मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

 

‘हयग्रीव’ एक गूढ प्रवास







लॉकडाऊनच्या काळात ‘मायमिरर पब्लिशिंग हाऊस’ने ‘किताबकल्हई’ उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत त्यांनी काही जुन्या पुस्तकांचे प्रकाशन केलं. त्यातच रामचंद्र सखाराम गुप्ते यांचं ‘सूपशास्त्र’ (स्वयंपाक शास्त्र) हे पुस्तक होतं. त्याची जाहिरात पाहताच मी ते उत्साहात मागवून घेतलं, चाळलं. पण लॉकडाऊनच्या धामधुमीत पूर्ण वाचणं काही झालं नाही. आज सहजच हाताशी आलेलं हे पुस्तक चाळताना मला लॉटरी लागली, अनेक वर्षं पडलेल्या एका कोड्याचं उत्तर मिळालं. आता तुम्ही म्हणाल नमनाला घडाभर तेल नको...पुढे चला...

तर, आमचं गाव सोलापूर अंद्रऽऽ कर्नाटक – महाराष्ट्राच्या सीमेवरचं गाव. घरातलं वातावरण, खाद्यसंस्कृती यांवर थोडाबहुत कानडी पगडा होता आणि म्हणायला गेलं तर विजापूरच्या अगदी थोडसं पुढं असणारं तोरवी नावाचं गाव, तिथला नरसिंह आमचं कुलदैवत. वर्षा- दोन वर्षांतून तिकडे गेलो की तिथलं पूर्ण कानडी वातावरण अनुभवायला मिळायचं. मुघलांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी मोगल शैलीत बांधलेलं हे मंदिर, तिथल्या अंधारगुडूप भुयारातून “हादी...हादी...” म्हणजे वाट द्या अशी मजेत हाळी देत गाभाऱ्यापर्यंत जाऊन दर्शन घेतलं की ओढ लागायची वरच्या स्वयंपाकघरातून येणाऱ्या सुवासाची. तिथे बरेच पदार्थ असायचे. कर्नाटकी हुळीअन्ना, कोसंबरी, विविध चटण्या, कायरस आणि अजून बरंच काय काय...फक्त पोळी सोडून बरं का...या सगळ्यात माझ्यासाठी प्रमुख आकर्षण असायचा तो म्हणजे ‘हयग्रीव’. तिथे पंगतीत ऐकताना “हैग्रीवऽऽ हैग्रीवऽऽ” असंच ऐकू यायचं. मोठं झाल्यावर कळलं तो शब्द आहे हयग्रीव. मग तर त्या पदार्थामागचा गूढ अर्थ अनेक वर्ष उकललाच नाही, पण त्याची आवड मात्र कायम राहिली. तर संस्कृतात ‘हय’ म्हणजे घोडा आणि ‘ग्रीवा’ म्हणजे मान. थोडक्यात घोड्याचे शिर आणि माणसाचे शरीर असणारा. हयग्रीव हा विष्णुच्या अवतारांपैकी एक अवतार. पुढे एकदा प्रवासात कर्नाटकातल्या एका मोठ्या घाटातून प्रवास करताना मोठ्यांनी एके ठिकाणी थांबून आम्हाला दरीतलं एक गाव दाखवलं आणि सांगितलं त्या गावाचं नाव हयग्रीव –कारण त्याचा आकार घोड्याच्या डोक्यासारखा आहे. तेव्हा तो आकार दिसला नाही तरी आम्ही बापड्यांनी “हो खरंच कीऽ” वगैरे म्हणून वेळ मारून नेली होती.

तर हयग्रीव शब्दाचा अर्थ आणि माझा लाडक्याच्या पदार्थाचं नाव याची काही केल्या उकल होत नव्हती. पण सूपशास्त्र या पुस्तकात मला ‘हरभऱ्यांचे डाळीची क्षीर’ हा पदार्थ दिसला आणि मी थबकले. पाककृतीच्या तपशीलात आता शिरत नाही. पण हयग्रीव म्हणजे हरभरा डाळ, गूळ, खसखस, सुक्या खोबऱ्याचे, काजू-बदामाचे मुबलक प्रमाणात काप आणि भरपूर तूप. यात काही ठिकाणी दूधही घालतात. हा पदार्थ पुरणासारखा घोटून एकजीव करत नाहीत, तर त्यात प्रत्येक घटक स्वतंत्रपणे दिसावा लागतो. तूपात खरपूस तळलेले काजूचे-खोबऱ्याचे काप दाताखाली यावे लागतात, तरच खरी मजा.

तर या पदार्थाच्या नावाची दंतकथा अशी की, वादिराजतीर्थ नावाचा एक भक्त रोज हयग्रीवस्तोत्राचं पठण करून हयग्रीवाला या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा.  एक दिवस देव शुभ्र घोड्याच्या रूपात प्रकट झाला आणि तो नैवेद्य त्याने ग्रहण केला म्हणून या पदार्थाला नाव पडले हयग्रीव. कर्नाटक, तेलंगणा प्रांतात हा पदार्थ आजही सणासुदीला नैवेद्य म्हणून केला जातो.

ही दंतकथा या पदार्थाशी कशी जोडली गेली असेल, या गोष्टींचा सारासार विचार मी बाजूला सारला आणि हयग्रीव या नावामागच्या गोष्टीला एकदम मान्यताच देऊन टाकली. कारण एखाद्या गोष्टीचा आपण कितीतरी वर्षं कळतनकळत विचार करत असतो आणि असं अनाहूतपणे मिळालेलं उत्तर आपल्या मनालाच नाही तर बुद्धीलाही सुखावून जातं. काही जणांना ही कथा माहीत असेलही. पण मला तरी ही कथा नव्याने गवसली आहे आणि माझ्या लाडक्या हयग्रीवाभोवतीचं गूढ वलय तिनं तात्पुरत का होईना दूर केलं आहे.


©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र –गुगलच्या सौजन्याने

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

 

 

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

 

शोध स्त्री संताचा!


 

परवा सहजच इयत्ता चौथीचं इतिहासाचं पुस्तक चाळत होते. आम्ही ते पुस्तक रद्दीत न टाकता खास जपून ठेवलं आहे. या पुस्तकाशी खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. इतिहासाशी आत्मीयतेचं नातं जोडण्यासाठी हेच पुस्तक कारणीभूत ठरलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यातल्या सनसनावळ्या, ते झपाटलेपण सगळं काही आठवून गेलं. पण थोडी खंत वाटली ती त्या पुस्तकातला दुसरा धडा पाहून! तोही अगदी जसाचा तसाच आहे. अगदी आमच्यावेळेस ३५ वर्षांपूर्वी होता तसाच. फक्त आता मी ते पुस्तक इंग्रजीमध्ये वाचत होते, इतकाच काय तो फरक. या धड्यामध्ये वारकरी संप्रदाय, महाराष्ट्रातील संतपरंपरा त्यांची शिकवण यांची माहिती आहे. यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, चक्रधर स्वामी, रामदास स्वामी यांची माहिती, त्यांची शिकवण, त्यांचे ग्रंथ यांची माहिती आहे. हे तर उत्तम आहेच. पण त्याकाळी खटकली नव्हती ती गोष्ट आता खटकली ती म्हणजे या धड्यात एकाही स्त्री संताचा उल्लेख नाही, त्यांच्या कृतींची, इतिहासाची माहिती नाही.

इतिहासामध्येसुद्धा महिला संत, त्यांच्या साहित्यकृती कायम उपेक्षितच आहेत. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणणाऱ्या मुक्ताबाईंच्या ताटीच्या अभंगांचा गर्भितार्थ, बहिणाबाईंच्या चिंतनपर तरीही सहजसुंदर कविता, कान्होपात्रेच्या अभंगातील वेदना, कळवळा, वेणास्वामींची रामकथा यांचा परिचय नाही, पण किमान उल्लेख तरी करणं गरजेचं आहे.

मला इथे स्त्रीमुक्ती, स्त्रीपुरुष समानता यांपैकी कशाचाही डंका वाजवायचा नाही, पण ज्याप्रकारे पुरुष संतांनी त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रसंगाना तोंड देत आपल्या आराध्याची उपासना केली त्याचप्रकारे किंवा त्याहीपेक्षा जास्त खडतर परीक्षेला सामोरे जात वेळप्रसंगी सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत स्त्री संतानी आपल्या आराध्याची भक्ती केली. दैनंदिन कामं करत आपल्या आराध्याचं नाव मुखी असणाऱ्या या संतांनी कर्मयोग आणि भक्तियोगाची जणू सांगडच घातली.

लहानपणी दूरदर्शनवर प्रादेशिक चित्रपट लागायचे. तेव्हा अक्कमहादेवींवरचा एक कानडी चित्रपट पाहिला होता मी. त्या चित्रपटाचा पगडा मनावरून अजूनही दूर झालेला नाही. तेव्हा त्यांच्याविषयी वाचण्याची खूप इच्छा होती, पण दुर्दैवाने तेव्हा तसं काही वाचायला मिळालं नाही. पण २०२३ साली अरुणा ढेरेंचं ‘भारतीय विरागिनी’ हे पुस्तक प्रकाशित झालं आणि मला हरवलेलं काहीतरी गवसल्यासारखं वाटलं. आपल्या आवडत्या विषयावर आपल्या आवडत्या लेखिकेनं लिहावं, यापेक्षा आणखी काय हवं. या पुस्तकात मला अक्कमहादेवी तर भेटल्याच, शिवाय संपूर्ण भारतातील विविध कालखंडातील विरागिनी भेटल्या, त्यांचा परिचय झाला.

सावित्रीच्या लेकींचा उदय होण्याआधीही आपल्याकडे ही धडपड सुरू होती. समर्थ रामदासांसारख्यांनी या वेणाबाईंना वेणास्वामी ही उपाधी बहाल करून उभ्याने कीर्तन करण्याचा अधिकार दिला, त्यांच्यावर मिरजेच्या मठाची जबाबदारी सोपवली. या धडपडीला किमान काही प्रमाणात का होईना सार्थ केले. स्त्रीपुरुष समानतेच्याही पलीकडे जाऊन मला स्त्री, पुरुष, लहान मुले यांच्याकडे एकाच दृष्टीने पाहण्याची बुद्धी दे, अशी विनंती करणाऱ्या तुकाराम महाराजांच्या ‘नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझे मन करीं देवा ।।१।।’ या अभंगाप्रमाणे सगळ्या भेदांच्या पार जाण्याचा विचार व्यक्त केला, ही किती मोठी गोष्ट आहे!

 तर मूळ विषयाशी पुन्हा येताना असं म्हणावसं वाटतं की, लहान मुलांना जरी स्त्रियांच्या आयुष्यातील समस्या, त्यांवर मात करून त्यांनी मिळवलेलं संतपद यांचा खरा अर्थ आत्ता कळला नाही, तरी किमान त्यांचा उल्लेख आणि थोडक्यात परिचय करून द्यायला काय हरकत आहे?  त्यातून त्यांना महिला संतही होत्या हे तरी कळेल.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र –गुगलच्या सौजन्याने

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

 

 

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 

सोलापूरचा बैलबाजार आणि आम्ही!




लहानपणी डिसेंबर, जानेवारी म्हटलं की आमच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारत असे. त्याचं कारण म्हणजे जानेवारी महिन्यात सोलापूरचं ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर महाराजांच्या उत्सवात भरणारी गड्ड्याची जत्रा. होम मैदानावर भरणारी ही जत्रा म्हणजे येक नंबरची जत्राच! मोठ्या मैदानावर उभारलेले तंबू, वेगवेगळे पाळणे, मौत का कुआ, आरश्यांची गंमत दाखवणारं दालन, पन्नालाल गाढवाचे खेळ, खाण्यापिण्याचे स्टॉल्स सगळं काही असायचं. हे होम मैदान आमच्या हरिभाई शाळेच्या समोरच असल्यामुळे आम्हाला दिवसाही पहायला मिळायचं हे सगळं. दिवसा सुस्तावलेलं हे मैदान रात्री कात टाकून उत्साहाची, चैतन्याची, रोषणाईच्या झगमगाटाची झूल पांघरून मनोरंजनासाठी सज्ज व्हायचं. घरातल्या मोठ्यांच्या मागे लागून आम्हीपण एक दिवस गड्ड्यावर जाऊन यायचो. कधी नव्हे ते तिथे मिळणारा भाग्यश्रीचा वडा खायला मिळायचा, दूध पंढरीचं सुगंधी दूधही मिळायचं. वर्षभराच्या आठवणी घेऊन आम्ही परत यायचो.

पण या गड्ड्याबरोबरच आमच्यासाठी खास होते ते म्हणजे डिसेंबर महिन्यातले शेवटच्या आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार आणि संक्रातीपर्यंतचे सगळेच दिवस. आमच्या घराच्या अगदी समोर रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरच्या मैदानात भरायचा जनावरांचा बाजार!  डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंगळवारी सकाळी सकाळी धुकं असताना काही टेम्पो येऊन थांबायचे, त्यातून म्हशी, बैल, शेळ्या उतरवल्या जायच्या आणि मग संध्याकाळी हा एक दिवसाचा बाजार संपायचा. आम्हाला थोडं वाईट वाटायचं. हे असं दोन आठवडे चालायचं. मग जानेवारी सुरू झाल्यावर ही सगळी मंडळी मुक्कामी यायची. दगडांची चौकट रचून विक्रेते आपापल्या सीमा आखून जायचे. मग तिथं आपापली जनावरं घेऊन यायचे. हळूहळू मैदानावरची जमीन दिसेनाशी व्हायची. सगळीकडे फक्त जनावरं दिसायची. रस्त्यावरून चालणं मुश्किल होऊन जायचं. सोलापूरची आणखी एक मजा म्हणजे आम्हाला ख्रिसमस व्हेकेशन नसायची तर ‘गड्ड्याची सुट्टी’ असायची तीही सात दिवस. मग काय आम्ही आणि तो बैलांचा बाजार एवढंच काय ते आमचं विश्व असायचं.

सकाळी उठल्यापासून गॅलरीमधून लांबपर्यंत पसरलेले ते बैल पाहत दिवस सुरू व्हायचा आणि तिथे आलेल्या विक्रेत्यांच्या मनोरंजानासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या आवाजाने तो संपायचा. देवळात सिनेमे दाखवले जायचे, लावणी असायची, गाणी असायची. झोपताना आम्ही हे सगळं ऐकत बसायचो किती तरी वेळ...हो ऐकतच कारण तिथे जायची काही सोय नव्हती. सकाळी आंघोळ आटोपून, अभ्यास उरकून आम्ही खाली पळायचो. मग त्या बाजारातून धिटाईने एक फेरफटका मारायचो. आम्हाला आवडलेल्या उंच्यापुऱ्या बैलांची नावं विचारायचो तिथल्या काकांना. तेव्हा किंमत वगैरे विचारण्याएवढे शहाणे नव्हतो. मग रोज तोच एक उद्योग असायचा आपल्या आवडीचा बैल विकला गेला की नाही हे पाहायचं. आपला बैल विकला गेला की आनंद तर व्हायचाच, पण दुःखही व्हायचं की बाकीच्यांचे आहेत अजून  आपलाच विकला गेला. मग परत दुसरा आवडता बैल शोधायचा. जनावर विकलं गेल्यावर त्याच्या अंगावर झूल चढवायचे, त्याच्या शिंगांना गोंडे बांधायचे. त्याची मिरवणूक काढून देवळासमोर आणून उभं करत आणि तिथे वाकून त्याला नमस्कार करायला लावत. त्यामुळे वाजंत्रीचा आवाज आला की आम्हाला कळायचं की आता बैल विकला गेला. मग ती मिरवणूक पाहायला आम्ही लगेच हजर व्हायचो. जत्रेतून फिरणाऱ्या चंद्रतारा बिडीची जाहिरात आम्हालाही पाठ व्हायची...“तूतूतूतूतारा....चंद्रतारा बिडी ओढा!” घरच्यांच्या कटाक्षांकडे दुर्लक्ष करून आम्ही त्या जाहिरातीची बेधडक री ओढायचो.

 दूरच्या कोपऱ्यात म्हशी असायच्या. मग तिथे जाऊन चिकाचं दूध आणायचं, त्याचा खरवस व्हायचा. हे सगळं करताना हे बैल, म्हशी, गायी हेच आमचं विश्व होऊन जायचे. सकाळी सहा वाजता अंधारात तिथल्या बैलांच्या गळ्यात बांधलेला घंटांचा आवाज, विझत जाणाऱ्या शेकोटीतून निघणारा धूर, तिथे मुक्कामी असणाऱ्या लोकांचा गप्पांचा फड हे सगळं अनुभवत शिकवणीला जायचे मी. तिथल्या स्टॉल्सवर उकळणाऱ्या चहाचा वास, तळलेल्या भज्यांचा वास, हे सगळं काही औरच होतं. थोडी रमतगमत, ही मजा अनुभवत जायचे. आईनं बाजारातून सामान आणायला सांगितल्यावर या बैलांमधूनच वाट काढून जावं लागायचं. गावातल्या जीवनशैलीची सवय नसलेल्या आम्हाला सुरुवातीला थोडी भीती वाटायची या बैलांची, त्यांच्या मोठ्या-मोठ्या शिंगांची. पण तिथले काका सांगायचे,“ काही नाही करत तो. जा बिनधास्त.” मग भीती कमी व्हायची. बिनधास्त चालत, सायकलवर बैलांच्या गर्दीतून वाट काढत जायचो मग.

एरवीच्या शहरी जीवनात काही दिवस का होईना ग्रामीण जीवनाची एक झलक पाहायला मिळायची. आमच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आपली शिदोरी उघडून बसणारी, तीन दगडांची चूल मांडून काहीतरी खायला बनवणारी ती माणसं, गायी, म्हशी आणि बैलांचे ते आवाज, त्यांची ती गर्दी यामुळे आम्ही एका वेगळ्याच जगात वावरायचो. मित्रमैत्रीणींमध्ये फुशारक्या मारायचो,‘आमच्या बिल्डिंगसमोर ना एवढा मोठा बैल आहे यावर्षी...’ खरंतर काही संबंध नसायचा या सगळ्याचा आमच्याशी. पण त्या तेवढ्या मोठ्या पसाऱ्यात आम्ही सगळी चिरकुट मुलं आपण किती भारी आहोत आपल्याला हे सगळं पाहता येतंय, या मिजाशीत वावरायचो. आता कळतंय की हे सगळं आम्ही अनुभवलं, मनात साठवलं, मुक्तपणे त्या बाजारात वावरलो हे आमचं नशीब होतं. खूप मोठ्या आर्थिक उलाढालीचं केंद्र असणाऱ्या  त्या बाजाराचं स्वरूप आमच्यासाठी मात्र वेगळंच होतं. तिथली आर्थिक गणितं आमच्या गावीही नव्हती.  संक्रातीनंतर हळूहळू बाजार संपत यायचा. सुरुवातीचा जोर उतरायचा, जनावरं विकली जायची, विक्रेते मुक्काम हलवायचे. शाळेतून त्या रिकाम्या रस्त्यावरून येताना नकळत आवंढा गिळला जायचा आणि मनाची समजूत घालायचो पुढल्या वर्षी आहेच की परत हे सगळं... आता तो बाजार भरत नाही तितक्या उत्साहात, तितकी गर्दीही नसते तिथे. पण तो बाजार आजही आम्हा सगळ्या मुलांच्या मनात तसाच आहे, याची खात्री आहे मला.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

 

‘द चिल्ड्रन्स ट्रेन’ - एक सुखद अपेक्षाभंग!




 

कुठलेही  युद्ध आणि त्याच्या अवतीभवती फिरणारे कथानक ज्यात लहान मुले, ट्रेन अशा गोष्टी असतील, अशा चित्रपटांची जरा भीतीच वाटते. कारण युद्धकाळातील सर्व परिणामांचा लेखाजोखा अशा कलाकृतींमध्ये घेतलेला असतो, ज्याची परिणती शक्यतो करुणरसात होते. पण याचा अर्थ असा नाही की मी असे चित्रपट पाहत नाही. पण सुरुवात करताना मनात एक किंतु असतोच. पण या किंतुला, किमान माझ्या या समजुतीला छेद देणारा एक चित्रपट परवा पाहण्यात आला. ‘Il treno dei bambiniया २०२४ मध्ये रिलीज झालेल्या इटालियन चित्रपटाची इंग्रजी आवृत्ती ‘The Children's Train पाहण्यात आली. व्हायोला अर्दोने यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचं कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडातील आहे. साधारणपणे १९४3 -४६ मध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित हा चित्रपट.

या चित्रपटाची गोष्ट घडते ती दक्षिण आणि उत्तर इटलीतील नेपल्स आणि मोडेना या शहरांमध्ये. नेपल्सला १९४३ साली स्वातंत्र्य मिळाले पण १९४५ पर्यंत मुसोलिनीच्या हुकुमशाहीमधून सुटका होण्यासाठी मात्र त्यांना १९४५ पर्यंत वाट पाहावी लागली. त्या दरम्यान तिथली आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था अक्षरशः कोलमडली होती. महागाई, बेरोजगारी, गरिबी अशा अनेक संकटाना हा देश सामोरा जात होता. त्यामुळे तिथल्या लहान मुलांच्या आयुष्यावर या सर्व घटकांचे खूप गंभीर परिणाम झाले. दैनंदिन जीवनातील सोयीसुविधांचा अभाव, अनारोग्य, कुपोषण यांचा सामना करत तिथली मुलं जगत होती. पालकांना आपल्या मुलांना रोजंदारीला लावावे लागत होते. अशात या मुलांसाठी उत्तर इटलीतील साम्यवादी पक्षाच्या महिलांच्या फळीने मायेचा हात पुढे केला. त्यांनी या मुलांसाठी ‘हॅपीनेस ट्रेन’ हा उपक्रम सुरू केला. उत्तर इटलीतील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण हे दक्षिणेच्या मानाने खूपच चांगले होते. युद्धाची झळ बसलेल्या दक्षिणेतील मुलांना उत्तर इटलीतल्या घरांमध्ये काही काळासाठी ठेवून घेणे, त्यांचे संगोपन करणे हा या उपक्रमाचा हेतू होता.

चित्रपटाची सुरुवात एका प्रसिद्ध व्हायोलिनवादकाच्या शोपासून होते. शोच्या आधी त्याला एक फोन येतो. ज्यात त्याला त्याच्या आईच्या निधनाची बातमी कळते. तरीही तो शो पूर्ण करण्याचा निर्णय घेतो. या संपूर्ण शोमध्ये त्याला त्याच्या गतायुष्याच्या आठवणी येत राहतात. हाच अमेरिगो आपल्या या चित्रपटाचा नायक. हॅपीनेस ट्रेनमधील मुलांपैकी एक. आपल्या आईबरोबर राहून छोटीमोठी कामं करून कसाबसा जगणारा. परिस्थितीने गांजलेली त्याची आई आपल्या मुलाचं थोड्या काळापुरतं का होईना भलं व्हावं म्हणून या हॅपीनेस ट्रेनमधून त्याला मोडेनाला पाठवण्याचं ठरवते. पण या उपक्रमाच्या विरोधात अनेक गैरसमजूतीही पसरवल्या जात असतात. जसं की तिकडे गेल्यावर या मुलांचे हातपाय तोडले जातील, त्यांना भिकेला लावलं जाईल. कम्युनिस्ट लहान मुलांना खाऊन टाकतात, त्यांना मारून साबण बनवण्यासाठी त्यांचा वापर करतात वगैरे वगैरे. आपल्याही मनात अगदी या नाही तरी अनेक शंका येऊन जातातच. कारण चांगुलपणावर, माणुसकीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवूच शकत नाही. या ट्रेनमधून जाण्यासाठी विरोध करणारा अमेरिगो उंदरांना पांढरा रंग देऊन विकताना पकडला जातो. शिक्षेच्या भीतीने तो जाण्याचं कबूल करतो. अनेक शंकाकुशंका मनात घेऊन शेवटी अमेरिगो आणि त्याच्यासारखी अनेक मुलं त्या ट्रेनमध्ये चढतात.

पलीकडे अनेक मायाळू कुटुंबं त्यांची वाट पाहत असतात. आपल्या अमेरिगोचा नंबर मात्र सर्वात शेवटी लागतो. त्याचा स्वीकार करावा लागतो डेरना नावाच्या एका शेतकरी महिलेला. डेरनाने युद्धादरम्यानच्या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला असतो. तिच्या बॉयफ्रेंडला त्या दरम्यान जिवंत जाळलेलं असतं. परिस्थितीच्या चटक्यांनी पोळलेल्या प्रथमदर्शनीच रुक्ष वाटणाऱ्या डेरनाला निरुपायाने अमेरिगोला घरी घेऊन यावं लागतं. ती दुसऱ्या दिवशी आपल्या भावाच्या कुटुंबाशी अमेरिगोची भेट घालून देते. त्या घरामध्ये, शहरामध्ये डेरनाच्या आयुष्यात अमेरिगो हळूहळू रुळू लागतो. काही कटु प्रसंगानंतर डेरनाबरोबरचं त्याचं नातं गहिरं होत जातं. पहिल्या दिवशी त्याला मायेनं जवळं घ्यायला बिचकणारी डेरना आपल्या दुःखामध्ये त्याला सहभागी करून घेते. वह्या, कंपासपेटी अशा अत्यंत साध्या पण या मुलांना अप्राप्य वाटणाऱ्या वस्तू त्याला आणून देते. दोन वेळेचं जेवण, स्वच्छ कपडे या गोष्टीही ज्यांना मिळत नव्हत्या अशा या मुलांच्या प्राथमिक गरजा तर इथे भागतच होत्या, पण त्याखेरीज त्यांना संस्कारांची, प्रेमाची, मायेची ठेवही मिळत होती. अमेरिगोला इथेच त्याच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवणारी देणगी मिळते ती डेरनाच्या भावाकडून. तो त्याला व्हायोलिनची ओळख करून देतो. ते वाजवायला शिकवतो. नेपल्समध्ये गरिबीत राहत असलेल्या त्याला आईकडून संगीताचा कान लाभला आहे. आईच्या गोड आवाजातील गाणी ऐकत तो मोठा झाला आहे. त्यामुळे संगीताची उपजत जाण असलेला अमेरिगो ही कला सहजपणे आत्मसात करायला सुरुवात करतो. मोडेनाहून नेपल्सला आल्यावर घरी आईकडे – आपल्या गावी जाण्याची ओढ असलेल्या अमेरिगोची ही ओढ हळूहळू कमी होते. आईने प्रवासासाठी निघताना दिलेलं एकमेव सफरचंद न खाता ते आपल्या हातात घट्ट पकडून ठेवणाऱ्या अमेरिगोची त्या सफरंचदावरची पकड हळूहळू सैलावते. मोडेनातील मुक्काम संपल्यानंतर परतताना सगळी मुलं आणि त्यांच्याशी मायेचं नातं जडलेली ही कुटुंबं सगळ्यांचीच अवस्था खूप बिकट होते. त्यातील काही मुलं आपण यांना भेटायला परत येऊ, ही आशा उराशी बाळगून तिथून निघतात. काही तिथेच राहतात. अमेरिगो मात्र आपल्या आईकडे परत येतो. आल्यासरशी तो आनंदाने त्याला भेट मिळालेलं व्हायोलिन तिला दाखवतो. ती मात्र रुक्षपणे ते व्हायोलिन पलंगाखाली सरकवते आणि “आता तू मोठा झाला आहेस, कामाला लाग. या चैनी आपल्यासारख्यांसाठी नाहीत,” असं खडसावते. आपल्याच आयुष्यातील या दोन टोकाच्या अनुभवांतील तफावत अमेरिगो सहन करू शकत नाही. तो सतत तुलना करत राहतो. पक्षाच्या कार्यालयात या मुलांसाठी त्यांच्या फॉस्टर पेरेंट्सनी पाठवलेल्या भेटवस्तू, पत्रं येत असतात.  डेरनाच्या पत्रांची, भेटवस्तूंची वाट पाहत राहतो. पण त्याची आई त्याला सांगते की, ‘ते लोक आता विसरले तुला! त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नकोस.’ एक दिवस जेव्हा त्याला त्याच्या आईने व्हायोलिन विकल्याचं कळतं तेव्हा मात्र तो ज्या कार्यालयातून त्यांना पाठवलं गेलं होतं तिथे जातो. तिथली महिला कर्मचारी त्याच्यासाठी आलेली सगळी पत्रं त्याच्या हातात सोपवते. आपल्या आईने ही गोष्ट आपल्यापासून लपवल्याचं कळताच अमेरिगो पुन्हा मोडेनाला जाण्याचा निर्णय घेतो आणि आईला न सांगताच ट्रेनमधून निघून जातो तो परत न येण्यासाठी!

चित्रपटाच्या शेवटी अमेरिगो नेपल्सला आपल्या घरी येतो. तिथल्या वस्तूंमध्ये आपल्या आईचा स्पर्श शोधण्याचा प्रयत्न करतो. तिथेच त्याला पलंगाखाली सरकवलेलं धुळीनं माखलेलं व्हायोलिन मिळतं. त्याच्या आईने ते दुकानातून परत आणून ठेवलेलं असतं. त्या व्हायोलिनला कवटाळून रडणाऱ्या अमेरिगोवर कॅमेरा स्थिरावतो आणि चित्रपट संपतो. पण शेवटी ऐकू येणारं ,Those who let others go, love them more than those who keep them.’  हे वाक्य आपल्याला आईपणाच्या ताकदीची जाणीव करून देतो. आपल्या मुलाच्या हितासाठी अमेरिगोची आई त्याला पळून जाण्याची परवानगी देते. त्याला अडवत नाही आणि डेरनाला एका पत्रातून सांगते की,‘जर तू त्याला कायमचं ठेवून घेणार असशील तरच त्याला राहू दे तुझ्याकडे; नाहीतर लगेच इकडे पाठवून दे.’

यात अमेरिगोच्या आईचं नाव मुद्दाम लिहिलेलं नाही कारण स्वतःच्या मुलासाठी त्याच्यापासून कायमचं दूर राहणं स्वीकारणारी, वेळप्रसंगी कठोर निर्णय घेणारी ही आई जगातल्या सगळ्या आयांचं प्रतिनिधित्व करते. अमेरिगोचा कायमस्वरूपी स्वीकार करणाऱ्या डेरनामध्ये आपल्याला आई दिसतेच पण आधी दिसते ती माणुसकी. अशा अनेक मुलांना आसरा देऊन त्यांच्या आयुष्यात काही क्षण का होईना सुखाची, मायेची पखरण करणाऱ्या अशा अनेक डेरना, अनेक कुटुंब तेव्हा होती, यावर खरंच विश्वास ठेवता येत नाही. ही कुटुंब काही संपन्न, समृद्ध नव्हती; पण आपल्यातीलच घास ती या मुलांना देऊ करत होती. खरंच या हॅपीनेस ट्रेन उपक्रमान दक्षिण व उत्तर इटलीतील दरी थोड्याफार प्रमाणात सांधली गेली असेल. सामाजिक, राजकीय पातळीवर इतका महत्त्वाचा निर्णय या महिलांनी घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला, ही बाब खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण चित्रपट पाहत असताना आता काहीतरी वाईट होईल, संकट येईल, अमेरिगोला वाईट वागणूक मिळेल अशी शंकेची पाल मनात चुकचुकत राहते. पण नाही घडत असं काही. सगळं सुरळीत होतं. युद्धकाळात आपल्या मनाचा चांगुलपणा टिकवून ठेवणं किती अवघड असेल. पण हे घडलं आहे, हे नक्की. हा चित्रपट खऱ्या प्रसंगावर आधारित नाही पण अनुभवांवर आधारित आहे. सध्याच्या चित्रपटांच्या कथानकांमधील कपट, हिंसा, क्रौर्य यांच्या पार्श्वभूमीवर ‘चिल्ड्रन्स ट्रेन’ हा खरंच एक सुखद अपेक्षाभंग आहे.




©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

 

.

 

 

सोमवार, २ डिसेंबर, २०२४

 



छंद माझा वेग???

ऑफिसच्या टीममधल्या एका नवीन सदस्याची ओख परेड सुरू होती. तीच प्रश्नावली सुरू होती,छंद कोणते, कशाची आवड आहे, इ. इ. त्यानिमित्ताने जुन्या सदस्यांच्या छंदांचीही उजणी झाली. त्यात एक-दोन पुरुषांचं उत्तर होतं, कुकिंग इज माय ह़ॉबी. पण मी अमुकच बनवतो, मला तमुकच बनवायला आवडतं अशा संदर्भासहित स्पष्टीकरणांनी मढलेली पुरुषांची वाक्य ऐकून इतरांच्या चेहेऱ्यावर उमटलेले कौतुकाचे भाव, अरे वा, हो का असे प्रशंसावाचक उद्गार या नेहमीच्या गोष्टी पार पडल्या. मग एका मुलीने सांगितलं मलाही कुकिंगची आवड आहे. ही मुलगी विवाहित होती. तिने हे सांगितल्यावर का कोण जाणे स्वयंपाकाची आवड असणाऱ्या मला तिचं वाक्य थोडं खटकलं आणि स्वतःचंच आश्चर्यही वाटलं. आता स्वयंपाकाची गोडी निर्माण झालेल्या मला स्वतःचाच रागही आला की मला असं कसं वाटू शकतंॽ असेल बाबा तिला कुकिंगची हॉबी.

स्वयंपाक करणं हा तिचा छंद आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. पण एखादा दिवस ती म्हणाली,आज मला माझा छंद काही जोपासायचा नाही बा! तर चालेल का, असा प्रश्न मला पडला. स्वयंपाक, सूपशास्त्र ही मुात एक कला आहे, कौशल्य आहे की छंद, यावर मोठा परिसंवाद घडू शकेल.

आजच्या घडीला एखादी मुलगी जर म्हणाली की मला नाही बाबा स्वयंपाकात फारसा इंटरेस्ट, तर काही लोक कौतुक करतील तिचं, काही समोरून बोलतील की असं कसं चालेल काही मागून बोलतील. पण हा प्रश्न मुलाच्या बाबतीत येत नाही. त्याला असं स्पष्टीकरण द्यावं लागत नाही.

मुात गरज ही फक्त शोधाची नाही तर सगळ्याची जननी असते, यावर माझा ठाम विश्वास आहे. आता आपल्या पोटापाण्याची सोय आपणच पाहायची आहे,  हे जेव्हा कतं तेव्हा माणूस मग ती स्त्री असो की पुरुष  स्वयंपाकाची कला म्हणा कौशल्य म्हणा शिकून घेतोच. थोडं डावं-उजवं सगीकडेच चालतं. माझ्यामते तरी त्यात लिंगभाव आड येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे खाण्याची आवड असणारा आणि वे पडल्यावर विराटाच्या घरी बल्लवाचार्य म्हणून राहणारा भीम. लहानपणी राघवेंद्र स्वामींच्या मठात जायचो तेव्हा तिथले स्वयंपाक रांधणारे-वाढणारे पुरुषच असायचे. तेव्हा त्याचं अप्रूप वाटायचं. आज अभिमान वाटतो. त्यामागची कारण वगैरे गोष्टी वेगळ्या. त्यांची चर्चा इथे करणं इष्ट नाही. आजकाल हॉटेल्स, मास्टरशेफ प्रतियोगिंतामध्ये वगैरे आपण या प्रांतातील पुरुषांची प्रगती पाहतोच आहोत.

पण असे पुरुष घराघरात असणं गरजेचं आहे. स्वयंपाक ही काही फक्त बायकांची मक्तेदारी नाही आणि ती नसावी.  सुधारक इथून लिंगभेद जेंडर डिस्क्रिमिनेशनवर घाव घालायला सुरुवात करू शकतात आणि सनातनी भीमाचा वारसा पुढे चालू ठेवू शकतात. परवाच कुठेतरी मी एक वाक्य वाचलं,कुकिंग इज जस्ट अ स्किल नॉट अ ड्यूटी. जसं तुम्ही तुमच्या आयुष्यात सायकल चालवायला शिकता आणि पुढे जाऊन दुचाकी वाहने, चारचाकीसुद्धा शिकता. त्या सायकलमध्येच अडकून बसत नाही, त्यातलीच ही गत आहे. प्रत्येकाला पोटापुरतं तरी रांधता आलं पाहिजे. मग पुढे जाऊन तुम्ही तो छंद म्हणून स्वीकारा, व्यवसाय म्हणून स्वीकारा किंवा कर्तव्य म्हणून तो तुमचा प्रश्न! घरातील प्रत्येक लहान मुलाला आणि मुलीला स्वयंपाकाचे प्राथमिक धडे देणं गरजेचं आहे. जी गोष्ट आपल्याकडे सध्या होत नाही. जसं आपण मुलांना सायकल येणं गरजेचं आहे म्हणतो तसंच ही गोष्टसुद्धा गरजेची आहे, याची जाणीव व्हायला हवी. लिंगभेदावर मात करण्याचा हा कदाचित एक सहजसोपा उपाय ठरू शकतो. ज्याची सुरुवात आपण कुठलीही आंदोलनं न करता आणि भाषणं न देता करू शकतो.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

 शब्दांचे बदलते लक्ष्य!



शब्दांच्या दुनियेत रमणाऱ्या लोकांना शब्द, शब्दार्थ, त्यांचे रूढ अर्थ, गर्भितार्थ यांच्याशी कायमच खेळायला आवडतं. काव्यशास्रामध्ये शब्द, शब्दशक्ती यां­­­­चा बराच ऊहोपोह झाला आहे. ‘प्रत्येक शब्दापासून अर्थाचा जो  बोध होतो  तो अर्थबोध करवून देणारा जो व्यापार आहे - म्हणजेच जी क्रिया आहे ती शब्दाची शक्ती आहे.’ शब्दाचे तीन प्रकार आहेत – वाचक, लक्षक आणि व्यंजक. या शब्दांच्या तीन शक्ती अभिधा, लक्षणा आणि व्यंजना आहेत आणि त्यांचे अर्थ अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ. आपण सध्या वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. खरंतर हा खूप गहन विषय आहे. पण लेखाच्या संदर्भाने थोडक्यात स्पष्ट करत आहे. लक्ष्यार्थाचे प्रकार, व्यंग्यार्थ यांचे मुद्दाम स्पष्टीकरण केलेले नाही.

वाच्यार्थ किंवा शब्दार्थ म्हणजे ‘साक्षात् संकेतितं अर्थम् यः अभिधत्ते स वाचकः।’

थोडक्यात शब्दाचा  थेट, मूळ अर्थ. शब्द उच्चारल्यानंतर जी आकृती समोर उभी राहते ती आकृती. उदा. ‘गाय’ म्हणजे चार पाय, सड आणि शिंग असणारा एक पशु. ‘वाघ’ म्हणजे एक रानटी प्राणी.

पुढचा अर्थ आहे लक्ष्यार्थ – ‘मुख्यार्थबाधे तद्योगे रूढितः अथ प्रयोजनात्।

अन्यः अर्थः लक्ष्यते यत् सा लक्षणा आरोपिता क्रिया।।’

 

ती सुरेखा ना, गाय आहे अगदी! तो रमेश ना फार शहाणा आहे!” यांतील ‘गाय, शहाणा’ या शब्दांचा अर्थ नेमका काय घ्यायचा, हे सुज्ञालाच कळते. जिथे शब्दाचा मुख्य अर्थ दूर सारून आपल्याला हवा असलेला अर्थ मिळवण्यासाठी एखादी रूढी किंवा कारणाचा आसरा घेतला जातो, तिथे येतो लक्ष्यार्थ.  म्हणजेच एखादा शब्द विशिष्ट पद्धतीने वापरला जात असेल, तर त्या अनुषंगाने त्या शब्दाचा वापर करणे.

आजच्या आपल्या लेखाचा रोख आहे तो शब्दांच्या लक्ष्यार्थावर. वर्षानुवर्षं ज्या संदर्भाने लक्ष्यार्थाचा वापर होत आहे ते संदर्भही काळानुसार बदलत चालले आहेत. काही शब्दांच्या चुकीच्या वापरामुळे, काही प्रचलित वापरांना भिन्न वळण दिल्याने.  हे आजकाल मुख्यत्वे खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत पाहायला मिळते. काही वर्षापूर्वीपर्यंत एखादा बकाबका खाऊ लागला तर “बकासुरासारखा खाऊ नकोस रे,” हा संवाद कानी पडायचा. कोणाला खूप भूक लागली असेल, तर “ओत ते पातेलं त्याच्या ताटात,” “याच्या दिवसभराच्या खादाडीला कंटाळले बाई,” असे संवाद घराघरातून ऐकू यायचे.  पण आता ‘बकासुर, बादलीभर अमुकतमुक, खादाडी’ हे आणि असे अनेक नकारात्मक अर्थाने वापरले जाणारे शब्द उपहारगृहांच्या नावासाठी वापरले जात आहे. पूर्वी योद्धे रणांगणावर शत्रूची ‘खांडोळी’ करायचे. पण आता चतुष्पादांची ‘खांडोळी’ करणारी उपहारगृहे दिसतात. एखादी व्यक्ती आवडणे यासाठी पूर्वी ‘मनात भरणे’ हा वाक्प्रचार वापरला जाई. आता मात्र हिंदीच्या प्रभावाखाली येऊन ‘तो व्यक्ती मनात उतरतो’.  ‘मनातून उतरणे’ मराठीत अगदी विरुद्ध अर्थाने वापरले जाते, हे ते लिहिणाऱ्याच्या बोलणाऱ्याच्या गावीही नसते. आता ‘गावी नसणे’ याचं पुढे काय होईल माहीत नाही. आणि हो, ‘तो’ व्यक्तीच! अनेक ठिकाणी माणूस, इसम या शब्दांच्या ऐवजी व्यक्ती शब्द वापरला जातो खरा; पण मराठीत ‘ती’ व्यक्ती असते ‘तो’ व्यक्ती नाही, याची खबरदारी घेतली जात नाही.

ज्या भाषेत बदल होतात तीच भाषा जिवंत राहते, प्रवाही राहते,  ही गोष्ट मला मान्य आहे. पण मूळ भाषेची कास सोडून भाषेचा प्रवाह भरकटू नये, हीच अपेक्षा आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स, टीव्ही सिरिअल्स यांचा जमाना आहे. अशात पात्रांच्या तोंडी दिले गेलेले संवाद नकळतपणे कधी प्रचलित होतात कळतही नाही. प्रमाण भाषेव्यतिरिक्त स्लॅंगही  असणे आणि कित्येकांना ती न कळणे, ही आता सामान्य गोष्ट आहे. पण समाजाच्या बदलत्या मानसिकतेनुसार रूढार्थांमध्ये होणाऱ्या बदलांचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे, असे वाटते.

टीप: या लेखाद्वारे कोणावरही वैयक्तिक टीका करण्याचा माझा उद्देश नाही. फक्त दिसणाऱ्या बदलांची नोंद घ्यावीशी वाटलं इतकंच.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

 

 

 

 

 

 

 

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

 

धागा आठवणींचा!

 


माझ्या माहेरी उभ्या महालक्ष्मी बसवायची पद्धत नाही. गौरी-गणपतीचे दिवस आले की आम्ही आमच्या आजीच्या मागे भुणभुण करायचो,आपल्याकडे का नसतात गं गौरी? तेव्हा आजी तिच्या गोष्टींच्या पोतडीतून एक गोष्ट काढायची आणि सांगायची. अगं, आपल्याकडे होत्या पूर्वी, पण आपलं गाव आहे ना, हडलगी अगदी डोंगराच्या मधोमध वसलेलं होतं बरं का! आजूबाजूला दाट जंगल होतं. एका वर्षी सगळी पूजा वगैरे झाली आणि आम्ही आत झोपलो होतो, तर वाघ आला आणि गौरी पाडून गेला. तेव्हापासून आपण बसवत नाही गौरी. आम्ही डोळे विस्फारून दरवेळी तेवढ्याच उत्सुकतेने ही गोष्ट ऐकायचो. जेव्हा जेव्हा ती ही गोष्ट सांगायची तेव्हा जाम भारी वाटायचं. डोगरांच्या मधोमध वसलेलं ते गाव, तिथलं अंधारं घर सगळं अगदी डोळ्यांसमोर जसच्या तसं उभं राहायचं. मनाचं तेवढ्यापुरतं समाधानही व्हायचं काहीतरी कारण आहे बरं का आपल्याक़डे गौरी नाहीत याचं!

यावर्षी माझ्या पाहण्यात एक ब्लॉग आला. त्यात असा उल्लेख होता की ज्यांच्याकडे काही कारणाने गौरी बसवण्यात खंड पडतो ते असं सांगतात की वाघाने त्या पाडल्या. तेव्हा आजीने सांगितलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण झाली. परंपरा, रीती यांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा धागा आहे, हे खरं. पण मला मात्र या गोष्टीमुळे आजीच्या गोष्टीतलं ते घर, डोंगर धूसर होतात की काय, असं वाटायला लागलं. खरं म्हणजे वाईटच वाटत होतं मला की आजीनं सांगितलेली गोष्ट खरी नाही तर!

परवा एका लग्नानिमित्त आम्ही बेळगावला गेलो होतो. आमचं गाव हडलगा/हडलगी तिथून जवळच होतं. त्यामुळे आजवर ज्यांनी ते गाव कधीच पाहिलं नाही अशी आमच्या पिढीतली मंडळी आणि सगळे मोठे मिळून त्या गावी गेलो. हे सगळं पाहून आजीची खूप आठवण झाली. कधीही न पाहिलेल्या पणजी-पणजोबांच्या आठवणींना तिथे उजाळा मिळाला. आई, काका, मावशी यांनी तिथल्या गोष्टी सांगितल्या. तिथलं ते घर, आजूबाजूचा परिसर पाहताना मनातल्या त्या गोष्टीवर साचलेलं धुकं आपोआप दूर झालं. आजच्या काळातही दुर्गम म्हणावं असं ते गाव आहे. तिथे देऊळ आहे, घर आहे.

तिथे गेल्यावर मी स्वतःला पुन्हा एकदा समजवलं, आजी सांगत होती तेच खऱं होतं. रीत वगैरे सब झूठ! किमान माझ्यासाठी तरी! माझ्या लहानपणीच्या ठेव्यामधली ती एक अमूल्य गोष्ट आहे, जिने मला आमच्या मूळ गावाशी बांधून ठेवलं आहे. त्यामुळे मी तरी तिला धक्का पोहोचू देणार नाही. तिथे जाऊन जे वाटलं ते शब्दातीत आहे. दिसायला सगळं नेहमीचंच होतं पण आमच्यातल्या प्रत्येकाला त्या जागेविषयी जे वाटतं होतं ते महत्त्वाचं होत. काहीजणांच्या आठवणी प्रत्यक्ष होत्या, तर आमच्यासारख्यांच्या ऐकीव. पण त्याच आठवणींच्या धाग्याने आम्हाला बांधून ठेवलं आहे, हे नक्की. काळाच्या ओघात गोष्टी नाहीशा होतात, आठवणी राहतात. पण अशा अमूर्त आठवणींमध्ये खूप मोठी ताकद असते, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा जाणवलं.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने