्वतंत्रपणे दिसावा लागतो. तूपात खरपूस तळलेले काजूचे-खोबऱ्याचे काप दाताखाली यावे लागतात, तरच खरी मजा.

तर या पदार्थाच्या नावाची दंतकथा अशी की, वादिराजतीर्थ नावाचा एक भक्त रोज हयग्रीवस्तोत्राचं पठण करून हयग्रीवाला या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा.  एक दिवस देव शुभ्र घोड्याच्या रूपात प्रकट झाला आणि तो नैवेद्य त्याने ग्रहण केला म्हणून या पदार्थाला नाव पडले हयग्रीव. कर्नाटक, तेलंगणा प्रांतात हा पदार्थ आजही सणासुदीला नैवेद्य म्हणून केला जातो.

ही दंतकथा या पदार्थाशी कशी जोडली गेली असेल, या गोष्टींचा सारासार विचार मी बाजूला सारला आणि हयग्रीव या नावामागच्या गोष्टीला एकदम मान्यताच देऊन टाकली. कारण एखाद्या गोष्टीचा आपण कितीतरी वर्षं कळतनकळत विचार करत असतो आणि असं अनाहूतपणे मिळालेलं उत्तर आपल्या मनालाच नाही तर बुद्धीलाही सुखावून जातं. काही जणांना ही कथा माहीत असेलही. पण मला तरी ही कथा नव्याने गवसली आहे आणि माझ्या लाडक्या हयग्रीवाभोवतीचं गूढ वलय तिनं तात्पुरत का होईना दूर केलं आहे.


©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र –गुगलच्या सौजन्याने

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.